पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर हल्ला, गाडी फोडली

Update: 2022-09-14 05:27 GMT

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपने केलेल्या नबन्ना चलो आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि अनेक पोलीस देखील जखमी झाले आहेत. भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे आणि पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ED आणि CBI यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांवर कारवाई केली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत या विरोधात भाजपने कोलकातामध्ये सचिवालयावर मोर्चा आयोजित केला होता. यासाठी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पण यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी अडवले असा आरोप भाजपने केला आहे.

यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर प.बंगाल पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रूधूर सोडला असा आरोप भाजपने केला आहे. यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. तसेच अनेक गाड्यांची तोडफोड केल्याची दृश्य व्हायरल झाली आहेत. यावेळी आंदोलनात उतरलेल्या सुवेंदू अधिकारींसह पोलिसांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. भाजप राज्यातील वातावरण बिघडवत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर भ्रष्टाचाराविरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याने ममता यांचे सरकारवर आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसेचे काही व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसने देखील यावर टीका केली आहे.

Similar News