Ground Report : तमाशा कलावंत मेल्यावर तमाशा जिवंत कसा राहील ?

सांस्कृतिक मातीचा उल्लेख करणाऱ्या पुढाऱ्यांनो तमाशा कलावंतांची माती व्हायची वाट पाहणार का ?, असा सवाल का निर्माण झाला आहे. वाचा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Update: 2021-04-12 01:30 GMT

जत्रेनिमित्त गावातील तमाशा सुरू होतो. मटणाच्या जेवणावळी नंतर आलेले पै पाहुणे तमाशा पाहायला मैदानात जमतात. तमाशात पहिल्यांदा गण तो सुरू होतो. लवकर यावे सिध्द गणेशाआतुन कीर्तन वरून तमाशा गणरायाला वंदन करून तमाशा हळूहळू रंगू लागतो. स्टेजवर गवळण सुरू होते. गवळणींची गोकुळातुन मथुरेला जाण्याची घाई सुरू असते. एका एका गवळणीला हाक मारली जाते. शेवटी ठकू मावशीला आवाज दिला जातो. ठकू मावशी ही साडी नेसलेली पुरुषच असते. अग ये ठकू मावशे मावशी आवाज देते यायले यायले

पुढची कलाकार म्हणते आम्हाला तरी कळवायच मावशी पुन्हा म्हणते यायला मी काय जर्शी हाय का ? कष्टाने थकलेली मंडळी या जोकवर हसू लागतात. टाळ्या शिट्या पडू लागतात. कलाकारांना जोश येतो. हे संवाद फेक करत करत स्त्री कलावंत गवळणीवर नृत्य सादर करतात. शेवटी वगनाट्य होते. या कलेला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळायचा.


तमाशा हे केवळ मनोरंजन नाही तर ते प्रबोधनाचे देखील साधन आहे. या वगनाट्यातून बापू बिरू वाटेगावकर,विष्णू बाळा, यांच्यासह अनेकांनी जीवनचरित्रे या लोकांनी माध्यम विकास नसलेल्या काळात घराघरात पोहचवली होती. अगोदरच संकटात असलेल्या या तमाशाला गेल्या वर्षी पासून अवकळा प्राप्त झाली. लॉकडाऊन मुळे सलग दोन हंगाम वाया गेल्याने आता जगायचं कसं हा प्रश्न या कलाकारांना पडला आहे.

संभा आगर यांचा छाया नागजकर नावाचा तमाशा फड आहे. ते सांगतात लॉकडाऊनमुळे आमच्यावर विष पिऊन मरायची वेळ आली आहे. आमची कला सोडली तर आमच्याकडे विकण्यासारखे काहीही नाही. कलेवर असलेले आमचे जीवन आज उध्वस्त झालेले आहे. अनेकांना मदतीसाठी याचना केली अनेकांना कागदपत्रे पाठवली, डोळे वाटेला लाऊन मदतीची वाट पाहिली पण कुणीही मदतीला आले नाही.

त्यांच्या या प्रतिक्रियेवर आम्ही त्यांना विचारले की, तुम्ही या काळात दूसरे काम का करत नाही तर त्यांची प्रतिक्रिया अतिशय केविलवाणी होती. आम्ही आयुष्यभर स्टेजवर काम केले. कष्टाची कामे केली नाहीत. कलेच्या जीवावर पोट भरलं. आता कष्टाची कामे होत नाहीत त्यामुळे आम्हाला कुणी कामाला देखील सांगत नाही.


महाराष्ट्राच्या मातीला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, असा छातीठोकपणे उल्लेख करणाऱ्या लोकांनी तमाशा कलावंतांची माती व्हायची वेळ आली तरीही त्यांची दखल घेतलेली नाही.

तासगाव येथील तमाशा कलावंत भास्कर सदाकळे सांगतात, "मी आमदार सुमन पाटील यांच्याकडे कलाकारांना मदत द्यावी ही विनंती करायला गेलो तर त्यांनी कुणाकुणाला आम्ही मदत करायची असे सांगितले. सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पी ए ने दोनवेळा त्यांना भेटू दिले नाही. भास्कर सदाकळे पुढे सांगतात आज आमच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण आम्ही आता रडत बसणार नाही या संकटातून बाहेर आल्यावर तमाशा कलावंतांचा लढा उभा करणार आहोत. सरकारला कला हवी आहे तमाशे हवे आहेत पण या लोकांची जबाबदारी घ्यायला नको आहे."

वास्तविक तमाशा कलेची जोपासना ही मागासवर्गीय समाजातून होते. बहुतांश तमाशे हे मागासवर्गीय समाजातील आहेत. पूर्वीपासून हा वर्ग अत्यल्प भूधारक आहे. तमाशा हेच या कलाकारांचे जगण्याचे साधन आहे. हेच बंद झाल्याने आता कुटुंबावर कुऱ्हाड कोसळली आहे. कुणी तमाशा कलावंत रोजगाराची वाट बघतोय कुणी चहाच्या दुकानात कामाला जातोय तर कुणी काम होत नाही म्हणून घरात चरफडत बसलेला आहे.

डोर्ली या गावातील तमाशा कलावंत हणमंत सदाकळे सांगतात, आम्ही तमाशा कलेतून गावाची शान वाढवत असतो. जनतेचे मनोरंजन आणि त्यातून प्रबोधन देखील करत असतो. तेंव्हा आमच्या अडचणीच्या काळात हे सरकार आमच्या पाठीशी उभे राहत नसेल तर या सरकारला येत्या काळात हे कलाकार खाली खेचायला कमी करणार नाहीत. आमची मोठी मागणी नाहीय केवळ आमच्या पोटाला लागेल ते द्या अशी विनवणी ते करतात.

तमाशा फड मालकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे या फडात काम करून अर्थार्जन करणारे कलाकार बेकार झालेले आहेत. तमाशा फड मालक जयसिंग पाचेगावकर सांगतात रोज कलाकारांचे फोन येतात घरात काही नाही म्हणून पण माझीच वाईट अवस्था आहे तेंव्हा मी त्यांना काय मदत करणार ?

तमाशा कला अडचणीत

या अगोदरही सरकारने रात्री तमाशाच्या वेळा कमी केल्याने फड मालकांना कमी सुपारी मिळते. जत्रेतून मिळणारी सुपारी ही रात्र आणि दिवस अशा शोसाठी मिळत असायची. ज्या वेळेला पूर्वी तमाशा सुरू व्हायचा त्या वेळेला तमाशा बंद करण्याचा नियम झाल्याने रात्रीच्या सुपारी बंद झाल्या. पूर्वी तमाशा रात्रभर सुरू असायचा. वेळेच्या बंधनाने अगोदरच अडचणीत आलेल्या तमाशाला लॉकडाऊन मुळे वाईट अवस्था आली आहे.


 



महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्रालय तमाशा कलावंतांसाठी काही करत नाही असा या कलाकारांचा आरोप आहे. तमाशा कलाकार हे उपेक्षित असून त्यांना आजच्या सत्ताधाऱ्यांनी मदत न केल्याने तमाशा देखील उपेक्षित राहिला आहे.

एखादा कलाकार जेंव्हा मृत्यू पावतो तेंव्हा केवळ त्याचा मृत्यू होत नाही तर त्याच्या कलेचा देखील मृत्यू होतो. या संकट काळात तमाशा कलावंत जगाला नाही तर त्याची कलादेखील लुप्त होऊन जाईल. या संकटकाळात या कलेतून कलाकार दुसरीकडे वळतील. जो सांस्कृतिक वारसा म्हणून आपण उल्लेख करतो तो तमाशा येत्या काळात महाराष्ट्रातून नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. तेंव्हा सरकारने समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि ज्यांनी ज्यांनी जत्रेत तमाशाच्या उद्घाटनासाठी नारळ फोडला आहे, शिट्टी मारत, टाळ्या वाजवत तमाशाचा आस्वाद घेतला आहे त्या सुज्ञ प्रेक्षकांनी या कलाकारांच्या मदतीला धावले पाहिजे

Similar News