"वाघाला त्याच्या क्षमतेवर विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत", रोहित पवारांची पोस्ट चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी लिहिलेली एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. यामध्ये रोहित पवारांनी आपल्या मुलांसोबत वाघ पाहिल्याचा एक अनुभव शेअर केला आहे. पण त्याचवेळ त्यांनी यात काही राजकीय भाष्यही केले आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांचा टोला कुणाला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, "जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा आज काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली. साक्षात वाघ बघून मुलं खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही?असं विचारलं. मी त्यांना म्हणालो, "वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो.
म्हणूनच आपणही वाघासारखंच रहायचं असतं आणि प्रामाणिकपणे काम करताना कोण काय म्हणतंय याकडं ढुंकूनही बघायचं नसतं. हत्ती सुद्धा रस्त्याने जात असताना आजूबाजूला ओरडणाऱ्यांकडं लक्ष देत नसतो." हे ऐकून मुलंही म्हणाली, "महाराष्ट्रही असाच आहे ना बाबा!".
भाजपला महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे आव्हान शरद पवार यांनी दिली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे भाजपने नवाब मलिक यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीची कोंडी केल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ही पोस्ट केल्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.