Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > पेरले ते उगवणारच ... 

पेरले ते उगवणारच ... 

पेरले ते उगवणारच ... 
X

हर्षवर्धन पाटलांवर धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली, तेव्हाच मी न्यूज रूममध्ये म्हटलं होतं, हे खूप भारी पडणार आहे भारतीय जनता पक्षाला. प्रचाराच्या दरम्यान अजित पवारांच्या ताफ्यातील गाड्या आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते ठिकठिकाणी अडवत होते. टी.व्ही. स्क्रीनवर केवळ हीच दृश्ये सतत दिसायची.

राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार येण्याचा मार्ग मराठा-धनगर समाजाने क्लिअर केला. भाजपच्या वतीने सुपारी वाजवणाऱ्यांना नवीन सरकारमध्ये मंत्रीपद-आमदारकी-समिती दिली की काम भागेल असं भाजपच्या 'चाणक्यांना' वाटलं होतं. पण जो समाज कशाचीही पर्वा न करता रस्त्यावर उतरला तो इतक्या स्वस्तात मानेल हे शक्य नव्हतं. ही आंदोलनं नेतृत्वहीन होती. आजही या आंदोलनांना नेतृत्व लागत नाही. भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांनी जातीच्या ॲसिडसोबत खेळायचं ठरवलं, आज त्यात हात पोळले तर बोंबाबोंब सुरू आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर मूक आणि नंतर ठोक मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज सतत आक्रोश व्यक्त केला आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा ही तापलाय. जसजशी निवडणूक येईल तसतसं वातावरण अधिक तापणार आहे. यंदाची निवडणूक ही विकासाच्या नाही तर जातीच्या मुद्द्यावरच होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सांगीतलंय, हा मुद्दा आता कोर्टात आहे. आरक्षण देण्यावरून अनेक वाद आहेत, अडचणी आहेत. सर्व अडचणी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या चाणक्यांना आधीपासून माहीत आहेत. जात आणि प्रतिकांसाठी महाराष्ट्र वेडा आहे, याचा वापर करून सहज राजकारण करता येतं. पण हे सहज राजकारण किती महागात पडू शकतं याची जाणीव ही असं राजकारण करणाऱ्यांना हवी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आज वर्षा बंगल्यावर पूजा करावी लागली. पंढरपुरात येऊ देणार नाही म्हणून आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी इशारा दिला होता. उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जोरदार डायलॉग मारला, मला झेड प्लस सिक्योरिटी आहे, मला कोणी रोखू शकत नाही. दहा लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपण जात नाही. वर शिवाजी महाराजांचं नाव ही ते घ्यायला विसरले नाहीत.

माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, तुम्हाला झेड प्लस सुरक्षा आहे. पण जनता ही झेड प्लस पेक्षा मोठी आहे. या जनतेने अनेकांना झेडप्लस सुरक्षेसह उखडून फेकलं आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी जी जी हत्यारं तुम्ही वापरलीयत ती आज उलटू लागलीयत.

ज्यांना संत परंपरेतील संतापेक्षा मनू श्रेष्ठ वाटतो त्या विचारधारेच्या संरक्षणासाठी तुम्ही झटतायत अशी तुमची प्रतिमा आहे. वारकरी शांत बसतो-गप्प बसतो, त्याच्या शांततेत- मौनात खूप ताकद आहे. आज यामुळेच वारकरी तुमच्या संरक्षणासाठी पुढे आले नाहीत. नाहीतर विठ्ठलाला भेटण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकले नसतं. कुठल्याही झेडप्लस पेक्षा ही ताकद मोठी आहे.

जाता जाता, राज्य घटनेने उपासनेचा अधिकार दिलाय, त्यापासून कुणालाही थांबवणे योग्य नाही. मराठा ठोक मोर्चाच्या ज्या कुणा बालिश नेत्याने अशा आंदोलनाची आखणी केली असेल त्याला मराठा समाजाने आंदोलनातून बाहेर काढलं पाहिजे. ही मराहाराष्ट्राची संस्कृती नाही.

- रवींद्र आंबेकर

Updated : 23 July 2018 6:00 AM GMT
Next Story
Share it
Top