5 राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय

Update: 2021-05-02 02:27 GMT

कोरोना संकट भयावह झालेला असताना पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी होत आहे. पण या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकट गंभीर झालेले असल्याने या निकालांसंदर्भात न्यूज चॅनेल्सवर होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने जाहीर केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भातले ट्विट केले आहे. कोरोनाची भीषण परिस्थिती बघता उद्या येणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या चर्चेमध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून कोणीही सहभागी होणार नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.

देशात कोरोनाचे संकट गंभीर होण्यास निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा ठपका मद्रास हायकोर्टाने ठेवला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही ही परिस्थितीत हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होते आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना परिस्थितीमुळे सर्व सभा रद्द केल्या होत्या. देशात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना जाहीरसभा, प्रचार रॅली नको अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

Similar News