गोव्यात तृणमूल आणि 'आप' भाजपची बी टीम? संजय राऊतांचा 'रोखठोक' हल्ला

गोव्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल उतरले असल्याचे चित्र आहे, पण ही भाजपची खेळी असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Update: 2022-01-09 02:45 GMT

शनिवारी निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राला लागून असलेल्या गोव्याचाही समावेश आहे. गोव्यातील राजकीय वातावरण आधीच तापले आहे. इथे भाजपला आणि काँग्रेसला टक्कर देण्यासाठी ममता दीदींचा तृणमूल काँग्रेस आणि केजरीवाल यांची आम आदमी पार्टी ताकद लावते आहे. पण यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र आता एक वेगळा आणि गंभीर आरोप केला आहे. गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि आप यांना खर्चासाठी भाजप पैसा पुरवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सामानमधील आपल्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

भाजपला गोव्यामध्ये कधीच बहुमत मिळालेले नसले तरी इतर पक्षांतील आमदारांना सरळ विकत घेण्याची भाजपची रणनीती गेल्या अनेक वर्षांपासून असल्याचा आऱोप राऊत यांनी यामध्ये केला आहे. पण गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भाजपला होईल आणि त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण सुरू आहे, या पैशांचे धनी तृणमूल नसून दुसरेच कुणीतरी असावेत, असेही सांगणारे अनेक जण भेटल्याचे राऊतांनी यामध्ये म्हटले आहे.

गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार? काँग्रेस पक्षाकडे मागच्या निवडणुकीनंतर 17 आमदार होते. ते आता 2 राहिले. बाकी सगळे पळून गेले. कारण गोव्यात काँग्रेसचे सक्षम नेतृत्व नाही. राष्ट्रीय भूमिका घेऊन गोव्यात निवडणुका लढवल्या जात नाहीत. अशी टीका त्यांनी केली आहे.

गोव्यातली निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, पण तृणमूल काँग्रेस व 'आप'सारख्या पक्षांनी काँग्रेसच्या वाटेत काटे पेरून भाजपला मदत केली आहे. तृणमूल आणि आपसारख्या पक्षांनी गोव्याच्या मतदारांना फक्त सोन्याने मढवायचेच बाकी ठेवले. अशा आश्वासनांची खैरात उडवली आहे. गोव्याच्या राजकारणात पैशांचा खळखळाट सुरूच आहे. सगळेच भ्रष्ट,व्यभिचारी बनले. देवळांत आणि चर्चमध्ये फक्त घंटा वाजतात. त्या घंटांचे मांगल्यच संपले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Similar News