शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष, शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात नवी याचिका

Update: 2022-09-06 07:03 GMT

राज्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. या वादात घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या दरम्यान कोर्टाने पक्षचिन्ह आणि पक्षावरील वर्चस्वाबाबत निववडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणीबाबत आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू ठेवावी पण कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये असे आदेशही तत्कालीन सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी दिले होते. त्यामुळे सध्या राज्यातील सत्तासंघर्षात स्थिती जैसे थे आहे.

दरम्यान आता शिंदे दे गटाकडून सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केली आहे. एवढेच नाही तर या रिट याचिकेर सुप्रीम कोर्टानं त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रीये संदर्भात निर्णय द्यावा अशीही विनंती सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली आहे.

येत्या कालावधीत राज्यात महापालिका निवडणूका आहेत. शिवाय अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. त्याअगोदरच शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल लावणे आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता द्यावी, शी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आलीय.

शिंदे गटाच्या या खेळीमुळे उद्धव ठाकरे गटाची चिंता आता वाढली आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या संघर्षाचा निकाल लागल्याशिवाय निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये अशी उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Similar News