राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी 'Why I killed Gandhi' या सिनेमामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आक्षेप घेतला होता. पण आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर मौन सोडत भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांना कलाकार म्हणून भूमिका साकारण्याचे स्वातंत्र्य आहे, अशी भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीच कलेच्या नावाखाली महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण करता येणार नाही, अशी भूमिका मांडत या सिनेमाला विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील नथुराम गोडसेचे समर्थन होऊ शकत नाही, राष्ट्रवादीची भूमिका ही कायम त्याविरोधात राहिली आहे, असे म्हटले आहे. पण एक कलाकार म्हणून अमोल कोल्हे यांना भूमिका करण्याचे स्वातंत्र्य आहे, तसेच त्यांनी २०१७मध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याआधी ही भूमिका केली आहे, असे सांगत अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.
अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून ती भूमिका केली आहे, असे सांगत शरद पवार यांनी काही उदाहरणं दिली आहेत. संपूर्ण जगभरात गाजलेला गांधी सिनेमातही कुणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. त्यामुळे कोणताही कलाकार सिनेमात भूमिका करत असेल त्याकडे कलाकार म्हणूनच पाहावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमात औरंगजेबाची भूमिका कुणी केली म्हणजे तर तो मुघल साम्राज्याचा समर्थक ठरत नाही, कलावंत म्हणून तो भूमिका करतो, असे सांगत शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे.
३० जानेवारी रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. त्यानंतर गुरूवारपासून यासंदर्भातला वाद निर्माण झाला आहे, पण अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली होती. २०१७ साली या सिनेमाचे शूटिंग झाले होते. त्यावेळी आपण राजकारणात सक्रिय नव्हतो, असे त्यांनी सांगितले होते. पण त्याचबरोबर कलाकार एखादी व्यक्तीरेखा करतो म्हणजे त्या विचारधारेशी सहमत असतो असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच आपण वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातही नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केलेले नाही, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.