Special Report : स्मार्टफोन नसलेल्या मुलांना शिकवण्याचा 'स्मार्ट' पॅटर्न

Update: 2022-01-24 12:42 GMT

आपल्या नाजूक बोटांनी अगदी सहजपणे पियानो वाजवणारी मुलं...आपल्या शाळेच्या भिंती त्यांच्या पालकांच्या मदतीने रंगवणारी मुलं....धनुर्विद्या शिकणारी ही मुलं...घड्याळ तयार करणारी मुलं एवढंच नाही तर साबण तयार करणारी मुलं....ही दृश्य कोणत्याही शहरी शाळेतील नाहीत तर सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील माण तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या विजयनगर इथल्या प्राथमिक शाळेतील आहेत....ज्या काळात कोरोनामुळे राज्यभरातील शाळा बंद होत्या त्या काळात इथल्या मुलांचे ऑफलाईन शिक्षण सुरु होते. चार वर्गांना मिळून इथे एकच शिक्षक आहेत, पण त्यांनी कोरोना नियमांचे पालन करत इथे विद्यार्थ्य़ांची शिक्षणाशी ताटातूट होऊ दिली नाही.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेती पहिली ते चौथीचे असे चार वर्ग आहेत, पण इथे शिक्षक मात्र एकटे आहे, बालाजी जाधव असे त्यांचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. पण या गावातील मुलांकडे स्मार्टफोन नव्हते. पण काही पालकांकडे साधे फोन होते, त्यामुळे बालाजी जाधव यांनी कॉन्फरन्स कॉलचा वापर केला आणि त्याही काळात मुलांना शिकवले.



 



पण मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे लक्षात आल्यानंतर पालकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या परवानगीने बालाजी जाधव यांनी ४ ते ५ मुलांचे गट केले आणि शाळेच्या मोकळ्या जागेत सोशल डिस्टन्स आणि कोरोना नियमांचे पालन करत मुलांचे शिक्षण सुरू झाले. सुरूवातीला पटसंख्या केवळ १५ होती, पण आता शाळेत सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांमुळे इथे मुलांची संख्या वाढली असल्याचे बालाजी जाधव सांगतात.

एकीकडे कोरोना काळात मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचे आव्हान पेलतानाच बालाजी जाधव यांनी मुलांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे निर्णय घेतला आणि मग यातून या शाळेतील विद्यार्थ्यांचा नवा प्रवास सुरू झाला. मुलांना विविध कौशल्याची कामं शिकवतानाही यामध्ये बालाजी जाधव यांनी कल्पकतेचा वापर केला.

"कोविड मुळे CSR आरोग्याकडे वळला होता अशा एक न अनेक अडचणी माझ्या समोर उभ्या राहिल्या. ,मात्र मी ठरवले की यावर्षी काही झाले तरी कमीत कमी ५ अशी कौशल्य मुलांना शिकवायची जे त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील.त्यात विविधता पण असावी आणि मी मग त्याप्रमाणे ५ कौशल्य निश्चित केली" असे बालाजी जाधव सांगतात. यामध्ये पियानो वादन, साबण निर्मिती, वारली चित्रकला, धनुर्विद्या आणि घड्याळ निर्मिती ही पाच कौशल्य त्यांनी ठरवली..





 


कौशल्य विकासासाठी कौशल्य लावले पणाला

या प्रयोगाबद्दल बालाजी जाधव सांगतात, " पियानो वादन मी लॉकडाऊनमध्ये ३ महिने शिकलो होतो. मात्र तेही अगदी जुजबीच मात्र आवश्यक तेवढं होते. मी ऑनलाईन शिकलो आता माझी शाळा अशा ग्रामीण व दुर्गम भागात आहे की जिथे २ टक्के पालक स्मार्ट फोन वापरतात आणि एक पियानो विकत घ्यायचा तर ५ ते १० हजार रु लागतात. पण योगायोगाने मागील वर्षीच अतुल फौंडेशन गुजरात यांनी माझ्या इनोव्हेटिव्ह कामामुळे माझ्या शाळेला टॅब दिले होते आणि आमचा तो मोठा प्रश्न इथे सुटला. मी पण टॅबवरच एपद्वारे पियानो शिकलो व विद्यार्थ्यांना पण शिकवण्याचं ठरवले. परिस्थिती नुसार मग ब्लेंडेड पद्धत वापरायची ठरवली व दर २ दिवसांनी प्रत्येकाच्या घरी जावून मी विद्यार्थ्यांना टॅब दिले. २ आठवड्यानंतर मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिला, असे ते सांगतात.

घरच्या घरी साबण कसा बवनायचा ते आणण लॉकडाऊनमध्ये शिकलो होतो, असे जाधव सांगतात. "त्यासाठी लागणारे प्रमुख घटक म्हणजे कोरफड.. शाळेशेजारी एका घरी खोप कोरफड होती ती लॉकडाऊनमध्ये आणून शाळेत लावली व ती चांगली आली सुद्धा आणि त्यासाठी लागणारे सोप बेस, मोल्ड हे ऑनलाईन मागवले व त्याच्या साह्याने प्रक्रिया सुरु केली, असे बालाजी जाधव सांगतात. प्रत्येक मुलाला २ आठवड्याला घरी १ साबण देण्यास सुरुवात केली व मुलांच्या स्वच्छता व आरोग्य याचा मोठा प्रश्न आज सुटला आहे, असे ते सांगतात. त्याचबरोबर मुलांना वारली पेंटिंग, घड्याळ बनवणे आणि धनुर्विदयाही शिकवली, असे बालाजी जाधव सांगतात.


 



जाधव सरांच्या या प्रयोगांनाही सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी साथ दिली आहे. त्य़ामुळे पालक देखील खुश आहेत. विजयनगर सारख्या दुर्गम गावातील जि. परिषदेच्या शाळेत सुरू असलेल्या शिक्षणातील प्रयोगांची माहिती जिल्हाभरात पसरली आणि मग काय, मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्याऐवजी उच्चशिक्षित कुटुंबांनी आपल्या मुलांना याच शाळेत दाखल केले आहे.



 



बालाजी जाधव यांनी आता आपल्या या नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती शिक्षण विभागाला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. देशाचा विकास करायचा असेल तर खेड्यांकडे चला असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. विजयनगरमधील या शाळेतील शिक्षक बालाजी जाधव आणि विद्यार्थ्यांच्या प्रयोगांमुळे शिक्षणातील सकारात्म परिवर्तनाची सुरूवात खेड्यामधूनच होत आहे हे सिद्ध झाले आहे.


Full View

Tags:    

Similar News