इशारा सर्वांसाठी...

Update: 2018-04-13 14:49 GMT

Pain in heart tears in eyes मी लिहिताना आणि तुम्ही वाचताना अंगावर काटा उभा राहिला तरी हे वास्तव स्विकारायची मनाची तयारी करा. कारण त्यानंतर तुम्ही काय ठरवणार यावर तुमच्या पुढच्या पिढ्यांचं अस्तित्व अवलंबून आहे.

जम्मूच्या कथुआ जिल्ह्यात नेमकं काय घडलं? रेस्साना या हिंदू बहुसंख्य गावात बखेरवाल या पशुपालन करून पोट भरणाऱ््या मुस्लिम समाजाची एक छोटी वस्ती आहे. ती हटवून जागा रिकामी करण्याचा सांजेराम या माणसाचा डाव होता. सांजेराम जम्मू-काश्मीर सरकारचा एक निवृत्त महसूल अधिकारी. बखेरवालांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने आपला अल्पवयीन मुलगा आणि पुतण्या यांच्या मदतीने एक कट रचला. १० जानेवारीला जंगलात चरायला गेलेला आपला घोडा हरवला म्हणून असिफा ही ८ वर्षे वयाची बखेरवाल मुलगी त्याला शोधायला निघाली. सांजेरामच्या या दोन मदतनीसांनी तिचं अपहरण करून तिला गावाजवळील देवळात आणली. या देवळाचा ताबा सांजेरामकडेच असतो. झोपेच्या गोळ्यांचा पुरेसा साठा करून ठेवला गेला होता. असिफाला त्या खायला लावल्या गेल्या.

१७ जानेवारी पर्यंत, एक पूर्ण आठवडा, असिफाला बेशुद्धीत ठेवून सांजेराम, त्याचा हस्तक दीपक खजुरिया आणि ही दोन तरूण मुलं, यांनी या देवळात तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. विकृतीची परिसीमा गाठली गेली; सांजेरामच्या पुतण्याने आपल्या आणखी एका नातेवाईकाला मेरठवरून "भूक भागवायला" बोलावून घेतलं. तोही आला आणि देवाच्या साक्षीने चाललेल्या या पापात सामील झाला.

दरम्यान, असिफा हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल झाली होती. मार्ग काढत देवळापर्यंत आलेल्या पोलिसांना १.५ लाख रुपये लाच देण्यात आली. ती दिली त्या पुतण्याच्या आईने. शेवटी १७ जानेवारीला असिफाच्याच दुपट्ट्याने गळा आवळून तिला ठार मारलं गेलं. पण त्याआधी मेरठहून आलेल्या पाहुण्याने या आठ वर्षे वयाच्या चिमुरडीवर पुन्हा एकदा बलात्कार केला. तिचं प्रेत नाल्याजवळ टाकून देण्यापूर्वी तिचं डोकं दगडांनी ठेचण्यात आलं. यातील प्रत्येक शब्द पोलिसांनी तयार केलेल्या ११ पानी आरोपपत्रामधील आहे.

असिफाचं जे झालं त्या इतकाच पाशवी गुन्हा आता घडतो आहे. या गुन्ह्याला धार्मिक रंग देऊन त्याचं निर्लज्य राजकीय भांडवल तिथल्या हिंदू संघटना आणि भाजपाचे नेते करत आहेत. कोर्टात आरोपपत्र दाखल करायला निघालेल्या पोलिसांना त्यांनी अडवलं. त्यांच्यात जम्मू-काश्मीर वकिलांची संघटना सामील होती. असिफाला न्याय मिळवून देण्यासाठी उभ्या राहिलेल्या हायकोर्टाच्या वकील दिपाली सिंग यांना धमक्या यायला सुरुवात झाली आहे. आपण या धमक्यांना भीक घालत नाही हे दिपाली सिंग यांनी काल भर रस्त्यात एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं. या सगळ्या प्रकरणात पाकिस्तानचा हात आहे असा अचाट दावा भाजपाच्या एका नेत्याने केला.

एकतर तुम्ही आमच्याबरोबर आहात किंवा आमचे शत्रू आहात ही टोकाची विचारसरणी भाजपाने या देशात रुजवल्याचा हा परिणाम आहे. धर्माच्या नावाखाली गुंडांच्या टोळ्या जागोजागी तयार केल्या जात आहेत. सहिष्णुता, वैचारिक परिपक्वता आणि मानवी संवेदनशीलता त्यांच्याकडे नाही. म्हणूनच तर एका निष्पाप बालिकेवर देवाच्या मंदिरात बलात्कार करून तिची क्रूर हत्या करताना त्यांच्या मनाला कुठलीही अपराधीपणाची भावना स्पर्श करत नाही.

हा आंधळा धर्मद्वेष, त्यातून निर्माण झालेलं हे विखारी वातावरण आणि तेच हवं असलेले हे सत्ताधीश जर टिकले तर मी सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे, तुमच्या पुढच्या पिढीसमोर फक्त दोनच पर्याय उरतील. एकतर दंगली, लुटालूट, जाळपोळ आणि बलात्कार करणारे या टोळ्यांचे भाग व्हा अथवा त्यांच्याकडून मारले जा.

उन्नावमधे बलात्कार झालेल्या मुलीसाठी - जी हिंदू होती - न्याय मागायला गेलेला बाप शरीराचं प्रत्येक हाड मोडून (त्याच्या मृत्यूच्या अहवालातच ही नोंद आहे) मारला गेला. कथुआमध््ये असिफाची अशी विटंबना झाली. दोन्ही प्रसंगांनी दिलेला हा इशारा आहे.

डाॅ. जितेंद्र आव्हाड

Full View

Similar News