'मेल्यावरही बाईच्या कर्तृत्वाची नाही तर शरीराचीच चर्चा'

Update: 2018-02-28 10:51 GMT

कंटाळाच नाही तर उबग आणि चीड आलीये आता तथाकथीत ‘काळजीवाहू’ मेसेज आणि पोस्ट वाचून.

"ती" जिवंत होती तेव्हा या ‘सुजाण’कारांनी जे काय रोखठोक लिहायचे ते का लिहिले नाही. आज जे लिहितात त्याला पुरावा काय? आपल्या माहितीच्या खरेपणासाठी फॅक्ट्स, कोट्स म्हणून काय देताहेत? काही नाही. केवळ लिहित सुटलेत. आरोप करताहेत. आजही अनेक अभिनेत्री असं जगत असतील त्यांचं नाव घेऊन लिहा पुरावे द्या. जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात, सुऱ्या-कात्र्या चालवतात त्यांचे कोट्स द्या. तसं काही नाही.

जी व्यक्ती आता खुलासा द्यायला येऊ शकत नाही तिच्याविषयी लिहित सुटलेत. ते ही तिच्यासोबत रोज राहत असल्यासारखं, ‘अधिकारानं’! जिवंत असताना ज्या व्यक्तीविषयी लिहिण्याची टाप नव्हती किंवा तशी हिंमत केली नाही, आता ती गेल्यावर तिच्या आयुष्यातले तपशील ( फक्त मलाच कसे माहिती अशा तोर्‍यात) लिहून ‘मोरल हाय’ वर गेलेले लोक केवळ आपल्या समाजाचा दुटप्पीपणा सांगताहेत तिला वाटलं तसं, हवं तसं जगली, बोलावणं आलं गेली. तिचा अंतिम न्यायनिवाडा करायचा अधिकार समाजाला कुणी दिला. आणि या सगळयात तिच्या अभिनयाची, बॉलीवूडमध्ये सुपरस्टार असल्याची चिकित्सा झाली का? त्याविषयी कुणी अभ्यासपूर्ण लिहितंय का? त्यावेळचा समाज, बॉलिवूड आणि श्रीदेवीचा प्रवास यांचा परस्पर संबंध मांडून दाखवलाय का? - तर नाही!

सुंदर दिसण्यासाठी औषधं प्यायची नी ऑपरेशनं करुन घ्यायची याचीच काय ती चर्चा.

काही थोर्थोर लोक तर ‘लेडी अमिताभ’ गेली म्हणून गळा काढून सोशल मीडियात रडले. म्हणजे तिचं सुपरस्टार असणंही तुम्ही कुणाचं तरी नाव जोडून मोजणार?

म्हणून म्हणते ढोंगी आहे आपला समाज

मेल्यावरही बाईच्या कर्तृत्वाची नाही तर शरीराचीच चर्चा करतोय...

मेघना ढोके

(लेखिका लोकमत वृत्तसमूहात कार्यरत असून ही त्यांची फेसबुक पोस्ट आहे.)

Similar News