देशभरात तीन तलाखच्या पध्दतीत फोनवर घटस्फोट देण्याचे अनेक प्रकार घडत होते. मात्र तीन तलाख बंदी कायदा केल्यानंतर राज्यात जात पंचायतीने एक रुपयात फोनवरून घटस्फोट दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. देशात पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना दुसरे लग्न केल्यास असे लग्न करणे गुन्हा ठरतो. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जात पंचायतीच्या माध्यमातून एक रुपयात घटस्फोट केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
सिन्नर येथील अश्विनी या महिलेचे अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी येथे विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर सासरच्या लोकांनी केलेल्या छळामुळे अश्विनी माहेरी गेली होती. त्यानंतर सासरच्या लोकांनी सिन्नर आणि लोणी येथे जात पंचायत बसवली. तर वैदू समाजाच्या जात पंचायतीने महिलेशी न बोलता तिच्या अनुप्सथितीत घटस्फोट घडवून आणला. यासाठी सासरच्या लोकांनी एक रुपया भरपाई म्हणून पंचांकडे दिला. तसेच यानंतर पीडित महिलेला पोलिसात जाण्यापासून रोखले. याबरोबरच पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्याय प्रक्रियेत तिला न्याय मिळणे अवघड गेले.
या घटनेनंतर अखेर त्या महिलेच्या पतीने दुसरे लग्न केल्याने तीने असहाय होत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या घटनेला वाचा फोडली. त्यामुळे त्या महिलेने न्यायालयाच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे Adv. रजनी गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सासरच्या आणि जात पंचायतीच्या लोकांविरोधात महिलेने लढण्याची तयारी दाखवली आहे. मात्र " राज्य सरकारने जात पंचायतच्या मनमानी ला आळा घालण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला परंतु जात पंचाच्या दहशत समाजात अजुनही कायम आहे. प्रबोधनासोबत सदर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास जात पंचायतींना मूठमाती देता येईल " मात्र तसे होताना दिसत नसल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.