भारत भाग्य विधाता ?

Update: 2018-04-13 15:43 GMT

पल्लवी पुरकायस्था ते असिफा बानो व्हाया निर्भया, कोपर्डी अशा अत्यंत दुर्दैवी आणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना ठराविक काळाच्या टप्प्यांत भारतासारख्या विकसनशील देशात घडल्या. 'बेटी बचावो बेटी पढावो' मुलगी शिकली प्रगती झाली 'भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाने अशा अनेक जाहीरातबाजी वर एकूण खूपच खर्च केला आहे. जगण्याच्या आणि स्वातंत्र्याच्या, हक्काच्या मुलींच्या मुलभूत अधिकारासंदर्भात पुरुषी मानसिकता बदल घडवून आणण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना आणि संरक्षणचा कायदा करायला देश असमर्थ दिसतोय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत, कायद्याचे उच्च शिक्षण घेवून प्रॅक्टीस करणारी पल्लवी पुरकायस्थाला चौकीदारी करणारा काश्मिरी मुस्लिम तरुण "सज्जाद मुघल" बलात्कार करुन निर्घृण हत्या करत तिचे धड शरीरावेगळे करतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत निर्भयाला गुप्तांगात सळ्या घालून तिच्यावर गँगरेप केला जातो. तर नुकतीच ८ वर्षीय असिफा बानोची बलात्कार आणी तिची हत्या ही नुकतीच घडलेली घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला घडलेल्या या घटना आहेत. यात धर्म आणी धार्मिक स्थळाना आणू नये कारण गुन्हेगारांना धर्म नसतो, आणि असता तर त्यानी असे कृत्य केलेच नसते, धार्मिक राजकारणाचा रंग देवून विषयाचे आणि गुन्हे यांचे गांभीर्य भलतीकडे नेवू नये. कोणताही धर्म अशा गोष्टींचे समर्थन करत नाही, ही माणसिकता भारतात विद्वेशी रुप धारण करताना, जनतेला धार्मिक राजकारणात अडकवून समाजाच्या धृवीकरणाने आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे विद्वेशी राजकारण भारताला स्फोटक परिस्थितीकडे घेवून जात आहे, आणि अशा अनेक हत्या बलात्काराच्या घटना असतील ज्या उघडपणे जनतेसमोर आल्याही नसतील. बलात्कार पीडितेच्या वयामुळे बलात्कार गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही. संपूर्ण देश सोशल मिडीया आणी इतर उपलब्ध निषेधाचे मार्ग वापरतोय. वांझ, बटिक, दांभिक, सनातनी, नर पशू अशा साऱ्यांचा सूर 'मिले सूर मेरा तुम्हारा' असाच लागला आहे. किती दिवस असा वांझ निषेध आणी लचके तोडलेल्या आणी कुस्करुन टाकलेल्या कळ्यांचे फोटो पाहून निर्ढावलेल्या व्यवस्थेला शिव्यांची लाखोटी वाहत बसायचे. अहंकार, राग, लोभ, मत्सर, आणि पुरुषप्रधान संस्कृतीमागचा अमानुष माणसिकतेचा नर त्याची माणसिकता बदलण्यासाठी सरकारवर योग्य तो दबाव आणून कठोर कायदा आणी दंड याबरोबर ही माणसिकता संपविण्यासाठी त्या विचारांचे लोकशिक्षण आणि कायद्याच्या वचकाची जाहीरातबाजी करावीच लागेल. आणि आता जर धोरणात्मक कठोर कायद्याची योग्य पावले उचलली गेली नाहीत तर संपूर्ण उद्ध्वस्त भारताचे भाग्य विधात्याच्या हातात देखील नसेल. हॅप्पी वूमन्स डे आणि हॅप्पी इंडीपेंडस डे जवळ आला की सोशल मिडीयावर स्वातंत्र्य आणी समतेची कुल्फी चाखतानाचे फोटो शेअर करण्याआधी या सर्व घटनांचे विष अंगात भिनभिनत राहायला हवे तरच अशी जागरुकता ही विषवल्ली देशात पसरणार नाही.

Similar News