'मंत्रिमंडळातून गिरीश महाजनांची हक्कालपट्टी करा'

Update: 2017-11-06 15:01 GMT

आपल्या वादग्रस्त वागण्या-बोलण्याने याआधीही वादात अडकलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मद्याच्या ब्रँड्सला महिलांची नावे देण्याचा निर्लज्ज सल्ला देण्यावरून उडालेल्या गोंधळानंतर महिलावर्गाची सपशेल माफी मागितली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या शुभारंभा प्रसंगी महाजन यांनी दारूची विक्री वाढवायची असेल तर तीला महिलेचे नाव द्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून महिलांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाल्याने आणि टिकेची झोड सुरू झाल्यामुळे महाजन यांनी लगेच महिलांची बिनशर्त माफीही मागितली आहे. दारुचे ६५ ब्रँड असून त्यांचा खप होत नाहीये, त्यामुळे त्या मद्याच्या ब्रँड्सचा खप वाढण्यासाठी त्यांना महिलांची आर्कषक नावे दिल्यास त्यांची विक्री वाढेल या हेतूने आपण गंमतीने हे वक्तव्य केलं, असंं अजब स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी माफी मागताना दिलं आहे.

मात्र गिरीश महाजन यांच्या या बेतालबाजीवर महिला वर्गात चांगलीच संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाजनांविरोधात महिलांची आंदोलनं होत आहेत. सांगली,जळगाव, परभणी, नाशिक, सोलापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडेमार आंदोलन केलं. तर बीडमध्येही महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. विविध सामाजिक संघटनाकडूनही विरोध होत आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महिलांची माफी मागून चालणार नाही. महाजन यांना मुख्यमंत्री फडणवीस पाठीशी घालत असून दोघांनीही संयुक्त राजीनामा द्यावा अशी मागणी सांगलीतल्या महिलांकडून करण्यात आली असून जळगावात महाजनांच्या पोस्टरला संतप्त महिलांनी चप्पलांचा मारा केला आहे.

Full View

तर बीडमध्ये दारुबंदीसाठी सातत्याने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनीही गिरीश महाजन यांच्या या बेजबाबदार वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.

Full View

महाजनांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली, मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस महाजनांना मंत्रिमंडळातून त्यंाची हक्कालपट्टी करत नाही तो पर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे मत परभणीतल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

Full View

सर्वसामान्य महिला वर्गातूनही गिरीश महाजनांच्या महिला ब्रँड नेमवरुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाहुयात अशाच काही महिलांच्या प्रतिक्रिया.

Full View

महाजनांची मंत्रीमंडळातून हक्कालपट्टी करावी अशी मागणी राज्यभरातील संतप्त महिलांकडून होत आहे.

गिरीश महाजन यांची वादग्रस्त प्रकरणं

सत्तेची नशा डोक्यात गेली की, भलभल्यांचे डोके फिरते. राज्यात बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सत्ता मिळाल्यामुळे भाजपा मधील दिग्गज नेत्यांचेही असेच काही झाले आहे. त्यामुळेच हे नेते बेताल वक्तव्ये करू लागले आहेत. सध्याच्या सरकारमधील जलसंपदा खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांचेही तसेच झाले आहे. यापुर्वी अनेक बेताल वक्तव्ये करणारे महाजन यांच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे फडणवीस सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मात्र महाजन यापुर्वीही असेच बेताल वागल्याची काही उदाहरणे आहेत.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीम याच्या जवळच्या एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नसमारंभास महाजन हजर राहिल्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. त्यापूर्वी एकदा जळगावमधील एका शाळेच्या कार्यक्रमात ते पिस्तूल घेऊन गेल्यामुळेही मोठा वाद झाला होता. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या पिस्तूलाचा परवाना असल्याचे सांगत वादावर पडदा टाकला होता.

विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे यांनाही महाजन यांना सभागृहात जबाबदारीने बोलण्याबाबत एकदा चांगलेच खडसावले होते तसेच वर्तनात सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा दमही दिला होता. त्यावेळीही मुख्यमंत्री फडणवीसच महाजनांच्या मदतीला धावून गेले होते.

जळगावमधील भुसावळ येथे सन २००२ मध्ये खरेदी केलेल्या ४.९७ एकर जमिनीची माहिती निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामध्ये लपवल्याबद्दलही ते अडचणीत आले होते.

 

 

 

Similar News