अर्थमंत्र्यांच्या "युपी टाईप" उत्तराने वाद, निवडणूक प्रचार तापला

Update: 2022-02-02 05:42 GMT

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्याने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा प्रचार तापला आहे. काँग्रेसने निर्मला सीतारामन यांचे हे वक्तव्य आता निवडणूक प्रचारात भाजपविरोधात वापरण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बजेटवर टीका करताने हे बजेट झीरो बजेट असल्याची टीका केली होती. तसेच बजेटमधून गरिब, शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्ग, छोटे उद्योजक यांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेबाबत निर्मला सीतारामन यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांना उत्तर देण्यास सांगितले. यावर राहुल गांधी यांना बजेटच समजले नाही, असे उत्तर चौधरी यांनी दिले. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांना टोला लगावत पंकज चौधरी यांनी युपी टाईप उत्तर दिले आहे असे वक्तव्य केले. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता काँग्रेसने निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. "आपम बजेटमध्ये उत्तर प्रदेशसाठी काहीही दिलेले नाही, हे ठिक आहे पण युपीच्या लोकांना अशाप्रकारे अपमानित करण्याची काय गरज होती? उ.प्रदेशच्या लोकांना युपी टाईप असण्यावर गर्व आहे, आम्हाला युपीची भाषा, बोली, संस्कृती आणि इतिहास यांचा गर्व आहे" असे प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माजी आयएएस सूर्यप्रताप सिंग यांनीही निर्मला सीतारामन यांचे पत्रकार परिषदेमधील ते वादग्रस्त वक्तव्य ट्विट करत सवाल विचारला आहे.

"'टिपिकल युपी टाईम उत्तर म्हणण्याचा अर्थ काय आहे अर्थमंत्रीजी? भाजपचे नेते युपीच्या लोकांना मूर्ख समजतात की त्यांना सहजपणे बनवता येते. पण निवडणुकांनंतर कोण काय आहे हे कळलेच" असा टोला त्यांनी लगावला आहे.

Similar News