ड्रेस कोड?

Update: 2018-03-02 08:48 GMT

काही विषय संपतच नाहीत का? मान्य आहे की बदलाच्या प्रक्रियेचे अनेक घटक असतात आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रादेशिक विभागात, व्यावसायिक विभागात प्रभाव पडण्याच्या प्रक्रिया, गती वेगवेगळ्या पद्धतीने होते. तरीही एक शारीरिक सोय, व्यावहारिक सोय व सामाजिक स्विकार यांचा मेळ कधी बसणार असा प्रश्न स्त्री शिक्षकांनी पंजाबी ड्रेस घालावा की नाही ह्यावर आजही एवढी चर्चा होते हे वाचून मनात आलं.

प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ श्रीमती लीला पाटील यांनी वयाच्या साठीनंतर ओढणी न घेता पंजाबी ड्रेस स्विकारला तेव्हा त्या B.Ed कॉलेजच्या प्रिन्सिपल या पदावरून निवृत्त झाल्या होत्या. शासनामध्ये त्यांनी विविध उच्च पदे भूषविली होती. त्यांना अनेकदा हा प्रश्न विचारला जाई आणि "इतरांसमोर सतत पदर किंवा ओढणी सावरत बसण्यापेक्षा असा सुटसुटीत वेष तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करण्यास उपयुक्त ठरतो" असे त्यांचे त्यावर उत्तर. मला आज मालतीबाई बेडेकर या विदुषीचीही आठवण होते. मी इयत्ता ५ वीत असताना मंगल वाचन या मराठीच्या पुस्तकात शेवटी वाचनासाठी वेचे दिलेले असत. त्यात त्या म्हणतात "घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या कामाचे स्वरूप लक्षात घ्या व त्याला योग्य असे कपडे पेहरून बाहेर पडा. "मग मात्र पूर्ण लक्ष फक्त कामाकडे द्या, सतत पदर जागेवर आहे का, अति घामाने कुंकवाचे फराटे कपाळभर पसरले आहेत का या चिंतेत राहू नका.

गोष्ट आहे बहुतेक १९९५ नंतरची... श्रीमती कुमुद बन्सल या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्यावर स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या एक शिक्षण सचिव. त्यांच्या काळात शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षक प्रशिक्षणाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित केला होता. साधारण तो मार्च किंवा एप्रिल अखेर परीक्षा झाल्यावर एकाच वेळी अंदाजे ८०००० जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे २ ते ३ लाख शिक्षकांच्या दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षणाचा कार्यक्रम राज्यभर एकाच वेळी घेता येईल या पद्धतीने आखला होता. राज्यातील सर्व शिक्षक ते १० दिवस आपापल्या भागातील प्रक्षिक्षण स्थानांवर एकत्र राहत होते. सकाळी ६ वाजता योगासनाने कार्यक्रम सुरु होई. स्त्री शिक्षकांना पंजाबी ड्रेस घालणे सक्तीचे केले होते. मी ते १० दिवस युनिसेफ प्रतिनिधी म्हणून विदर्भाच्या विविध भागात फिरत होते. प्रत्येक ठिकाणी एका गोष्टीचे प्रत्येकीने स्वागत केले ते म्हणजे या ‘ड्रेस कोड’. अनेक विरोध, टीका, धमक्या, अबोले, रागाचे कटाक्ष सहन करण्याची ताकद त्या स्त्री शिक्षकांना या एका छोट्या सक्तीने दिली जी त्या भरभरून बोलत होत्या. सहन केलेली बोलणी, टीका, नव-याचे, सासू व अन्य स्त्रियांचे वाग्बाण त्या सांगत होत्या आणि जणू एक अवघड चढाई पार पडल्याच्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. आयुष्यात अशी संधी, जी कधीही मिळू शकली नसती ती मिळाल्याचा तो आनंद होता.

निवृत्तीनंतर मी मुंबईतील एका शाळेत संस्थेची सचिव म्हणून काम करते आहे. त्यावेळी पश्चिम व मध्य रेल्वेने प्रवास करणा-या शाळेतील ७० टक्के स्त्री शिक्षकांनी पहिला अडचणीचा मुद्दा सांगून परवानगी मागितली ती पंजाबी ड्रेस घालून शाळेत येण्याची. संस्थेच्या अन्य पदाधिका-यांना हो म्हणणे अवघड होते परंतु त्यांनीही होकार दिला. आज स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष केला जात असताना स्त्री शिक्षकांनी काय कपडे घालावेत हा चर्चेचा विषय होऊ शकतो? सोयीस्कर असे अंगभर कपडे एवढा निकष पुरेसा नाही का?

विजया चौहान

निवृत्त शिक्षण अधिकारी युनिसेफ, शिक्षण कार्यकर्ता

Similar News