अथांग सागराच्या किनाऱ्यावरची रायगडातील गावं तहानलेली

करोडोंच्या निधीची वितरण करणारी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालये अलिबागेत असूनही आजूबाजूची गावं मात्र समस्यांच्या गर्तेत आहेत. बोडणी हे असचं गावं.. पाण्याची टाकी आणि नळ, पण घोटभर पाण्यासाठी महिलांची रात्रंदिवस पळापळ करावी लागत आहे.जीव धोक्यात घालून महिलांना रस्त्यावरील नळावरून पाणी आणावं लागतयं..बोडणीकर महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी? धम्मशील सावंत यांचा गाऊंड रिपोर्ट..

Update: 2022-01-28 09:46 GMT

करोडोंच्या निधीची वितरण करणारी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालये अलिबागेत असूनही आजूबाजूची गावं मात्र समस्यांच्या गर्तेत आहेत. बोडणी हे असचं गावं.. पाण्याची टाकी आणि नळ, पण घोटभर पाण्यासाठी महिलांची रात्रंदिवस पळापळ करावी लागत आहे.जीव धोक्यात घालून महिलांना रस्त्यावरील नळावरून पाणी आणावं लागतयं..बोडणीकर महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी? धम्मशील सावंत यांचा गाऊंड रिपोर्ट..

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यातील आजूबाजूची गावे किती सोईसुविधानी परिपूर्ण व समृद्ध असावीत असा समज अनेकांचा होईल, मात्र वास्तव काही औरच आहे. अलिबाग पासून अवघ्या 10 ते 12 किमी अंतरावर असलेल्या बोडणी गावातील ग्रामस्थ व महिला पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

समुद्र किनाऱ्यालगत वास्तव्यास असलेले व अथांग सागर किनारा रोज डोळ्यांनी पहाणाऱ्या येथील ग्रामस्थ व महिला नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाण्याचा हिशोब बसविताना डोळ्यात पाणी येतेय, अशी परिस्थिती आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शुद्ध व मुबलक पाणी मिळाले पाहिजे ही सरकारची घोषणा कागदावरच विरली की काय? असा प्रश्न पडतोय. बोडणी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी 40 वर्षांपासून संघर्ष करावा लागतोय. गावात पाण्याची टाकी व नळ असले तरी नळाला थेंबभर पाणी येत नसल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती होतेय. सर्व वेळ पाण्यात जातोय, मग कामाला कधी जाणार? कमवनार कसे, खानार काय, जगायचे कसे असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केलाय.

 निवडणुकीत लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षाची नेतेमंडळी येतात, गावाला शुद्ध व मुबलक पाणी देण्याच्या वल्गना करतात, मात्र ही आश्वासने हवेतच विरतात, निवडणूका जवळ आल्या की पाणी बर्यापैकी मिळते, मात्र निवडणूका संपल्या की पाण्याची बोंबाबोंब होत असल्याचे बोडणीतील महिलांनी सांगितले. बोडणी गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला नळ बसविण्यात आला आहे, एमआयडीसी मार्फत मिळणाऱ्या या पाण्यावर येथील ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागतेय. या नळाचे पाणी वेळी अवेळी, दिवसा, रात्री केव्हाही सोडले जाते, त्यामुळे पाण्यासाठी महिलांची मोठी धावपळ व कसरत होते. हंडाभर पाण्यासाठी येथील तरुणी, महिला, वृद्ध महिला पुरुष यांना डोक्यावर हंडे घेऊन जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडून यावे जावे लागते, महामार्गावर वेगवान वाहनांची वर्दळ सुरू असते, त्यामुळे जीवघेण्या अपघाताचा धोका देखील पाणी वाहणाऱ्या लोकांना सातत्याने जाणवतो, येथील नळावर हंडाभर पाण्यासाठी मोठी गर्दी होते. सतत वाद विवाद होतात. शिवाय चिखलात नळाचा कॉक असल्याने याठिकाणी दूषित पाणी पिऊन रोगराई पसरण्याची भीती येथील नागरिकांना सतावते आहे.

बोडणीच्या एका कोळी महिलेने पाण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला, आम्हाला शिमगा, चैत्र वैशाखात पाण्याचा जाम त्रास होतोय असे सांगितले. आता आम्ही आम्ही पाण्यासाठी वणवण भटकतो, कसतरी कुठूनतरी पाणी मिळवतो,निवडणूक आल्या की नेतेमंडळी येतात भाषण करतात, तेव्हा पाणी सोडतात, पण निवडणूका संपल्या मत घेतली की मग आमच्याकडे ढुंकून पण बघत नाहीत, मग पाण्याचे हाल होतात. शिमग्याच्या वेळेत रखरखत्या उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी त्रास करावा लागतो. नळाला पाणी कधी एकदिवस आड तर कधी दोन चार दिवस, व जास्त दिवस येतच नाही, मग कपडे व पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते.बोडणी गावात सर्व काही आहे, पण प्यायला पाणी नाही, गावाला लागून गंगा आहे, तिथं नमस्कार करून पाण्यासाठी धावाधाव करावी लागतेय.

येथील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा घरत यांनी सांगितले की बोडणी गावातील महिलांना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नळाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागतेय, इथं रस्त्यावरून सतत वेगवान वाहने जातात येतात, अशात पाण्यासाठी महिला लहान मुले व वृद्धांना रस्ता ओलांडून जावे लागते, त्यामुळे अपघाताचा धोका सतत जाणवतो. डोक्यावर हंडा व भांडी घेऊन जाताना लगबगीत वाहनांची धडक बसून जीव जाण्याची शक्यता आहे, याला जबाबदार कोण राहील? जिथं पाण्याच्या नळाचा कॉक आहे, तिथं सांडपाणी व चिखल होत असून येथील पाणी पिण्यास वापरणे हे आरोग्याला अपायकारक देखील ठरू शकते असे घरत म्हणाल्या. प्रशासनाने संबंधित विभागाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली.

येथील नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या आणखी एका महिलेने पाण्यासाठी होणारी परिस्थिती सांगितली. आम्हाला प्यायला पाणी पाहिजे, दुसरं काही नको, मताच्या वेळेला बरेचजण येतात व मोठमोठ्या वार्ता करतात, पण नंतर धुंकूनही बघत नाहीत. प्रत्येकवेळेला आमची बोळवण करतात, आमच्या भागात कुठं तलाव , विहीर असल्या तरी त्याला पाणी खारट असत, जे पिऊ शकत नाही व कोणत्या कामाला वापरू शकत नाही, मग नळावर जेव्हा पाणी येते तेव्हा गर्दी उसळते, वाद विकोपाला जातात, पाणी मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो, यात घराघरात भांडण होतात. 

जिल्ह्यातील अनेक भागात पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. विशेषतः सागर किनाऱ्यावर च्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक सतावतो आहे, अशात शासनाच्या नळपाणी पुरवठा योजना इथपर्यंत पोहचवण्यात सरकारला अपयश आलेय असच म्हणावं लागेल. पृथ्वीचा दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला असल्याने समुद्र हा पाणी मिळविण्याचा सर्वांत मोठा स्त्रोत आहे, ; पण समुद्राचे पाणी खारट असल्याने ते पिण्यासाठी अयोग्य असते, ही मोठी अडचण आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी व समुद्राचे पाणी पिण्यासाठी योग्य करण्यास स्वस्त दरातील तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न जगभरात शास्त्रज्ञ करीत असले तरी अद्याप त्यांना यश आलेले नाही.  सागराच्या पाण्यातून मीठ बाजूला काढण्याची प्रक्रिया यासाठी उपयुक्त असली तरी, बहुतेक ठिकाणी ती करणे शक्‍य नसते. यावर विचार करताना शाळेतील प्रयोगशाळेत काम करण्यास सुरवात केली. मात्र अद्याप ठोस उपाय न झाल्याने सागर किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना पाणी आणण्यासाठी पायाला भिंगरी लावून वणवण फिरावे लागते आहे, व लागणार असल्याचे निश्चित झालेय.

आम्हाला कोणी पाणी देईल का पाणी अशी आर्त हाक येथील महिला भगिनी देतात. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असून मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी रायगड जिल्हा परिषद, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन भवन , याठिकाणी असून करोडोंच्या निधीचे नियोजन व वितरण येथून होते, मात्र अलिबाग नजीकच्या गावांना आजही पाण्यासारख्या मूलभूत व जीवनावश्यक प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतोय, हे दुर्दैव्य, आमच्या पिढ्यानपिढ्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष व त्रास भोगत आल्या, आज देखील आमची परिस्थिती बिकट आहे. आमच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार? आमच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार ?असा सवाल बोडणीतील महिला व ग्रामस्थ विचारताना दिसतायेत.




Tags:    

Similar News