ऑगस्ट महिना हा खास अवयवदान जनजागृती महिना मानला जातो. खासकरुन या महिन्यात आपल्या प्रिय व्यक्तीचं अवयवदान करत अनेक कुटुंब समाजासमोर आदर्श ठेवतात. असाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे ठाण्यातील झाडे कुटुंबाने. झाडे कुटुंबातील विकास झाडे यांची २० वर्षाची मुलगी प्राची झाडे हिचा शनिवारी एकतर्फी प्रेमातून आकाश पवार या इसमाने निर्घृण खून केला.या हल्ल्यात प्राचीला आपला जीव गमवावा लागला. नेत्रदान कऱणं ही प्राचीची इच्छा होती. तिच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंबियांवर दु: खाचा डोॆगर कोसळला पण तरीही आपले दु: ख बाजूला ठेवून त्यांनी आपल्या मुलीच्या इच्छेखातर तिचे डोळेदान केले. प्राचीने आधीपासूनच नेत्रदान करण्याचा निर्णय कुटुंबीयांना सांगितला होता.
माय मेडिकल मंत्राशी बोलताना प्राचीची बहीण प्रिया म्हणाली, “प्राची या जगात नाही. पण, ती तिच्या डोळ्यांनी मारेकऱ्याला होणारी शिक्षा पाहू शकेल. फक्त, ज्या व्यक्तीला तिचे डोळे दान केले जातील, त्याला याची माहिती नसेल की हे डोळे प्राचीचे आहेत. आम्ही सर्वांनीच नेत्रदान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयात डोळे दान केलेत. देशात लाखो गरजू आहेत, ज्यांना अवयवांची गरज आहे. प्राची या जगात नसली तरी ती तिच्या डोळ्यांनी हे जग बघत राहील."
“प्राचीच्या डोळ्यांनी एखाद्या व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. तो नव्याने जग पाहू शकेल. अवयवदान, नेत्रदान याबाबत जनजागृती व्हायला हवी. लिव्हर, किडनीसाठी अनेक लोकं प्रतिक्षेत आहेत. आपल्या अवयवदानाने दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकतं. जगण्याची नवसंजीवनी मिळू शकते.”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्राचीचे वडील विकास झाडे म्हणाले, “प्राचीची पहिल्यापासूनच नेत्रदान करण्याची इच्छा होती. नेत्रदान केलं तर चांगलं होईल या विचाराने आम्ही प्राचीचे डोेळे दान केलेत. कमीतकमी तिच्या रुपात आम्ही दुसऱ्या कोणत्या मुलीला किंवा व्यक्तीला बघू शकतो.”
भारतात अवयवदानाबद्धल लोकांचे बरेचसे गैरसमज तसेच वेगवेगळे विचार आहेत. भारतातील १० लाख लोकांमध्ये ०.५८ व्यक्तीचं फक्त अवयवदानाचा निर्णय घेतात. झाडे कुटुंबियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ्प्रत्येकाने अवयवदान करुन ज्यांना अवयवांची गरज आहे अशांना मदत करुन त्यांना नवे आयुष्य द्यावे.