माकडाचे नाव 'चंपा' आणि हत्तीचे 'चिवा' ठेवणार, किशोरी पेडणेकर यांचा सणसणीत टोला
शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद पेटला आहे. राणीच्या बागेतील पेंग्वीनचे इंग्रजी नाव ठेवल्याबद्दल चित्रा वाघ यांनी टीका केली होती. तसेच ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला होता.
दुकानांवरच्या पाट्या मराठी करण्याचा निर्णय घ्यायचा आणि पेंग्विनचे नाव इंग्रजीत ठेवायचे हा पुळका देखाव्या पुरता असल्याची टीका त्यांनी केली होती. या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.
भाजप टीका करत असेल तर मराठी नावं देखील प्राण्यांना देऊ....पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव देऊ, असा टोला लगावत त्यांनी हत्तीच्या पिल्लाचं नाव चंपा ठेवू आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेवू, असा चिमटा काढला. तर केवळ विरोधाला विरोध करणं आणि खालच्या स्तरावरची टीका करणं असेही त्यांनी म्हटले आहे.
पेंग्विनच्या पिल्लाचं नाव ऑस्कर ठेवण्यावरुन किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप नेते टीका करत आहेत. पण मुंबईच्या मध्यमवर्गीय लोकांना परदेशातील वातावरणाचा आनंद गेता येतो, यामुळे विरोधकांना त्रास होतो का, असा सवाल त्यांनी विचारला. ऑस्कर पुरस्कार चालतो तर ऑस्कर नाव का नाही चालत, असा सवालही त्यांनी विचारला.