नाटकातल्या माणसालाही जास्त नाटकं केलेले आवडत नाही...

Update: 2020-04-29 16:47 GMT

कहर काय असतो माहितीये? आमच्या मीडियावाल्यांकडे वयस्कर कालाकार जिवंत असतानाच त्यांच्या मृत्यूनंतर टीव्हीवर दाखवण्यासाठी तयार केलेलं एक व्हिडीओ पॅकेज असतं. कारण अचानक मृत्यूची बातमी आल्यास ते दाखवायला कामी येतं. त्यात त्यांचा जीवनपट वगैरे मांडला जातो. त्या पॅकेजला आवाजही एकदम धीरगंभीर दिलेला असतो. अशावेळी त्या वयस्कर कालाकारांची भयंकर कीव येते. यामध्ये दिलीपकुमार, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन यांच्यासारखे अनेकजण असतात. त्या बिचाऱ्यांना माहितही नसतं की, त्यांच्या मृत्यूआधीच त्यांच्यावर इकडं श्रद्धांजलीपर व्हिडीओ पॅकेज तयार आहे. पडून असतं ते. तिकडून बातमी आली की लगेच इकडं प्ले होतं.

इरफान भाई इथंपण कुणाच्या हाताला लागला नाही. याआधी मृत्यूच्या दाराला एकदा दस्तक देऊन आला होता परत. त्यांचं आणखी काम पाहण्यासाठी बहुतेक त्याला राजीखुशी परत पाठवलं असावं तिकडून. पण त्याचा इरादा पक्का होता. नाही करमलं त्याला इथं. "ओ भाईसाब, इत्ते मे इत्ताईच मिलता" असं त्याला सांगायचं असेल कदाचित. अन जक्खड म्हातारं होऊन व्हीलचेअरवरचं जगणं त्याला पसंद असणं शक्य नाही. त्याचं व्हिडीओ पॅकेज करताना मीडियावाल्यांची होणारी धावपळ तो मदारी बनून पाहत असेल.

नेमका अशा वेळेला सोडून गेला की त्याच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला गॉगल लावलेले पांढऱ्या कापड्यातले मेकअप सांभाळत येणारे सेलिब्रिटी आणि त्यांच्यावर कॅमेरा फिरवणारे मीडियाचे कॅमेरामन असं टिपिकल मृत्यूसोहळे वगैरे काहीही भडक भेसूर कृत्रिम आता दिसणार नाही. रॉयल एकटाच असणार तिथं त्याच्या जनाज्यात. नाटकातल्या माणसालाही जास्त नाटकं केलेले आवडत नाही, हे इरफान भाईच्या स्वभावातून दिसायचं. तेच त्याला आजही अपेक्षित असावं.

हिरो हिरोईनशिवाय चित्रपटात दखल घेण्यासारखं बरंच काही असतं. किंबहुना चित्रपट हिरोवरून बरावाईट ठरवणं हा मूर्खपणा आहे, हे लक्षात आणून देण्याचं श्रेय इरफानला जातं. असे लय जनं असतात त्यांना एकदा जवळून पाहावं वाटतं. पण मध्यमवर्गीय जिंदगी अशीच असते. तुम्हाला त्यांच्यापासून ती हटकून दूर ठेवते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर असह्य वाटण्याशिवाय तुमच्याकडे काहीच नसतं. जुने चित्रपट, व्हिडिओ असलं पाहून पाहून डोळे पणावनं हेच तुम्ही करू शकता.

पण खरंतर इरफानला त्या गॉगल लावणाऱ्या पांढऱ्या ड्रेसवाल्यांपेक्षा आपणच जास्त आवडत असतो. त्याची ती "ओ भईय्या..." हाक आपल्यासाठीच असते. इरफनच्या आवाजातला मदारी चित्रपटातला हा एक डायलॉग मनाला फार भावून गेला होता.

"बाज़ चूजे पर झपटा , उठा ले गया !

कहानी सच्ची लगती है, लेकिन अच्छी नहीं लगती...

बाज़ पर पलटवार हुआ.....!!!

कहानी सच्ची नहीं लगती लेकिन खुदा कसम बहुत अच्छी लगती है...!"

Love you Irfan yaar ओ भईय्या...!!!

Similar News