लैंगिक विकृती ही भयानक गोष्ट आहे. लैंगिक विकृतीचा इतिहास मानवी अज्ञात इतिहासात आहे. आणि ती विकृती पुरुषकेंद्री आहे. हुप्प्या वानर म्हणजे आपल्या आद्य पूर्वजांकडून ही लिंगाधारित पुरुषसत्ताक व्यवस्था विकसित तर झाली नाही ना... पण वयात आलेल्या मादींवर हा हुप्प्या नर आपली सत्ता चालवतो. पण अन्य नरांना आपल्या ताकदीच्या जोरावर पराभूत करून लहान मादी वानरांना आपल्या कवेत घेत नाही.
वानर समूह हा रानटी समूह आहे हे लक्षात घेता मानवी समाजाच्या प्रदीर्घ विकासात माणूस म्हणून आपण किती उत्क्रांत झालो हा प्रश्न आजही सुटलेला नाही. लैंगिक भूक भागवण्यासाठी कोणत्या थराला जायचं. पुरुष म्हणून जर स्त्रीला मला बळजबरीने भोगता येत नसेल, माझ्यात तेव्हढी मानसिक आणि शारीरिक ताकद नसेल तर मी तुलनेत सहज असे सावज शोधतो. ही सावज शोधण्याची आणि टिपण्याची रानटी प्रवृत्ती आजही माझ्या आत दबा धरून बसली आहे काय....?
आज मोबाईलच्या माध्यमातून मुठीत तंत्रज्ञान घेऊन फिरणारा समाज लैंगिक वासनांच्या विळख्यात अडकतो आहे काय? इंटर नेटचा वापर सगळ्यात जास्त कशासाठी होतो? पोर्न साईट बघताना सगळ्यात जास्त काय बघितले जाते तर अल्पवयीन मुलींसोबतच्या ज्येष्ठ किंवा प्रौढ पुरुषांनी केलेल्या कामक्रीडा...
ही विकृती कोण पोसतोय...? त्याचे अर्थकारण काय....? त्याचे सामाजिक दुष्परिणाम काय ...?
आज जागतिक कन्या दिनाच्या पार्श्वभूमीवर हे लिहाव लागतंय. मुलगी, बेटी, स्त्री, हव्वा, इव्हा, वा दुर्गा ती भोगवस्तू आहे नाहीतर तिचे दैवतीकरण करून पुन्हा तिला उपभोग्य वस्तूच बनविले जाते. हा पुरुषी कावा धर्म-जात-राजसत्ता-समाज व्यवस्था या सगळ्याचा वापर करीत आपल्या आदिम रानटी सत्ता लोलुप लैंगिक कामना शमवण्यासाठी नीती-अनीती, शास्त्र, धर्मग्रंथ हे निर्माण करत आला आहे. आणि पुरुस्ज म्हणून आम्ही सर्व त्याचा कळत (नकळत नव्हे ) यथेच्छ फायदा घेत असतो.
नागर समाज म्हणून विकासाच्या या टप्प्यावर लोकशाही, घटना, कायदा, आधुनिक मुल्ये ह्या सगळ्याचा ढोल बडवत असताना ही आधुनिक नागर मुल्ये माणूस म्हणून आपण पुरुषांनी किती स्वीकारली आहेत आणि स्वतःमध्ये त्यानुरूप बदल केले आहेत? हा प्रश्न प्रत्येक पुरुषाने स्वतःला विचारला पाहिजे.
प्रियांकाने जेव्हा हि चित्रफीत मला दाखवली तेव्हा त्या लिंग पिसाट विकृत माणसाबद्दल प्रचंड राग आला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी MAX MAHARSHATRA ने #SerchThisMan ही मोहीम सुरु करून या प्रश्नावर रान उठवले आहे. त्यात आपण सगळे सहभागी आहोतच...
पण त्या निमिताने बलात्कार , घरघुती हिंसा, बाल लैंगिक अत्याचार ह्या पुरुषसत्तात्मक लैंगिक अधिपत्य म्हणजे मी पुरुष माझ्या काम वासना मला हव्या तश्या पूर्ण करेन पण स्त्रीचे कामजीवन मी माझ्या कह्यात ठेवीन. मी मुक्त भोगी आहे आणि ते मुक्त्भोगीपण अबाधित राहण्यासाठी त्याला मी धर्म समाज आणि राजसत्तेचे आवरण घालीन. लैंगिक जीवनावर बंधने हा गुलामगिरीचा हा एक महत्वाचा पैलू आहे. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हते... हे प्रत्येक धर्म ग्रंथ वेगवेगळ्या भाषेत आणि शैलीत सांगतो. त्याला लोकशाही मूल्यव्यवस्थेत स्थान देता कामा नये. त्यासाठी व्यापक चळवळ पुरुषांना उभी करावी लागेल. कारण या लैंगिक अधिपत्याच्या विकृतीच्या रोगाचे बळी पुरुष आहेत आणि त्याच्या परिणामांच्या बळी या मुली आणि स्त्रिया आहेत.