माझ्या मायबोलीतच माझं जगणं आहे !!

Update: 2020-02-27 13:41 GMT

मराठी साहित्यात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून अल्पावधीतच आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या कवी वृषाली विनायक यांनी मॅक्समहाराष्ट्र : सकळ मराठी, प्रबळ मराठी साठी आपलं मनोगत व्यक्त केलंय.

मराठी भाषा गौरव दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठी साहित्याची विद्यार्थिनी म्हणून मला निश्चितच भाषा दिनाचा अभिमान वाटतो. खरंतर एक भाषा दुसरीवर कधीच आक्रमण करत नाही. एक भाषा दुसरीची जन्मदात्री असते.

वाङ्मयाची विद्यार्थिनी म्हणून माझ्यात नेहमीच मराठीची ओल पाझरत राहिली. साहित्याची समृध्द परंपरा मराठीने जोजवलीय. आजतागायत ती अखंड सुरू आहे. कविता लिहू लागले त्याच्या आधी कितीतरी कविता वाचल्या. मराठीचा काव्योघ एकूणच साहित्याला कसकसा सुजलाम सुफलाम करत आलाय ते लक्षात येऊ लागलं. लिहू लागले तेव्हा जाणवलं, भाषा स्वतःत भिनवावी लागते. ती रक्तात मिसळली की शब्दांची ददात नसते. भाषा बोलते म्हणजे एक संपूर्ण संस्कृती बोलत असते. आज मराठीत कितीतरी सकस निर्मिती होतेय. खंत फक्त एवढीच वाटते, जे लिहितायत तेच वाचतायत. याव्यतिरिक्त मराठी साहित्याचा वाचक मात्र परिघावर रेंगाळताना दिसतोय. ह्या वाचकाला केंद्रस्थानी आणणं गरजेचं आहे.

आणखी एक जाणवलेली गोष्ट नमूद कराविशी वाटते, आज साहित्यिक कार्यक्रमांची संख्या वाढली पण साहित्यिक वातावरण मात्र हवंतसं तयार झालं नाही. वास्तुंपासून मनाच्या बांधणीपर्यंत सगळंच नव्यानं रचावं लागणार आहे. साहित्य क्षेत्रात मंथनाची गरज आहे. हे मंथन केवळ आजच्या दिवसापूरतं नाही. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. झेंडा नाही तर अजेंडा मराठी असणं आवश्यक आहे.

सांस्कृतिक उलाढालीच्या काळात 'भाषा'बंदी होत असेल तर साहित्यिकांनी जबाबदारीने याविरूध्द संघर्ष करण्याची परिस्थिती निर्माण झालेय असं वाटू लागतं. भाषा टिकणार की नाही? भाषा शुध्दंय की अशुध्द हे आजचे प्रश्नच नाहीच. भाषेतला माणूस टिकला की भाषेचं मरण अशक्यंय. खरंतर गौरव दिवस हे एक निमित्त ! माझी मायबोली ह्यातच माझं जगणं आहे. याहून वेगळा सोहळा तो काय !!!

Similar News