बेरोजगारीवर घाव घालणाऱ्या रत्ना देशमुख…

कोरोना काळात लोक बेरोजगार होत असताना एका महिलेनं बेरोजगारीवर कशा पद्धतीने घाव घातला आहे? बरोजगारीवर आपणही कशा पद्धतीने मात करु शकतो हे जाणून घेण्यासाठी पाहा आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांचा स्पेशल रिपोर्ट

Update: 2021-06-22 13:35 GMT

गेल्या दीड वर्षापासून जगावर Covid 19 चं संकट आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक लोक बेरोजगार झाले तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक सामाजिक संस्थांनी या लोकांना मदतीचा हात दिला परंतू सामाजिक संघटना तरी लोकांनी किती दिवस मदत करणार? त्यामुळे बेरोजगारांना व्यवसायिकदृष्ट्या सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हीच बाब पुणे जिल्ह्यातील वासुली या गावातील रत्ना देशमुख यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्यावतीने 800 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आणि समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

यासंदर्भात आम्ही रत्ना देशमुख यांच्याशी बातचीत केली असता त्या सांगतात... "मी या क्षेत्रात येण्यामागे कारण एकच आहे की, आपण ज्या परिस्थितीत राहिलो, वाढलो तीच परिस्थिती इतर कोणावर येऊ नये. संस्था 2104 मध्ये रजिस्टर केली. त्या आधी 2009 पासून छोटी मोठी कामे सुरू होती. आमचा ग्रामीण भाग असल्याने महिला कशा सक्षम होतील? यावर जास्त जोर देणे महत्त्वाचे वाटले व त्या दिशेने पाऊलं उचलली, ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाची माहिती देऊन तो का करणे गरजेचे आहे? हे पटवून देण्यात आले.




 


प्रत्येक गावात बचतगटांची स्थापना केली. आमच्या प्रत्येक गावांना ठाकर समाजाची वाडी लागून आहे. तिथे देखील महिलाचे बचत गट तयार केले. बचतगट तर तयार केले पण या महिलांना स्वतःच्या पायावर देखील उभे केले पाहिजे. म्हणून फोर्स मार्शल कंपनीबरोबर पेपर बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण 15 ते 16 गावामध्ये दिले. अनेक महिला शिकल्या, त्यात कंपनीने महिलांना मार्केट देखील उपलब्ध करून दिले. अशा 1200 महिलांना प्रशिक्षण दिले. त्यातल्या 800 महिलांना स्वतःचा रोजगार उपलब्ध होऊन महिन्याला 8 हजार कमवत आहेत.

त्यानंतर शिवनक्लासचे प्रशिक्षण देऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं दिली. त्यानंतर पार्लरचे क्लास सुरू करून त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला व आजपर्यत क्लास सुरू असून अनेक या माध्यमातून ट्रेनर तयार होऊन स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत.

ज्या महिला प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. त्या स्वतःचे व्यवसाय करत आहेत. अशा अनेक महिला आहेत. कोरोनाच्या काळात खरं महिलांनीच घराची जबाबदारी उचलली याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे.

असं रत्ना यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं. दिवाळीच्या काळात महिलांना फराळाचे काम देऊन त्यांची दिवाळी अगदी आनंदात गेली. काही महिलांना मार्केटमध्ये कसे जावे? स्वतःला सिध्द कसे करावे यासाठी दिवाळीचे स्टॉल पिंपरी चिंचवड या भागात लावले, सुमारे 40 स्टॉल लावले गेले. त्याचा महिलांना खूप फायदा झाला. माझा एकच उद्देश आहे की, महिला स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहीजे. कोणताही प्रसंग आला तरी ती धीराने सामोरी गेली पाहिजे. प्रत्येक वेळी चूल आणि मूल इतकेच न करता म्हणजे याचा अर्थ आपलं कुटूंब सोडून तिने हे सर्व केले पाहिजे तर असं मुळीच नाही, आधी प्राधान्य कुटूंबाला देऊन आपणही सक्षम झाले पाहिजे हीच इच्छा आहे."

आम्ही या संदर्भात या उपक्रमात सहभागी असलेल्या काही लाभार्थी महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या,.

उषा पावडे सांगतात की, "माझी आणि ताईची ओळख एका कार्यक्रमात झाली. ताईच्या बातम्या वाचून त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती व ती पूर्ण झाली. ताई बरोबर काम करण्याची इच्छा होती. ती आज प्रत्यक्षात येणार असे वाटले व तसे झालेही. ताई अगदी कोणतंही काम असलं तरी खूप मनापासून व त्याचा शेवट होईपर्यंत करतात. ताईमुळे आज खूप महिलांना रोजगार मिळाला आहे. काही मुलींना शिक्षणाचा वाव मिळाला आहे. काही महिला सक्षम झाल्या आहेत. ताईंनी आम्हा महिलांना स्वतःचा आत्मविश्वास जागृत करून दिला आहे."

नीलिमा थरकुडे सांगतात.. "रत्नाताईचे आधी मनपूवर्क धन्यवाद. त्यांनी माझ्यात असणाऱ्या कलेला रोजगाराच्या स्वरूपात वाव दिला आहे. व मी आज स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी आहे. ताईंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती की, ब्युटीपार्लरसाठी ट्रेनर पाहिजेत, ते पाहून मी ताईंना संपर्क केला, ताईंनी सर्व नियम अटी सांगितल्या. पण त्यात मला एक खटकले की, जो बेसिक कोर्स आपण बाहेर 10 ते 15 हजार भरून करतो. तोच ताई 2700 रुपये मध्ये कीट सहित कशा देतात? ताई तुम्हाला कसे परवडेल? त्यावर ताई बोलल्या की मी स्वतःसाठी व्यवसाय करत नाही. तर समाजाचे देणे लागते. त्यामुळे हे करत आहे.




 


 


इथे नफा तोटा येतच नाही. मला काय उत्तर द्यावे समजले नाही. आणि मी batch करायला सुरुवात केली. प्रचंड प्रतिसाद मिळाला. माझ्या 5 ते 6 batch झाल्या व प्रत्येक batch मधून मला 15000/- रु मिळाले. ताईमुळे माझा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढला. कोणतीही वेळ आली तरी मी माझं घर नक्कीच सावरू शकते याची खात्री मिळाली."

शुभदा कडूसकर सांगतात... ताईची माझी ओळख खूप जुनी आहे. सुरुवातीला ताई आमच्या गावात आल्या होत्या. थोडं मी दुर्लक्ष केलं. पण जशी मी ताईच्या सानिध्यात आले. तसं सर्व गोष्टी शिकत गेले. ताईमुळे काम करण्याची इच्छा झाली. माझा शिवनक्लास झालेला त्याचा उपयोग ताईंनी खूप मस्त करून घेतला व त्याचा फायदा जास्त मला लॉकडाऊन मध्ये झाला.

माझ्या पतींची नोकरी गेली होती. 2 महिने छान गेले पण पैशाची चणचण जाणवली. ताईकडून मास्क शिवण्याची ऑर्डर मिळाली व थोडासा भार हलका झाला. ताईमुळे बेरोजगार महिलांना नक्कीच आधार मिळत आहे.."

राधाबाई सांगतात... मला लिहिता वाचता येत नाही. मी शेतकरी बाई आहे. शेती करताना 4 महिने असेच रिकामे असतात. त्यात घरात गरिबी, काम केलं तर पोटाला खायला मिळतं. रत्नाताई कागदाच्या पिशव्या शिकवायला आल्या होत्या. त्या शिकायला मी पण गेले पण लिहिता वाचता येत नाही म्हणून मी नाराज झाले. पण ताईने एक भारी आयडिया सांगितली ,प्रत्येक मापाची जाड पट्टी कापून दिली फक्त ती कुठे अन कशी वापरायची ती सांगितली आणि मी पिशव्या करायला शिकले, ताईने त्यासाठी बाजार पण सांगितला, मी तयार केलेल्या पिशव्या फक्त वासुली फाट्यावर नेऊन द्यायच्या असतात मग तिथून एक कंपनी येते अन घेऊन जाते. ताईमुळे मी निरक्षर असून पण पिशव्या करायच्या शिकले. महिन्याला 8000/-कमावते. खरंच आमची ताई लय निराळी हाय, सगळ्यांना समजून घेणारी हाय ".

वर्षा जगताप सांगतात,. 'दिवाळीचे स्टॉल लावणे आहे, कोणाला ला असतील तर मला कळवा' असा बॅनर ची Facebook वर जाहिरात आली होती, म्हणून कॉल केला व दिवाळीचा स्टॉल बुक केला. त्यावेळी तर नक्कीच फायदा झाला व त्यातून अनेक लोकांशी ओळखी झाल्यामुळे आज कोरोनाच्या काळात देखील मला त्या ओळखीचा फायदा होऊन माझा या काळात खूप फायदा झाला. असं वर्षा जगताप यांनी म्हटलं आहे.



 


अश्विनी जाधव सांगतात, "रत्ना ताईंच्या अंतर्गत बेसिक पार्लरचे class वडगाव येथे घेण्यात आले. तिथे मी class जॉईन केला, कमी फीमध्ये कीट सहित शिकवण्यात आले. कमी फी असली तरी शिकवण्यात काहीच कुचराई झाली नाही. ताईंच्या अंतर्गत प्रमाणपत्र मिळाले त्यामुळे मी आज माझ्या पायावर उभी राहिली आहे . रत्नाताई वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करत होत्या. व्यवसाय कसा उभा करायचा व कसा मार्केट मध्ये टिकवायचा याची देखील उत्तम माहिती दिली. ताई अशाच पाठीशी उभ्या असाव्यात हीच देवाकडे प्रार्थना."

सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या ओळीप्रमाणे रत्ना देशमुख यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेले हे कार्य निश्चितच दिशादर्शक आहे व या कार्याचे वासुली सह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

Tags:    

Similar News