अडनिड्या वयाचं करायचं काय ?

Update: 2017-07-07 08:18 GMT

मैत्रिणीने एक व्हिडिओ क्लिप पाठवली आणि एक पालक म्हणून तुला काय वाटतंय ते लिही म्हणाली. असेल काहीतरी मुलं - पालक विसंवाद विषयावर असं म्हणत मी ती क्लिप ओपन केली आणि हबकलो. अक्षरशः भोवंडून गेलो. तथाकथित चांगल्या घरातली, चांगल्या शाळेतली मुलं आनंदाने चित्कारत जे काही करत होती ते बघून माझी घाबरगुंडी उडाली. त्या गोड गोमट्या मुलांच्या जागी मला माझी मुलं दिसायला लागली.

मनात सगळयात पहिली प्रतिक्रिया उमटली, "फोडून काढलं पाहिजे अशा नालायक कार्ट्यांना". किती घाणेरडी आणि विकृत मुलं आहेत ही ! पण लगेच मनाच्या दुसर्‍या आवाजाने दटावलं, मुलं चुकीची गोष्ट नक्कीच करतायत, पण ती मुलं खरंच तेवढी वाईट आहेत का? का करताहेत ती असं? तो रॅगिंगच्या, शोषणाचा, जबरदस्तीचा प्रकार नव्हता. त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक थ्रील केल्याचा, साहसी कृत्य केल्याचा उन्माद होता. चोरुन सिगारेटचा पहिला झुरका मारणाऱ्या मुलासारखा. का होतं असेल असं?

अडनेडं वय. शरीर- मनात प्रचंड उलथापालथी होतायत. ज्यांना इतकी वर्ष आदर्श मानलं त्या आई- बाबाकडे मुलं एक व्यक्ती म्हणून पहायला लागलीत. लहान असेपर्यंत सर्वस्व वाटणाऱ्या, परिपूर्ण वाटणाऱ्या आई-बाबाच्या कित्येक गोष्टी आता खटकायला लागल्यात. रागच यायला लागलाय त्यांचा. मग त्यांच्याशी छान संवाद करायचा तरी कसा? आपल्याला काय होतय ह्याची पर्वा न करता नवनवीन अपेक्षांचं ओझं टाकणाऱ्या मोठ्यांपेक्षा समवयस्क मित्र मैत्रिणीच जास्त जवळच्या वाटू लागल्यात.

मुलं वयात येऊ लागली की कमी अधिक प्रमाणात प्रत्येक घरी हेच होऊ लागतं. आपल्या भावभावना मित्र किंवा मैत्रिणीच समजू शकतात ह्या विचारातून मुलं मित्रमंडळींवर पूर्ण अवलंबून रहायला लागतात. मित्रमंडळींमधे रमणं छानच असतं, पण मित्र गमवावा लागेल, आपण एकटे पडू ह्या भितीपोटी मनाविरुद्धच्या कितीतरी गोष्टी फक्त दोस्तीखातर केल्या जातात. आपल्याला कोणी बाळबोध किंवा बावळट म्हणू नये म्हणून अर्ध्या कच्च्या ज्ञानाच्या बळावर बढाया मारल्या जातात, साहसाच्या खोट्या कल्पनांना बळी पडून कृती केल्या जातात.

शरीर मनात उर्मीच्या लाटा उसळत असतात पण त्यांना सजगपणे समजून घेण्याची संधी बहुतेक मुलांना मिळत नाही. नैसर्गिक उत्सुकता शमवण्यासाठी तळहातातील यंत्राची मदत घेतली जाते आणि आयुष्य व्यापून टाकणारी अतिशय सुंदर तरल भावभावना बिभत्सपणे मुलांसमोर उभी होते. कल्पनांमध्ये रमण्याच्या या वयात मग अशा फसव्या माहितीची देवाण घेवाण होत राहते. संवेदनशीलता बोथट होत जाते. त्याचीच पुढची पायरी म्हणून मग अशा घटना घडत राहतात.

पालक म्हणून आजूबाजूस असं काही घडलं की मला माझ्या मुलांची काळजी वाटायला लागते. काय करतील ती अश्या लोंढयात? प्रवाहाबरोबर वाहत जातील की प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिंमत दाखवतील? निसरड्या वाटांवरुन घसरतील की सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पोहचतील? आयुष्याचा आनंद मनसोक्त लुटण्याची जिगीषा, जग बदलवून टाकण्याची उर्जा, सकारात्मक साहसाची ओढ, लैंगिकतेतील सौंदर्याची जाण. मुलांच्या आयुष्यातील दुसरे दशक हे असे सर्वार्थाने मुलांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकणारे असते.

हे वयाचे दुसरे दशक त्यांच्या आयुष्यभरासाठी मर्मबंधातील ठेव व्हायला हवे. त्यासाठी संवादातील ओलावा कायम ठेवणं, सुजाण पालक तसेच चांगला माणूस होण्यासाठीचे आपले प्रयत्न चालू ठेवणं, मुलांना चांगले छंद असतील ह्याकडे लक्ष देणं, कला, खेळ,समाजकार्य ह्यात मग्न असणार्‍या व्यक्तिंशी त्यांना कनेक्ट करणं, त्यांच्या मित्रमंडळींशी अधूनमधून संपर्कात राहणं आणि काहीही घडलं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत असा त्यांना विश्वास देणं मला जमायलाच हवं.

 

जयदीप कर्णिक,

पुणे.

मो. ९५५२५९९६२९

Similar News