Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > तारक-मारक मंत्र, अफू-गांजा आणि आपण

तारक-मारक मंत्र, अफू-गांजा आणि आपण

तारक-मारक मंत्र, अफू-गांजा आणि आपण
X

मारक मंत्राचा वापर विरोधी पक्षाने केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे शीर्ष नेत्यांचा मृत्यू होईल, भाजपासाठी हा वाईट काळ आहे, असं एका बाबांनी मला सांगीतलं, गर्दीमध्ये त्यांच्या इशाऱ्याकडे माझं लक्ष गेलं नाही. पण आता हे खरं वाटायला लागलंय, असं बोलून साध्वी नाव धारण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चॉइस असलेल्या प्रज्ञा सिंह यांनी राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला हरताळ फासला आहे. संविधानात बदल करण्याची उबळ भाजपाई लोकांना का आहे, याचा हा छोटासा नमुना.

भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज, अरूण जेटली अशा उमेदीच्या नेत्यांच्या मृत्यूनंतर पक्षात पोकळी निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदीं आणि अमित शहांनी अशा प्रकारची पोकळी जाणवू नये म्हणून आधीच तरतूद करून ठेवली होती. पक्षात प्रज्ञा सिंह सारख्या नेत्यांचा भरणा ही करून ठेवलाय. विरोधी पक्ष मारक मंत्राचा वापर करतंय, ही माहीती, अफवा किंवा आरोपच गंभीर आहे. ज्या विरोधी पक्षाला २०१२ पासून लकवा मारलाय, ज्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागतंय तो विरोधी पक्ष मिळणार असेल तर स्वतःसाठी तारक मंत्र शोधेल की आधी. या तारक-मारक आणि काळ्या जादूच्या चक्करपायी या देशाचं खूप नुकसान झालं आहे. यातून या देशाला बाहेर काढण्यासाठी समाजसुधारकांच्या पिढ्या संपल्या. खूप मोठा त्याग या देशातील विद्वानांनी केला आहे. राज्यघटनेत ही वैज्ञानिक दृष्टीकोन नमूद करण्यात आलं आहे. या सगळ्याच कारणच हे आहे.

प्रज्ञा सिंह, मालेगाव बाँबस्फोटाचील आरोपी आहे. प्रज्ञासिंह यांच्यावर दहशतवादाचा खटला सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रज्ञासिंहचं राजकीय पुनर्वसन करून तिला प्रतिष्ठा मिळवून द्यायचं काम भाजपा ने केलंय. या प्रज्ञासिंहने आतापर्यंत अनेक अवैज्ञानिक गोष्टी सांगितल्या आहेत. भगवे कपडे घातल्यानंतर कोणी साधू-संत-साध्वी होत नाही हे वारंवार प्रज्ञासिंह ने सिद्ध केलं आहे. तरी सुद्धा देशातील जनता अशा नेत्यांचा अनुनय करते, हे गंभीर आहे. देशातील जनतेला चांगल्या वाईटातला साधा फरक कळत नाही हे त्याहून गंभीर आहे.

मध्यंतरी निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी केदारनाथला गुहेत ध्यानधारणेला बसले, तेव्हा काही भक्तांनी मोदींना सिद्धी प्राप्त आहे, आणि ते त्या बंद गुहेतून ध्यान-धारणेच्या बळावर चमत्कार घडवणार आहेत अशा आशयाचा मजकूर प्रसारित केला होता. सध्या सर्वात जास्त भगवे कपडेधारी भाजपाने संसदेत पोचवले आहेत. या सगळ्यांचा अशा पद्धतीच्या काळ्या जादू, चमत्कार-सिद्धीवर फार विश्वास आहे. आणि या लोकांवर त्यांच्या भक्तांचा विश्वास आहे, प्रज्ञा सिंह यांनी तर दावा केला होता की त्यांच्या श्रापाने करकरेंचा मृत्यू झाला. अशा सर्व चमत्कारी लोकांना गोळा करून ही देशाच्या अर्थव्यववस्थेचे तीन-तेरा वाजलेयत. अर्थव्यवस्थेत जे काही रोज नवनवे चमत्कार केले जात आहेत त्यामुळे फक्त कर संकलन म्हणजे Tax Collection वाढताना दिसतंय. उत्पादन दिवसें दिवस घटत आहे. रोजगार जात आहेत. देशभरात मंदी पसरलीय. अशा मंदीवर तुमचा कुठलाच मंत्र चालत नाहीय. देशाला रोज एक नवी घुटी पाजायची, अफू-गांजाची देशप्रेम-राष्ट्रभक्ती-धर्म-जात यांची गोळी द्यायची इतकंच काम केलं जातंय.

प्रज्ञा सिंह सारख्या विलक्षण कमी कुवतीच्या आणि बौद्धीक क्षमतेच्या लोकांना निवडून देणाऱ्या जनतेच्या बौद्धीक क्षमतेबद्दल ही बोललं पाहिजे. सहसा आपण जनतेच्या-पब्लिकच्या विरोधात बोलत नाही, पण त्यावरही बोललं पाहिजे. जर तुम्हाला अजूनही अक्कल आलेली नसेल, तर या अशा पद्धतीच्या लोकांच्या मार्फत मरण्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. ज्यांचे विचार विध्वंसक आहेत, ज्यांची कृती मारक आहे, वक्तव्य घातक आणि अवैज्ञानिक आहे, अशा लोकांच्या हातात धर्म आणि सत्ता दोन्ही असुरक्षित आहे. हे लोक लोकशाही, अर्थव्यवस्था नक्की टिकवू शकतील का यावर विचार करा. प्रज्ञा सिंह यांच्या टाइपच्या लोकांचे विचार लोकशाही समाजासाठी हानिकारक आहेत. निदान विचार करा.

Updated : 27 Aug 2019 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top