Goa Election : मनोहर पर्रीकर यांच्या मुलाची भाजपला सोडचिठ्ठी, पणजीमधून अपक्ष लढणार
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच अपक्ष म्हणून पणजीमधून लढण्याचा निर्णय़ घेतला आहे. उत्पल पर्रीकर यांनी भाजपकडून पणजी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने त्यांच्याऐवजी तिथले विद्यमान आमदार बाबूश मॉन्सेरॉत यांना उमेदवारी दिल्याने उत्पल पर्रीकर नाराज होते.
उत्पल पर्रीकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पणजीधून लढण्याची तयारी केली होती. पण पक्षाने त्यांना संधी दिली नाही, त्यामुळे आपले वडील जिथून निवडून येत त्याच मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रीकर यांना इतर दोन मतदारसंघाचा पर्याय दिला होता, त्यापैकी एका मतदारसंघातून लढण्यास ते तयार होतील अशी आशा आहे, असे सांगितले होते. पण त्याचाच दुसऱ्या दिवशी उत्पल पर्रीकर यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोहर पर्रीकर यांचा मुलगा भाजप विरोधात निवडणूक रिंगणात उतरत असल्याने पणजीमधली निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर अपक्ष लढले तर त्यांना सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. तर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रीकर यांनी आपमध्ये यावे असे आवाहन केले होते.