डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात झाली होती वतनदार महार परिषद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर शहरात केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानिमित्ताने त्यांना मॅक्स महाराष्ट्र वैचारिक अभिवादन करीत आहे.

Update: 2022-04-14 03:17 GMT

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर विविध परिषदा आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील आताचे मिलिंद नगर आणि तत्कालीन थोरल्या राजवाड्यातील पंचाच्या चावडीत 26 व 27 नोव्हेंबर 1927 रोजी वतनदार महार परिषद संपन्न झाली होती. या परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी जिवाप्पा सुभानराव ऐदाळे होते तर चिटणीसपदी उध्दव धोंडो शिवशरण होते. खजिनदारपदी हरिभाऊ तोरणे होते तर परिषदेचे कार्यकारी सदस्य म्हणून विश्वनाथ मेघाजी बनसोडे, मुकिंदा कुंडलिका बाबरे, निवृत्ती तुकाराम बनसोडे, रामा तुकाराम सरवदे, पापा सोमाजी तळभंडारे, विठ्ठल  सरवदे, भिकाजी गुराप्पा तळभंडारे, तुकाराम अंदुबा बाबरे, बळी तुळजाराम तळमोहिते यांच्यासह मान्यवर हजर होते. अशी माहिती आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक संपादक किरण बनसोडे यांनी दिली.

परिषदेला शहर आणि जिल्ह्यातून पाच हजारच्यावर जनसमुदाय उपस्थित होता

सोलापूरची ही परिषद ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मानले जाते. दिनांक 26 नोव्हेंबर 1927 रोजी शनिवारी पाच वाजल्यापासून लोकांची अलोट गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. बरोबर 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या परिवारातील मंडळीसह सभामंडपात आले होते. त्यांच्या येण्याबरोबर सर्व मंडळी सभामंडपात आली होती. त्यांच्या येण्याबरोबर सर्व मंडळींनी उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनाची आस लागली होती. अखेर ते दर्शन पंचाच्या चावडीतील सभामंडपात झालं. या परिषदेसाठी शहर आणि जिल्ह्यातून साधारणतः 5 हजारापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता. स्वागत अध्यक्ष जिवाप्पा सुभानराव ऐदाळे यांनी स्वागतपर भाषण केले.

अन्यथा अस्पृश्य जनतेला वेगळा निर्णय घ्यावा लागेल

स्वागत अध्यक्ष जिवाप्पा ऐदाळे यांचे स्वागतपर भाषण झाल्यानंतर अध्यक्षीय भाषणात विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरक असा संदेश दिला. उपस्थित लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकताना सभास्थानी चित्र बसल्यासारखे एक टक बसून कानात जीव आणून भाषण ऐकत होते. ही परिषद महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण अशीच होती. या परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे या परिषदेचे भाषण ऐतिहासिक असे ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य बांधवांना एक मौलिक संदेश दिला. महार वतन सोडा हे सांगत असतानाच सत्याग्रह विरुद्ध बहिष्कार हे जे स्पृश्य वर्गाने हत्यार उपसले आहे, त्याला कोणीही भिणार नाही. अस्पृश्य वर्ग आता जागृत झाला आहे. स्पृश्य वर्गाच्या बहिष्काराच्या अस्त्राला आणि शस्त्राला कदापी भिणार नाही. निर्भयपणे समतेच्या संगरामध्ये अस्पृश्य जनता आता सहभागी होण्यास कुचरणार नाही. समतेसाठी अस्पृश्य समाजबांधव आता बंड पुकारण्यास सज्ज झाले आहेत. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

महारवतन सोडा अस्पृश्य बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला

या परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य बांधवांना महारवतन सोडा असा मौलिक संदेश दिला होता. अस्पृश्य बांधवांनी आपली गावे सोडून स्वतःची वसाहत निर्माण करून रहायला शिकले पाहिजे. स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा पाया स्वतःच रचला पाहिजे. स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खादी विणा असा एक स्वतंत्र व्यवसाय सुचवला होता. अस्पृश्य समाजातील प्रत्येकाने खादीचे कपडे घातल्यास तो रोजगार आपल्या अस्पृश्य बांधवांना खादी विणण्यातून मिळू शकतो. असा मौलिक सल्ला ही त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता.

या परिषदेत महत्वपुर्ण आठ ठराव करण्यात आले होते

या परिषदेत अस्पृश्य जनतेच्या वतीने आठ महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले होते. त्याला उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली होती. त्यापैकी महत्वाचा ठराव म्हणजे हिंदू समाजातील समाजघटकांनी चातुरवर्णीय पद्धती बंद करून एकच वर्ण कसा करता येईल यावर कृतिशील अंमलबजावणी तातडीने करावी. त्यास जर विलंब झाला तर अस्पृश्य जनतेला धर्मांतरसारखा वेगळा विचार करावा लागेल. असा महत्वपूर्ण ठराव किंबहुना इशाराच त्यावेळी या परिषदेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. त्याचबरोबर महारवतन सुधारणा कायदा मुंबई असेंब्लीत मंजूर होणार होता. त्यासंदर्भातही त्याला पाठींबा देण्याचा महत्वपूर्ण ठराव या परिषदेत करण्यात आला होता. यासाठी आवर्जून तत्कालीन  डॉ. माणिकचंद शहा या परिषदेला उपस्थित होते. महारवतन सुधारणा कायद्यास पाठींबा असल्याचा ठरावही या परिषदेत करण्यात आला होता. 

महत्वाचा हा केला ठराव

तेव्हा स्पृश्य सवर्णांनी आपली दुराग्रही भूमिका सोडली पाहिजे. माणसाला माणूस म्हणून वागवले पाहिजे. चातुरवर्णीय व्यवस्था बंद केली पाहिजे. एक वर्ण निर्माण केला पाहिजे.सर्वांना समान अधिकार मिळायला पाहिजेत. ही भूमिका आता स्पृश्य समाजाने घेतली पाहिजे. अन्यथा अस्पृश्य जनतेला वेगळा निर्णय घ्यावा लागेल याशिवाय दुसरा पर्याय नाही. धर्मांतराचा निर्णय घ्यावा लागेल असा ठराव करण्यात आला होता.

445 रुपये लोकवर्गणी प्रदान

या परिषदेचे वैशिष्ट्ये म्हणजे शहर व जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या समाजबांधवांनी त्यावेळी लोकवर्गणी जमा करून सुमारे 445 रुपये लोकवर्गणी बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यासाठी दिली होती. हे या परिषदेचे वैशिष्ट्ये होते. याच अनुषंगाने दुसरी सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषद ऐतिहासिक आणि क्रांतिकारक ठरली होती.

Tags:    

Similar News