भीक मागणा-या कुटुंबातला ‘उद्योगपती’

Update: 2023-06-02 16:30 GMT

दुस-यांच्या घरात जेवण तयार झालं आणि त्यांनी भीक म्हणून ते जेवण खायला दिलं तरच त्यांच्या पोटाची आग शांत व्हायची. मात्र, त्याच्या भीक मागून जगायचं नाही, हे त्यानं मनोमन ठरवलं होतं. त्यासाठी त्यानं पोलीस भरतीपासून ते थेट आर्मी भरतीपर्यंत अथक प्रयत्न केले. त्यात अपयश आलं. पण तो खचला नाही, त्यानं प्रयत्न सुरूच ठेवले. आणि आज तो महाराष्ट्रभर फिरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. ज्याचा जन्मच संघर्षापासून सुरू झाला तो आज जगण्यासाठी संघर्षच करतोय.

हा काही साधारण टेम्पो नाही. पांडुरंग सखाराम देसाई नावाच्या या गृहस्थाचं हे घर आणि दुकान आहे. पांडुरंग हा सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातल्या नागठाणे गावचा रहिवाशी आहे. पांडुरंगचं कुटुंब सध्या याच गावात राहतंय. दहावीपर्यंत शिकलेल्या पांडुरंगला भीक मागून उदरनिर्वाह करणं पसंत नव्हतं. त्यासाठी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्यानं इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पोलीस भरती किंवा सैन्यात भरती होण्याचं पांडुरंगचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यानं प्रयत्नही केले खरे पण मात्र त्याला यश काही मिळालं नाही. त्यामुळं तो खचला नाही.

1992 च्या सुमारास त्यानं मुंबईतल्या दादर इथं एका कारखान्यात बुट, चपला शिवण्याचं प्रशिक्षण घेतलं. यादरम्यान आईच्या निधनानंतर तो गावी परतला. जगण्यासाठी त्यानं चपला-बूट शिवून त्याच्या विक्रीला सुरूवात केली. बदलत्या फॅशनमध्ये पांडुरंगच्या चपला-बूटांची स्थानिक व्यापा-यांनी खरेदी बंद केली. त्यामुळं स्वतःच्या घरगुती कारखान्यातील कारगिरांनी बनविलेल्या चपला आणि बुटांची विक्री करण्यासाठी पांडुरंगने एक टेम्पो खरेदी केला आणि गावोगावी जाऊन विक्रीला सुरूवात केली. आता पांडुरंग आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालाय. त्याच्या मुलीच लग्न झालं, जावई इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीला आहे. पांडुरंगने मुला-मुलींना चांगल शिक्षण दिलं. पांडुरंगचा मुलगा स्वतःचा व्यवसाय करतोय.

अशाप्रकारे भीक मागून जगणारं एक कुटुंब आता व्यावसायिक होऊन स्वाभिमानाचं जीवन जगत आहे. मात्र, पांडुरंगच्या वाट्याला जे जगणं आलं ते भयंकर होतं. पांडुरंगचे वडील हे याच गावच्या पंचक्रोशीत भीक मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. पांडुरंगच्या वडिलांनी 5 बायकांशी लग्न केलं. कारण आजरपणा मुळे आधीच्या चार बायकांचं निधन झालं. त्यात पांडुरंगची आई सखाराम यांची पाचवी पत्नी होती. तर पांडुरंगच्या आईचीही यालग्नाआधी 2 लग्न झाली होती.

तिचं हे तिसरं लग्न होतं. ती 40 वर्षांची असतांना पांडुरंगचा जन्म झाला. बाळाला दुध मिळालं पाहिजे, यासाठी पांडुरंगचे वडील स्वतः उपाशी झोपायचे आणि पत्नीला भीक मागून आणलेलं जेवण खावू घालायचे. अशा परिस्थितीत जन्मलेल्या पांडुरंगला आपला पूर्वाइतिहास आजही आठवतो. त्या जाणिवेतूनच पांडुरंग गरजूंना चपला-बुटं अगदी मोफत देत असतो. नशिबी आलेल्या दुःखावर रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढत स्वतःच विश्व निर्माण करणारा पांडुरंग हा अनेकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे.


Full View

Tags:    

Similar News