जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीची आंधळेपणाने पाठराखण करू नका – संजीव चांदोरकर

जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीची आंधळेपणाने पाठराखण करू नका – संजीव चांदोरकर

104
0
world economic, india, news, recession, high and rising, news, marathi, maharashtra, blog,
जागतिक भांडवलशाहीच्या पोटातील “टेक्टॉनिक प्लेट्स” २००८ च्या आर्थिक अरिष्टापासून हलायला सुरुवात झाली होती. त्याचा हालचाली अधिकधिक वादळी होऊ लागल्या आहेत. आणि त्याची कंपने जागतिक भांडवलशाहीच्या हेडक्वार्टर्सला जाणवू लागली आहेत.
जे पी मॉर्गनचे सर्वेसर्वा जिमी डिमॉन यांच्या अध्यक्षतेखाली परवा अमेरिकेतील १८१ कंपनी प्रमुख, वॉल स्ट्रीट वरचे बँकर्स एकत्र जमले होते.
गेली चाळीस वर्षे जागतिक भांडवलशाहीने कॉर्पोरेट्सचा / बँकांचा कारभार हाकण्यासाठी एकच एक मार्गदर्शक सूत्र गळी उतरवले : कंपनीच्या भागभांडवलदारांचे भले करणे (Maximization of Shareholders Value) ते ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करावयास लागले तरी चालेले असे तत्वज्ञान रुजवले गेले. परवा अमेरिकेतील कंपनी प्रमुखांच्या बैठकीत हे मान्य करण्यात आले त्याचा सारांश:
(१) फक्त शेअरहोल्डर्सचे हितसंबंध सांभाळण्याच्या एकांगीपणामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे, कंपन्यांविरुद्ध असंतोष पसरला आहे.
(२) कोणतीही कंपनी वस्तुमाल / सेवेचे उत्पादन करते ते काही निर्वात पोकळीत नाही; तिचे अनेक स्टेकहोल्डर्स असतात: कच्चा माल पुरवणारे, वेंडर्स, कामगार, कर्मचारी, ग्राहक, शासन, पर्यावरण व एकूणच समाज ! कंपन्यांनी सर्व स्टेकहोल्डर्सचे हित बघितले पाहिजे फक्त शेअरहोल्डर्सचे नाही
(३) एक डोळा कंपनीच्या शेअर प्राईसवर व दुसरा डोळा तिमाही रिझल्ट्सवर ठेवल्यामुळे दीर्घकाळासाठी कंपनी बांधण्याकडे दुर्लक्ष होते .
(४) ज्वलन्त सामाजिक व महत्वाच्या राजकीय प्रश्नांवर कंपनी प्रमुखांनी जाहीर भूमिका घेतल्या पाहिजेत !
गेली चाळीस वर्षे डावी मंडळी याच मुद्यांवर (व अजनूही) जागतिक कॉर्पोरट भांडवलशाहीवर सातत्याने टीका करीत आहेत. की जगातील अनेक प्रश्नांची मुळे ही प्रणाली ज्याप्रकारे चालवली जात आहे त्यात आहेत.
पण अतिशय बालिशपणे त्याचा प्रतिवाद केला जातो “मग काय नफा कमवायचा नाही का ? मग काय तुम्हाला ती रशियन प्रणाली आणायचीय का ? इत्यादी”
डाव्या विचाराची स्वतःची मूल्ये आहेत. पण ती तूर्तास बाजूला ठेवूया. अशा रीतीने कॉर्पोरेट वित्त भांडवलशाही टिकू शकणार नाही हे सत्य ती मांडत असते. आजच्या काळात डावी मंडळी अल्पसंख्य असली तरी सत्य अल्पमत वा बहुमतावर कधीही अवलंबून नसते.
बाकीच्यांचे जाऊद्या. संवेदनशील व स्वतःची विचारशक्ती शाबूत असणाऱ्या मध्यमवर्गीयांना, विशेषतः तरुणांना आवाहन !
जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीची आंधळेपणाने पाठराखण करू नका.
आज जगभर विचाराने बिलकुल डावे नसणारे अनेकजण भांडवलशाहीवर टीका करीत आहेत. जिमी डिमॉनच्या ग्रुपची मिटिंग तर त्या सर्वावरचा कळस आहे !