‘मोदी-शहा’ दराऱ्याची भाजपलाही भीती ?

Update: 2019-05-24 10:46 GMT

शिस्तीचा पक्ष, पार्टी विथ डिफरन्स अशा भाजपला गेल्या पाच वर्षात मिळालेलं देशव्यापी यश आणि पक्षात वाढलेलं प्रचंड इनकमिंग या सर्वांचं श्रेय राजकीय विश्लेषक हे मोदी-शहा यांनाच देतात. तर दुसरीकडे मोदी-शहा जोडीमुळं दुसऱ्यांद केंद्रात भाजपला घवघवीत यश मिळालंय. त्यामुळं आता भाजपमध्ये पुन्हा मोदी-शहा दराऱ्याची भीती आता मोठ्याप्रमाणावर भाजमधीलच अनेकांना वाटायला लागलीय.

2014 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदींनी भाजपसंस्कृतीला अऩुसरूनच पण त्यापुढं जात शिस्त आणायला सुरूवात केली. आठवड्यातील एका दिवशी ठरल्याप्रमाणे पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक, खासदारांच्या कामांचा लेखी लेखाजोखा सादर करणं, त्यातही दररोज केलेल्या कामांची माहिती पक्षाला देणं अशा गोष्टींचा समावेश होता. तर दुसरीकडे मंत्र्यांनाही मोदींनी कामाच्या पद्धतीबाबत काही नियम घालून दिले होते, त्याच्या चौकटीतच मंत्र्यांना कामं करावी लागली होती. त्यामुळेच उमाभारती, रावसाहेब दानवे अशा मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रीपद सोडून पक्षसंघटनेत कामाला सुरूवात केली.

मोदींनी सरकारच्या कार्यपद्धतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे सर्वात विश्वासू सहकारी अमित शहा यांच्याकडे पक्षाचं संघटन वाढवण्याची जबाबदारी दिली. त्यामुळं मोदी-शहा यांनी एकमेकांच्या कामकाजात हस्तक्षेप केला नाही, उलट परस्परांच्या संमतीनंच पक्ष आणि सरकारसाठी आवश्यक ते निर्णय घेतले आणि त्याच्या यशापयशाचीही जबाबदारी स्विकारली. त्यामुळं भाजपमधील ज्येष्ठ नेते असो की आरएसएस या दोघांनीही मोदी-शहा यांच्या निर्णयात फारसा हस्तक्षेप केलेला नाही. परिणामी मोदी-शहा म्हणतील ती पूर्वदिशा असं चित्र सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळं या दोघांच्याही दराऱ्याखाली सध्या संपूर्ण भाजप दिसत आहे. अर्थात हा दरारा पक्षहितासाठीच असल्यानं त्याविरोधात सार्वजनिकरित्या फारसं कुणी बोलत नसलं तरी ज्यांनी मोदी-शहा यांच्या कार्यपद्धतीला विरोध केला ते शत्रुघ्न सिन्हा, नवज्योतसिंग सिद्धू, यशवंत सिन्हा, नाना पटोले, किर्ती आझाद अशा नेत्यांची राजकीय कारकीर्दच धोक्यात आलेली आहे. त्यामुळं विरोध असला तरी आजघडीला राजकीय नुकसान करून घेण्यापेक्षा मोदी-शहा यांच्या दराऱ्याखालीच सध्या भाजपमधील बहुतांश नेते, कार्यकर्ते पक्षात वावरतांना दिसत आहेत. मात्र, कुठल्याही पक्ष-संघटनेत व्यक्तीपेक्षा विचारधारा महत्त्वाची मानली जाते, त्यामुळं मोदी-शहा यांचा एकछत्री अंमल हा भाजपसाठी धोकादायक असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमध्ये भाजपपेक्षा मोदी-शहा यांच्यामुळेच विजय झालाय अशा आशयाच्या हेडलाईन्स वाचायला, बघायला मिळालेल्या आहेत. यावरून संपूर्ण भाजपवर सध्या मोदी-शहा जोडीचं किती वर्चस्व आहे, याची प्रचिती येते. त्यामुळं आगामी काळामध्ये मोदी-शहा सांगितलं तसं भाजपला चालावं लागेल की भाजपच्या ध्येयधोरणानुसारच मोदी-शहा ही जोडगोळी काम करेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

Similar News