लातूर कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन

Update: 2020-01-28 17:33 GMT

लातूर शहरातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी काल सकाळपासुन महाविद्यालयाच्या गेटवरच बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलंय. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि प्रश्न वेळोवेळी महाविद्यालय प्रशासनाला सांगूनही प्राध्यापक आणि प्राचार्य लक्ष देत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार हाती घेत कालची संपूर्ण रात्र कॉलेजच्या गेटवर जागुन काढलीय.

लातूरच्या या कृषी महाविद्यालयात प्रॅक्टिकलच्या नावाखाली काहीही कामं करायला सांगितली जातात. महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासह अनेक समस्या आहेत. या सगळ्या तक्रारी महाविद्यालय प्रशासनाकडे करुनही सतत दुर्लक्ष केलं जातंय. विद्यार्थ्यांचं हक्काचं मानधन देखील मिळत नसल्यानं विध्यार्थ्यानी सकाळपासूनच बेमुदत धरणे आंदोलन सुरु केल आहे. प्रशासनाच्या दबावापोटी विध्यार्थी माध्यमांना बोलण्यास घाबरत असले तरी जोपर्यंत कुलगुरू येऊन आमचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याच सलग दुसऱ्या दिवशी देखील विध्यार्थ्यानी सांगितलंय.

महाविद्यालय प्रशासन मात्र विद्यार्थ्यांनी अचानक सुरु केलेल्या आंदोलनामुळं हादरून गेलंय. विद्यार्थ्यांनी आमच्याकडं अडचण मांडलीच नाही असं सांगत प्राचार्यांनी या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र जोपर्यंत स्वतः कुलगुरु येऊन आम्हाला भेटणार नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय.

 

Similar News