संतप्त शिक्षकांचा आक्रोश

Update: 2017-11-05 08:11 GMT

अशैक्षणिक कामे, जुनी पेंशन योजना लागू करणे आणि शिक्षक निवड श्रेणीबाबत शासन निर्णय रद्द करणे या आणि इत्तर प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यात स्वयंस्फुर्तीने एकजूट दाखवत शिक्षकांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

समाजमाध्यमांतून आंदोलनाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जिल्ह्याजिल्ह्यातून शिक्षक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊ लागले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम योग्य असला तरी त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटीमुळे शिक्षकांना त्याचा फटका बसत आहे. प्रगत शैैक्षणिक महाराष्ट्र या योजने अंतर्गत शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक ऑनलाईलनची कामे आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून येणारे नवनवीन आदेश, यामुळे शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

एवढ्या मोठ्याप्रमाणावर अचानक आंदोलन सुरु झाल्याने स्थानिक प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. विशेष म्हणजे या आंदोलनात शिक्षिकांचा सहभाग लक्षणीय होता. ठाण्यात जिल्हा शिक्षक समन्वय समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय शिक्षक संघ, शिक्षक समिती, स्वाभिमानी शिक्षक संघटना आदी अनेक संघटना मोर्चात सहभागी होत्या.

Similar News