खलनायक कोण?

खलनायक कोण?
X

गुजरात निवडणुकीचा माहौल तापत असताना, प्रचारात आलेल्या पाकिस्तानी हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून चांगलंच रणकंदन माजलं आहे. काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या जेवणावरून काँग्रेसचा खाना-खराबा होतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर भाषणात माजी पंतप्रधान, माजी सैन्यप्रमुख तसंच इतर काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानी उच्चाधिकाऱ्यांसमवेत केलेली चर्चा प्रकाशात आणत हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधानांवर टीका करत देशाची माफी मागायची मागणी केली आहे.

एकूणच प्रकार राजकीय षडयंत्राचा नाही हे त्या जेवणाला उपस्थित असलेल्या सर्वांनीच स्पष्ट केलं आहे. या आरोपाचं गांभीर्य समजून घेण्याची नरेंद्र मोदी आणि त्यांच्या ब्रिगेड ची मानसिकता नाहीय. त्यांच्या दृष्टीकोनातून प्रचाराला मुद्दा मिळाला आहे, आणि काँग्रेसला प्रचाराच मागे रेटण्यात, राष्ट्रद्रोही सिद्ध करण्यात मोदींनी बाजी मारलीय हेच खूप आहे.

एखादा शत्रू देश दुसऱ्या देशातील राजकीय कार्यक्रम-निवडणूकांमध्ये हस्तक्षेप करून अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर शहाणं सरकार त्या देशाच्या उच्चायुक्तांना बोलवून तंबी देतं, किंवा राजकीय संबंध संपुष्टात आणतं. इतरही अनेक डिप्लोमॅटीक उपाययोजना केल्या जातात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मात्र तसं काही दिसत नाही. त्यांचं भाषणच त्यांचं शासन असल्याने त्यांनी या गोष्टीची वाच्यता त्यांच्या भाषणात केली. भाषणानंतर जो काही गदारोळ झाला त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसवर आली. काँग्रेसनेही त्याला उत्तर दिलं, पण त्या आधी पाकिस्तान सरकारने पंतप्रधानांना ट्वीट द्वारे समज दिली. तुमच्या अंतर्गत विषयांमध्ये आम्हाला ओढू नका, तुमच्या निवडणूका तुम्ही जिंका असा टोला पाकिस्तानने लगावला. एका बलाढ्य देशाच्या पंतप्रधानाला एक छोटासा देश सुनावतो, पण त्याला देश म्हणून उत्तर देण्याऐवजी आपण अजूनही निवडणूकीतच गुंतलेलो आहोत ही मोठी शोकांतिकाच आहे.

अहमद पटेल यांना पाकिस्तान गुजरातचा मुख्यमंत्री बनवू इच्छितो असा खुलासाही खुद्द पंतप्रधानांनी करणं म्हणजे हास्यास्पदच आहे. पण भक्तांना टाळ्या पिटण्यासाठी वाक्य मिळाल्यामुळे ते या वाक्यांच्या मागच्या अर्थाचा शोध घेण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. अहमद पटेल मुख्यमंत्री होऊ शकतात हे मोदी मान्य करत असतील तर त्यांचा विकास हरलाय हे ही त्यांनी मान्य केलंय का? विकासाच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींना पाकिस्तान सारख्या मुद्द्यावर वारंवार का यावं लागतं याचा शोध ही घेण्याची गरज आहे. बिहारच्या निवडणूकीत अमित शहांनी सांगितलं की भाजपा हरलं तर पाकिस्तानात फटाके वाजतील, फटाक्यांची अशी भीती दाखवून भाजपा आणखी किती काळ राजकारण करणार आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आलेख चढता राहिला आहे. निवडणूका जिंकायच्याच या विचाराने पछाडलेल्या या जोडीला जर कुठल्या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला तर ही जोडी खरोखरच पाकिस्तानशी युद्ध करायलाही मागेपुढे पाहणार नाही. निवडणूकांसाठी देशाला इतक्या अस्थिर वातावरणात ढकलणाऱ्या सर्वच राज्यकर्त्यांना आता ठिकाणावर आणायची वेळ आली आहे.

या आधीही राहुल गांधी यांच्या चीन उच्चायुक्तांसोबच्या भेटीवरून वादंग माजलं होतं. काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षाचा अधिकृत दर्जा जरी नसला तरी देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राजकीय बातचितीसाठी अशा भेटी होत असतात. इतकंच काय परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळांमध्ये सरकार आवर्जून विरोधी पक्षांना घेऊन जात असतं. काही वेळा तर अशा शिष्टमंडळांचं नेतृत्वही विरोधी पक्षांतील नेत्यांनी केलं आहे. खुद्द माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विरोधी पक्षात असूनही अशा शिष्टमंडळांचं नेतृत्व केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी हे ही अनेकवेळा केंद्र सरकारच्या शिष्टमंडळांसोबत गेले आहेत.

आपणच फक्त देशप्रेमी आणि इतर पक्ष देशद्रोही असं वर्गीकरण करून चालण्याचं राजकारण नरेंद्र मोदी रूढ करू पाहत आहेत. सर्वांच्याच हेतूवर शंका निर्माण करायची, त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करायचं काम पंतप्रधानांनी करणे योग्य नाही. जर बेकायदेशीर काही असेल तर सरकारने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. भाषणबाजीचा खेळ थांबवला पाहिजे. एखादी निवडणूक हरल्याने-जिंकल्याने आकाश कोसळत नाही, पण असल्या वाचाळपणामुळे देशाचं नाव मात्र बदनाम होत आहे.

Updated : 12 Dec 2017 1:27 PM GMT
Next Story
Share it
Top