जैवविविधतेचं निरीक्षण आणि संवर्धन कसे करावे?

‘जैवविविधता’ या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? महामारीमुळे पर्यावरण, निसर्गाचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती तुम्हाला आलीच असावी... त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण कसे करावे? पर्यावरणाचे शिक्षण मुलांना कसे द्यावे? निसर्गातील बारकावे पाहून संवर्धन आणि संरक्षणाची कास धरत जनजागृती कशी करावी ? यासंदर्भात पक्षीमित्र, जैवविविधता अभ्यासक चिन्मय प्रकाश सावंत यांचा हा लेख नक्की वाचा...;

Update: 2021-06-20 14:08 GMT

जैवविविधतेचं निरीक्षण आणि संवर्धन कसे करावे? या महामारीने आपल्याला सांगितले की, पर्यावरण व जैवविविधता हे देखील आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचे भाग आहे त्यामुळे त्यांचा अनादर करणे हे आपल्यासाठी घातक आहे.

अनेकांना प्रश्न पडतो की, मी काय मोठा तज्ञ संशोधक व्यक्ती नाही किंवा माझी व्यवसायिक पार्श्वभू‌मी ही पर्यावरणाविषयी नाही. त्यामुळे असे माणसं पर्यावरणासाठी त्यांच्या संरक्षणसाठी पुढे येत नाहीत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. सामान्य मनुष्य देखील या पर्यावरणाचा भाग आहे. त्यामुळे मी असा तसा हे बोलणे वावगे ठरणार नाही का ? समाजातील प्रत्येकाने निसर्ग संरक्षणासाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे. आपल्या हे संवर्धनाचे कार्य आपल्या घरापासून सुरू केले तर नक्कीच तुमची प्रेरणा घेऊन अनेक जण ते कार्य करतील. आपल्यातील अनेकांना निसर्ग अनुभवाच्या, पक्षी निरीक्षण करायला, निसर्गातील भिन्न गोष्टी अनुभवायला भरपूर आवडते. त्यामुळे आप आपल्या परिने जेवढे शक्य होईन तेवढे निसर्गाची सेवा आपल्या हातून होईल याचा मनुष्याने विचार केला पाहिजे.

आदर्शगांव किरकसालची प्रेरणा जर प्रत्येक गावाने घेतली तर त्या त्या गावातील निसर्ग अधिक बहरेल. निसर्गदेवता त्या गावात सदैव नांदेल. त्यामुळे गावपातळीवर कार्य करत असताना लोकसहभाग हा तितकाच महत्वाचा आहे. लोकांनी एकत्र मिळून केलेली कामे समाजासाठी त्यांच्या गावासाठी, शहरासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतात. त्यामुळे आपआपल्या गावात आपण पर्यावरण व जैवविविधता संवर्धनासाठी महत्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. जनजागृती सत्रे, स्लाईड शो च्या माध्यमातून आपण गावात विविध मुद्दांवर जागरूकता कार्यक्रम राबवणे नेहमीच प्रेरणादाई ठरतात.




 


माझे गाव डोंगरातले आहे आदर्शगांव किरकसाल सातारा जिल्हातील माण तालुका या दुष्काळी भागात पण आता रुपडे बदलतय बरं का... अनेक वर्ष दुष्काळाचा शब्द लागलेला आपला माण तालुका आता कात टाकतो आहे. झाडा-झुडपांनी पाना-फुलांनी तो बहरत आहे. अन् त्याच बरोबर गावे देखील बदलत आहे. अनेक वर्ष दुर्लक्षित असा हा प्रदेश अनेक दुर्मिळ सजीवांचे आश्रयस्थान आहे. शुल्क काटेरी वनांनी व्यापलेले डोंगर, विस्तीर्ण गवताळ माळरान, अनेक मोठाली पाणथळी, शेतीप्रदेश असा अधिवास असलेला भूभाग स्थानिक - स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे. अन् अशाच जैवविविधेच्या संरक्षणासाठी आदर्शगाव किरकसाल पाऊल टाकत आहे. किरकसालचे एक महत्वाची माहिती तुम्हाला सांगतो. हे गाव डोंगरातले तिन्ही बाजूने डोंगर दर्या त्यामुळे चराईचे प्रमाण / शिकारीचे, अन् वणवा व वृक्षतोड यांचे प्रमाण जास्त असेल असे तुम्हाला वाटेल !

पण गेल्या अनेक वर्षापासून शिकारबंदी, कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी या त्रिसूत्रीचा वापर करून त्यांची अंमलबजावणी किरकसालमध्ये होत आहे, त्यामुळे किरकसाल गाव हे बहरत आहे. त्यामुळे अशा योजनेने या त्रिसूत्रीचा वापर करून अनेक गाव हिरवीगार होतील. शहरांमध्ये मुलांना जैवविविधता आणि पर्यावरणाचे धडे देणे गरजेचे आहे. मुलांना या गोष्टीचा विसर पडतो आणि ते पर्यावरणाला हानी पोहचवतात त्यामुळे लहानपणापासूनच विद्यार्थीं यांना पर्यावरण शिक्षण व जैवविविधता संरक्षण या विषयाची सांगड करून दिली तर ते आपल्या उज्जवल भविष्याचा पाया रचतील एक पर्यावरणपूरक भारत देश घडवतील त्यामुळे विद्यार्थ्यांना जैवविविधेची शिकवण आणि पर्यावरण संरकार महत्वाचे आहेत.



ग्रामीण भागात जरी मुलांची नाळ निसर्गाची जोडली असली तरी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि माहिती देणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या गावची एक छोटी जैवविविधता नोंदवही बनवली पाहिजे. आपल्या गावात आढळणारी वन्य वनस्पती, पक्षी, प्राणी, किटक, मासे, फुलपाखरे निरीक्षण केले पाहिजे. यात त्यांना निसर्गाविषयी भरपूर माहिती मिळेल. आपल्या घरातल्या गॅलरीमध्ये आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो. आपल्याघरातील पाले भाज्या / फळे कचरा एका कुंडीत ठेवून तो कुजला की त्यांचे चांगले खत तयार होते. या गोष्टीने हे दोन फायदे होतील. एकतर आपल्याला आपल्या झाडांना चांगले सेंद्रिय खत मिळेल व आपल्या घरात कचरा जास्त होणार नाही.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण कापडी पिशवी, किंवा घरातील अन्य टाकाऊ वस्तूंचा वापर करणे योग्य ठरेल. कारण या पृथ्वीवरील सर्वात घातक वस्तू आहे ते म्हणजे प्लॅसटिक कचरा' या plastic मुळे आपले समुद्र, नदया, जंगले, शहरे, गावे हे मलिन झाले आहेत. समुद्रजीवसृष्टीला धोका पोहचत आहे. समुद्रातील जलचर प्राणी, कासवे, विविध जातींचे मासे आज संकटग्रस्त यादीत येत आहेत. लाखो-करोडो वर्ष गेले तरी plastic ची विल्हेवाट होणे कठीण आहे. त्यामुळे आपण जेवढा plastic चा कमी वापर करू तेवढे आपल्या हिताचे आहे. प्लॉसटिक ऐवजी वापर करून तो पुन्हा केला तर Reuse Reduce, and Recycle या तीन सूत्रीची सुरुवात आपल्या घरापासून होईल.

पक्षी निरीक्षण हा निसर्ग अनुभवण्याचा सोप्पा मार्ग आहे. पक्ष्यांमुळे आपण निसर्गाच्या खूप जवळ जातो. पक्षांचे विविध रंग, रूप आकार त्यांचे अधिवास नेहमीच उत्साही पक्षी निरीक्षकाला भावतात. जेष्ठ पक्षीतज्ञ वनाधिकारी मारुती चितमपल्ली आपल्या पक्षीविषयक लेखात लिहितात...

"तुम्ही जर पक्षी निरीक्षण केले तर तुमची हळूहळू आध्यात्मिक प्रवृत्ती देखील वाढते" पक्षी निरीक्षणाने मन प्रसन्न होते आणि मनाला शांती लाभते. जैवविविधता निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत, पण फक्त निरीक्षण, नोंदीवर भागणार नाहीत तर त्यांच्या अधिवासाला, वन्यजीवांना जर धोका असेल तर संवर्धन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. उदा . एखाद्या पाणथळी वर जर अतिक्रमण होत असेल तर आपल्या परिने त्या पाणथळीवर पाणपक्ष्यांच्या अधिवासाठी त्यांच्या संवर्धनासाठी आवाज उठवला पाहिजे. पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर जितके लिहू तेवढे कमीच आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन आपल्या वसुंधेरेची जैवविविधतेचे जतन करणे गरजेचे आहे.




 


"तुम्हा सर्वांची हवी साथ मगच घडेल गड्या बात... जैवविविधेचा धरु हात, उधळावा श्वास माझी देवराई हो जी जी...." या निसर्गरूपी जैवविविधेच्या पोवाड्याचे आपण बोल एकले तर नक्कीच आपल्याला निसर्गाची सेवा करायची इच्छा होईल आपणच होऊन आपल्या धरणी मातेचे संवर्धन व संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. "संवर्धन" हे कार्य आपल्या पासून सुरू होते त्यामुळे आपण जर संवर्धनाकडे वळलो की आपोआपच सर्व लोक तुमची प्रेरणा घेऊन जैवविविधतेचे जतन करतील.

चिन्मय प्रकाश सावंत (पक्षीमित्र, जैवविविधता अभ्यासक)

(लेखक परिचय - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या मत्स्य महाविद्यालय शिरगांव, रत्नागिरी येथे द्वितीय वर्ष व्यवसायिक अभ्यासक्रम मत्स्यशास्त्र (BFsc) या विषयात शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेनेचा आजीव सभासद आहे. तसेच Bombay natural history society ( bnhs) देखील विद्यार्थी सभासद आहे. आदर्शगाव किरकसाल, (ता.माण, जि.सातारा) येथे निसर्ग व जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धना सोबत जनजागृती चे कार्य महाविद्यालयीन काळात करत आहे. आदर्शगाव किरकसाल जैवविविधता संवर्धन समिती मार्फत गावात पक्षीविषयक जनजागृतीचे सत्र, पक्षी गणना इ. विविध उपक्रम राबविले जात आहेत.)

Similar News