Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > तुम्हाला अंदाज का येत नाही ?

तुम्हाला अंदाज का येत नाही ?

तुम्हाला अंदाज का येत नाही ?
X

टीकेला ट्रोल समजायचं आणि ट्रोल ला संकटमोचक... या भावनेत सत्ताधारी पक्षातले लोक अडकलेयत.

तुमच्यावर टीका केली नसती तर आपत्तीत खात्यात पैसे द्यायचे नसतात, चक्क्या बंद असताना गहू देऊ नयेत, पंक्चर बोटी जीव वाचवू शकत नाहीत या तसंच अशा अनेक गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या का? बरं तुम्हाला हे सांगून आमचा राजकीय फायदा काय आहे?

गेली अनेक वर्षे शासन-प्रशासनाच्या सोबत पूर-दुष्काळ-बाँबस्फोट-दंगली-तणाव अशा अनेक आपदा कव्हर केल्या आहेत. कोणी काही सूचना केली की शत्रूच्या नजरेने पाहिलं नाही. तुमच्या पेक्षा आमची अक्कल-अनुभव कमी असू शकतो. पण आम्ही माध्यम आहोत. आम्हाला शासन-प्रशासनात काम केलेले अनेक अनुभवी लोक फोन करून अनेक गोष्टी सुचवत असतात. सांगत असतात. अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं या सरकारला काय सांगणार? अनेक अधिकाऱ्यांना हा आपल्या क्षेत्रात हस्तक्षेप वाटतो. ब्युरोक्रॅसी हावी आहे. यावर सरकारने खरंच विचार केला पाहिजे.

काल मुख्यमंत्री म्हणाले, पावसाचा अंदाज नव्हता. अभूतपूर्व पाऊस पडला. जर अभूतपूर्व पाऊस पडला असेल आणि त्याचा अंदाज नसणं ही गंभीर त्रुटी नाहीय का? ग्राऊंड वरून तुम्हाला कोणीच काही सांगत नव्हतं का? तुम्हाला हेलिकॉप्टर लँडींग ला परवानगी नाही मिळाली असं तुमचं म्हणणं आहे, मग इतर मदत पथकं, स्वयंसेवी संस्था कशा पोहोचल्या पूरग्रस्त भागात. हवाई मार्गे गेलंच पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही मंत्रालयात बसू शकला असता. तुम्ही मंत्रालयात नव्हता ही गंभीर चूक आहे.

एका माजी अधिकाऱ्याने लिहिलंय की, तूरीचं उत्पादन किती होणार आहे याचा अंदाज नव्हता, पाऊस किती पडणार याचा अंदाज नव्हता.. या राज्याच्या प्रशासनाला झालंय तरी काय?

हा गंभीर प्रश्न आहे. अभूतपूर्व पाऊस मुंबईतही झाला होता, पण मदत कार्यात शासन-प्रशासन तातडीनं उतरलं होतं. लोक तुमच्या सोबत आहेत, विविध मतदानामध्ये हे सिद्ध झालंय, पण तुमचेच खासदार म्हणतात की प्रशासनाने परिस्थिती नीट हाताळली नाही. असंच राहिलं तर इथे नक्षलवादी तयार होतील..

मुख्यमंत्री साहेब, तुम्ही टीका कशा पद्धतीने घेता मला माहीत नाही, पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला २५ दिवस यात्रेवर नेण्याचं प्लानिंग ज्या कुणाचं होतं, त्यांच्या पासून तुमच्या अपयशाची यात्रा सुरू होतेय. तुम्ही पाऊस वाढल्यानंतरही यात्रा बंद केली नाही. बूँद से गई वो हौद से नहीं आती असं म्हणतात. काल बीड मध्ये १०० दिवस पाणी पुरवठा बंद असल्याची बातमी वाचली. टोकाच्या आपत्ती महाराष्ट्रात सध्या आहेत. आकडे सांगतायत तुमचंच सरकार येणार आहे, हे आकडे तुमच्या कारभाराचं सर्टीफिकेट आहेत पण नियोजन केलं नाही तर हेच आकडे उलटू शकतात. जनता कुणाचीच नसते, हे आमच्या पेक्षा तुम्हाला जास्त चांगलं समजतं.

तुमचं आयटी सेल सुसाट सुटलंय. त्याला आवर घालायला हवा. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही, असं तुम्हीच म्हणता. हे तुम्ही तुमच्या लोकांनाही सांगायला पाहिजे. त्यांचा सोशल मिडीयावरचा अतिरेकी वावर तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचवतंय इतकं मात्र नक्की !

Updated : 11 Aug 2019 4:44 AM GMT
Next Story
Share it
Top