शिक्षक दिन विशेष : प्रेरणादायी श्रीमती नंदा नरहरे

Update: 2018-09-05 10:59 GMT

असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी वडवळ नागनाथ येथून जवळच असलेल्या हाळी खुर्द येथील ऐंशी टक्के शरीराने दिव्यांग असलेल्या कर्तृत्ववान नंदा नरहरे या शिक्षिकेची आहे. पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एका जिद्दी, हुशार, कष्टाळू व समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या एका शिक्षिकेची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती नंदा इराप्पा नरहरे या सहशिक्षिका म्हणून एक तप झाले कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव हाळी खुर्द असल्यामुळे आपण गावाच्या ॠणात आहोत याची जाणीव ठेवून ज्ञानदानासोबतच सामाजिक कार्यातही सहभागी होतात.

जवळपास ८०% अपंगत्व असतानाही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता शिक्षण पूर्ण करुन २००३ साली नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील थडीसावरगाव येथे सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. अवघ्या दोन वर्षातच अपंगत्व व अडचणी लक्षात घेऊन खास बाब म्हणून शासनाने त्यांची बदली मुळ गावी हाळी खुर्द येथे केली. या शाळेत रुजू झाल्यापासून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. साडेपंधरा वर्षाच्या सेवा काळात स्वतःच्या कल्पकतेने अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या आहेत. यासोबतच २०११ साली झालेल्या जणगणनेत उत्कृष्ट कार्य करून राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवला आहे. स्वतःच्या खर्चातून सुसज्ज असा ज्ञानरचनावादी वर्ग तयार करून मुलांना अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य अविरत सुरु आहे. सद्याला त्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या तिसरी वर्गाला अध्यापन करतात. वर्गातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल पद्धतीने आधुनिकतेची नाळ जुळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे. एक चित्र, एक शैक्षणिक साहित्य हजार शब्दांचे कार्य करु शकते. त्यामुळे त्यांनी शाळेमध्ये विविध प्रकारची शैक्षणिक साहित्य तयार केली आहेत. टाकाऊपासून विविध प्रकारची टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे. या साहित्याचा अध्यापनात नियमित वापर केला जातो.

 

मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता व्यवहार ज्ञान ही शिकवले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या बरोबरच शाळेत पालक सभा, महिला मेळावा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात. नंदा नरहरे यांनी अनेक वेळा रक्तदान करून गरजूंना मदत केली आहे. त्या उत्कृष्ट सुत्रसंचालनही करतात. अध्यापन पूरक शैक्षणिक साहित्य, कार्ड, चार्ट स्वतः बनवली आहेत. नवोदय, शिष्यवृत्तीचे जादा वर्ग घेऊन अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. शिक्षण देणे व शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविणे इतकेच कार्य करून न थांबता सामाजिक ऋण म्हणून शाळेतील गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना मदत करतात.आजपर्यंत शिकविलेल्या विद्यार्थ्यांमधून बरेच विद्यार्थी इंजिनिअर, शिक्षक, व्यापारी, आदर्श शेतकरी, आदर्श नागरिक म्हणून समाजात सन्मानाने वावरताना दिसतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्यात असलेल्या सुप्त गुणाद्वारे शालेय, सामाजिक, सांस्कृतिक, बाबतीत जणू त्या शाळेतील मुलांच्या व गावकऱ्यांच्या ‘ताई’च बनल्या आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना २०११ साली पंचायत समितीच्या तालुकास्तरीय गुण गौरव आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नंदा नरहरे यांचा हा प्रवास निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

Similar News