सतीप्रथा- ब्राह्मणी वर्चस्वाचे मुख्य अस्त्र
भारतीय महिलांचं शोषण करणारी विचारधारा कशी जन्माला आली? ब्राह्मणी विचारसरणीतून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय केलं? वाचा ब्राह्मणीविचारसरणीवर ताशेरे ओढणारा रावसाहेब कसबे यांचा लेख;
सतीच्या चालीचे समर्थन करणारे अनेक विद्वान भारतीय पुरोहितवर्गात जन्माला आले आहेत. परंतु सतीची चाल बेंटिंगच्या कायद्याने बंद झाली तरी बालविवाह, केशवपन व सक्तीचे वैधव्य यांचा पुरस्कार विसाव्या शतकापर्यंत होत होता! एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एका प्रख्यात विद्यालयाच्या प्राचार्यांनी लिहिलेल्या 'हिंदू धर्म आणि सुधारणा' या ग्रंथाचा हवाला देऊन डॉ. सुमंत मुरंजन यांनी सक्तीच्या वैधव्याच्या व पुनर्विवाहाच्या बंदीमागील समाजशास्त्र स्पष्ट केले आहे.
"ब्राह्मण कुटुंबात बाळंतपण, विटाळ इत्यादी प्रसंगी शिवाशिवीच्या निर्बंधामुळे इतर जातीस मज्जाव असतो. या परिस्थिती योगक्षेमसातत्य राखण्याकरता ब्राह्मण स्त्रियांचीच जरूर पडते. म्हणून सक्तीचे वैधव्य ही कुटुंबधारणेचीच संस्था आहे" असे दाखवले आहे.
१९०१ च्या खानेसुमारीनुसार एकट्या महाराष्ट्रात ब्राह्मण जातीत पाच वर्षे वयाच्या आतील साडेपंधरा हजार विधवा होत्या. पंधरा वर्षाच्या आतील सव्वातीन लाख व तीस वर्षांच्या आतील साडेपंचवीस लाख होत्या, अशी डॉ. मुरंजन आकडेवारी देतात, यावरून ब्राह्मण कुटुंबाची ही 'कुटुंबधारणा' किती मोठ्या प्रमाणावर चालली होती. याची यावरून आपल्याला कल्पना येते.
स्त्रियांच्या संबंधीच्या सती, बालविवाह व सक्तीचे वैधव्य यांमागे जसे समाजशास्त्र होते, तसेच राज्यशास्त्र व अर्थशास्त्रही होते. ज्या रामदेवरायांच्या साम्राज्याचा ज्ञानेश्वरीत गौरवपूर्ण उल्लेख आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि चक्रधरांची शिष्या कामाईराणी हीस शंकरदेवाने बळजबरीने सती दिले आणि राजगादी निर्धीक केली. परंतु तिने सती जाताना 'तुझे चामुडे कवणाचेनि हाती सौलवेल: आज निसंतान होवोनि यादववंशीय राजछत्राचाही अल्पावकाशचि निःपातु होईल गा' असा शाप देऊनच तो चितेवर चढली!
आपणास अनुकूल असणारा राजाच गादीवर असावा म्हणून बाळाजी बाजीराव या तिसऱ्या पेशव्याने शाहू राजाच्या पंचावन्न वर्षांच्या वयोवृद्ध सकवारबाई या राणीवर दडपण आणून तिला सती जाणे भाग पाडले. त्याचप्रमाणे थोरल्या माधवरावाने मृत्युशय्येवर असतानाच रमाबाईला सती जाण्याचा उपदेश केला.
या देशातल्या अश्राप आणि मायेचा झरा असणाऱ्या स्त्रीवर्गाची केलेली विटंबना आणि त्या सतींनी दिलेले शाप हेच हिंदू संस्कृतीस मारक ठरले. या हिंदू संस्कृतीच्या अध:पतनाला मातृत्वाचा गौरव करणारे संस्कृत वाङ्मयही वाचवू शकले नाही. कारण त्यांनी मातृत्वाचा उदोउदो केला आणि पत्नीला जिवंत जाळले! माता हीसुद्धा अखेर पत्नीच असते. याचे भान द्रव्यलोभाने बेफाम झालेल्या ब्राह्मण पुरोहितास राहिले नाही.
सतीच्या चालीमागचे अर्थशास्त्र हे ब्राह्मणी संस्कृती किती पराकोटीची नीच होती. याचे स्पष्ट उदाहरण आहे. सती जाणाऱ्या विधवेने आपल्या तोंडात एक मोती व वस्त्राच्या टोकाला बांधलेली पाच रत्ने घेऊनच सती जावे, असे उत्तर नारायणभट्टी व अन्तेष्टी बजावते.
पुढे तर सती जाताना सर्वांगावर अवश्य तेवढे दागिने घालूनच नवऱ्याच्या सरणावर पाऊल ठेवावे, अशी प्रथा पाडली गेली. सती जळाल्यानंतर राखेत पडलेली कर्णभूषणे, बांगड्या, अंगठ्या वगैरे दागिने गोळा करण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच दिला गेला. त्यामुळे विधिपूर्वक सती ही पुरोहित ब्राह्मणांची सुवर्णसंधीच होती. ही आर्थिक प्राप्ती होण्यासाठी त्यांनी सतीची चाल समाजात अधिक प्रतिष्ठित केली. पातिव्रत्यावर प्रवचने झोडली. सतींची संख्या वाढावी म्हणून बालविवाहाला प्रोत्साहन दिले. लग्न न होताच एखादा माणूस मरणे, हे अशुभ ठरवले. आणि म चक्रात सारा हिंदू समाज रसातळाला गेला.
लोकमान्य टिळकांसारख्या महान पुढाऱ्याने 'संमती वया'ला विरोध करून हीच परंपरा पुढे चालवली. गोळवलकर म्हणतात त्याप्रमाणे सारे ब्रिटिश राज्यकर्ते केवळ ते परकीय आहे.त म्हणून त्यांना राष्ट्रविरोधी मानायचे काय? लॉर्ड बेटिंगला भारताल्या स्त्रियांनी कोणत्या तोंडाने शत्रू मानावे? भारताच्या संदर्भात शत्रू-मित्रत्वाच्या कसोट्या लावायला ब्राह्मणवर्गाने कोणताच वाव ठेवलेला नाही.
स्त्रियांच्या या विटंबनेविरुद्ध भारतात आवाज उठलाच नाही असे नाही. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ वराहमिहीर यांनी या प्रथांचा निषेध केला. अलीकडच्या काळात राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, आगरकर, न्या. रानडे, डॉ. आंबेडकर यांनी हिंदू संस्कृतीतील या रूढीविरुद्ध बंड केले. म्हणून तर आजची स्त्री मुक्त झाली. या ऐतिहासिक पुरुषांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका कोणती आहे ?
आपल्या देशात स्वमताचे मंडन किंवा इतरांच्या मतांचे खंडन करतानाही परस्परांची डोकी फोडल्याचे एकही उदाहरण आपल्या इतिहासात नाही. (पृ. ९१) म्हणून आपला इतिहास इतर देशांच्या मानाने श्रेष्ठ आणि गौरवशाली आहे, असे गोळवलकर म्हणतात, हे खरे आहे काय? आपल्या अनेक विचारवंतांमध्येही हा गैरसमज आहे.
आपल्या देशाचा इतिहास इतर कुठल्याही देशापेक्षा फारसा वेगळा नाही. असण्याचे कारण नाही. मानवी इतिहासाच्या क्रमानेच तो विकसित होणार होत आहे. फारच झाले तर त्यात प्रमाणांचा फरक असेल; प्रकारांचा फरक असणे केवळ असंभवनीय आहे.
बृहद्रथ राजा बौद्ध मताचा चाहता होता, म्हणून पुष्यमित्र शुंगाने त्याचा खून केला नाही काय? प्रख्यात सम्राट शिलाजित ऊर्फ हर्ष या सर्वपंथसहिष्णू परंतु बौद्ध मताचा पुरस्कार करणाऱ्या राजाच्या खुनाचा कट पाचशे ब्राह्मणांनी केल्याने युऑन च्वाँगने जे लिहून ठेवले आहे ते खोटे आहे काय?
कर्मकांडाचा महाराष्ट्रातील शिरोमणी ब्राह्मण पंडित हेमाद्री याने कर्मकांडाला विरोध करणाऱ्या व समतेचा पुरस्कार करणाऱ्या महानुभाव पंथाचा प्रवर्तक श्रीचक्रधर यांचा केवळ हेमाद्रीची बायको निरुपणास हजर राहिली म्हणून प्राण घेतला व यादवराजाने त्याचा प्राण घेतला असे उठवले. हा लोकापवाद खोटा आहे काय?
गोळवलकरांना अगदीच डोके फोडल्याचे उदाहरण हवे असेल तर तेही त्यांच्या भारताच्या इतिहासात आहेच. रामानुजाचार्य हे विशिष्टाद्वैतवादी संप्रदायाचे संस्थापक आहेत. त्या वेळच्या कुलोच्युंग नावाच्या राजाला रामानुजांचा हा प्रयत्न आवडला नाही. त्याने रामानुजांचा मित्र कुरतालवार याचे डोके फोडले. याचा सूड म्हणून रामानुजाचार्य ज्या वेळी म्हैसूर राज्यात गेले. त्या वेळी तिथल्या बिट्टीदेव (विष्णुवर्धन) राजाला आपला अनुयायी करून जैनांचा संहार करण्याचे काम त्यांनी मोठ्या शिताफीने चालवलेले होते.
त्यांनी पुष्कळ जैनांची डोकी तेलाच्या घाण्यात घालून फोडवली, असे त्यांचे अनुयायी मोठ्या प्रौढीने सांगत आले आहेत. हे जैन विशिष्टाद्वैतमताच्या विरोधी मत मांडीत होते म्हणूनच हे झाले ना? अगदी अलीकडे तर विरोधी मतांचा पुरस्कार करणाऱ्यांची जीवघेणी अवहेलना करण्याचे प्रकार रूढ झालेले दिसतात.
आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांची मिरवणूक एकीकडून निघाली की दुसरीकडून चिपळणूकरांच्या अनुयायांनी गाढवाची मिरवणूक काढावी.
आगरकर आपल्या मताच्या विरोधी मत प्रदर्शित करतात म्हणून त्यांची जिवंत प्रेतयात्रा काढावी. बुद्धिवादी म्हणवल्या जाणाऱ्या सावरकरांनी, आंबेडकरांनी बौद्ध धर्मात धर्मांतर करताच त्यांना 'बाटगे' म्हणावे आणि 'धर्मांतर हाच राष्ट्रद्रोह' अशी गर्जना करावी हे प्रकार अवलंबिले गेले. यावरून भारताचा इतिहास इतर देशांच्या तुलनेत कोणत्या अर्थाने गौरवास्पद आहे, हे हिंदुत्ववाद्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय चळवळ आहे असे म्हणत असतानाच या संघटनेत स्त्रियांना मज्जाव का आहे, हे कोडे उमगत नाही.
आज भारतीय राजकारणात युवकांच्या अनेक संघटना आहेत. राष्ट्र सेवा दल, युवक क्रांती दल, यूथ फेडरेशन, अ. भा. विद्यार्थी परिषद वगैरे. परंतु यांपैकी एकाही संघटनेने स्त्रियांना मज्जाव केला नाही अथवा स्त्रियांच्या वेगळ्या संघटनांची आवश्यकता प्रतिपादन केलेली नाही. रा. स्व. संघाने स्त्रियांना मज्जाव करून त्यांच्या स्वतंत्र संघटनेचे प्रयत्न का केले? या प्रश्नाचे उत्तरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवक्त्याने दिले पाहिजे की, त्यांना हिंदू संस्कृतीतील स्त्रियांचे वेगळे अस्तित्व टिकवावयाचे आहे? स्त्री-पुरुष समानतेवर त्यांचा विश्वास नाही म्हणून की संघटन करण्याच्या दृष्टीने सोय म्हणून? त्याचबरोबर संयुक्त संघटन करताना स्त्रियांच्या नेमक्या कोणत्या अडचणी येतात, हेही त्यांनी एकदा स्पष्ट करावे.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला अर्धी चड्डी घालून अर्धा सलाम (कदाचित हा यावनी शब्द खटकेलही) करणारे सर्वच स्वयंसेवक चातुर्वर्ण्याधिष्ठित विषम समाजव्यवस्थेचा आणि हिंदुधर्मप्रणीत स्त्रीदास्याचा पुरस्कार करणारे असावेत असे मी मानीत नाही. त्यांच्यापैकी बहुसंख्यांना त्यांचे वय लक्षात घेता केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाचे आकर्षण असावे असे वाटते. संघाचा राष्ट्रवाद हा पूर्ण हिंदू राष्ट्रवाद आहे आणि हिंदू राष्ट्रवाद हा चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा पुरस्कर्ता असल्याने ब्राह्मणवर्गवर्चस्वावर उभा आहे. तो राष्ट्रवाद नसून जातीयवाद आहे. हे ज्या वेळी त्यांच्या ध्यानात येईल. त्या वेळी त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यास व अभ्यासण्यात मला आनंद होईल. म्हणून या इतिहासाची प्रत्येक शाखेवर चर्चा करण्याची तयारी संघाने दर्शविली पाहिजे.
- रावसाहेब कसबे (झोत)