Home News Update …..तर आम्हाला सामुहिक आत्महत्या करावी लागेल!

…..तर आम्हाला सामुहिक आत्महत्या करावी लागेल!

420
Support MaxMaharashtra

औरंगाबादमध्ये व्हिडिओकॉन कंपनीतल्या कामगारांचं साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या ७२ दिवसांपासून ३४० कामगार आपल्या मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासन आणि कंपनी कोणाचंच आमच्याकडे लक्ष नाही असा आरोप या कामगारांचा आहे.

‘ऑटोकार्स’ ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीशी संगग्नित कंपनी आहे. या कंपनीचे मालक अक्षय राजकुमार धूत हे आहेत. व्हिडीओकॉन गृपच्या सर्व वहातूक व्यवस्थेची जबाबदारी ‘ऑटोकार्स’वर आहे. मात्र, २०१६ मध्ये कंपनीत युनियन आल्यापासून कंपनी आणि कामगारांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. अनेकांचे पगार बंद होणं, कामगारांना काम न देणं अशा गोष्टी सुरु झाल्या. त्यानंतर आता गेल्या १२ महिन्यांपासून या कंपनीच्या ३४० कामगारांना काम दिलं जात नाहीय आणि त्यामुळे त्यांचा पगारही बंद आहे. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती असली तर आम्हाला सामुहिक आत्महत्या करावी लागेल असा इशारा या कामगारांनी दिला आहे.

कंपनी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तब्बल ३४० कामगार औरंगाबादच्या कामगार उपायुक्त कार्यालयासमोर २८ ऑगस्टपासून साखळी उपोषण करत आहेत. या कामगारांमध्ये हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व जातीधर्मातले कामगार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘भिग मांगो’ आंदोलन करत या कामगारांनी धूत बंधूंना जिल्हाधिकारी उदय चौधरी मार्फत ६२१ रुपये पाठवले होते.

कंपनीने गेल्या १२-१३ महिन्यांपासून काम आणि पगार देणं बंद केलंय. कंपनीच्या व्यवस्थापनाला कारण विचारण्यासाठी फोन केला तर कोणीच फोन उचलत नाही. कंपनीचं व्यवस्थापन, मालक कोणीच बोलण्यास तयार नाही. कंपनीतल्या वरिष्ठ पदावरच्या अनेकांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. त्यामुळे कामगारांनी नेमकं कोणाशी संपर्क करायचा हा देखिल एक प्रश्न आहे. याऊपर आमच्या जागेवर दुसऱ्या कामगारांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलं असल्याचंही या कामगारांनी सांगतिलं.

“कामगारांनी युनिअन तयार केल्याने त्यांना कायद्याप्रमाणे नोकरीत नियमित करावं लागेल आणि त्यासाठीचा पगार आणि इतर सुविधा द्याव्या लागतील म्हणून कंपनीनं काम देणंच बंद केलं. धूत बंधुंनी हजारो कोटींचं कर्ज बुडवलं आणि तरीही ते आपल्या घरात आराम करत आहेत. त्यांना सर्वसामान्य कामगारांची काहीच चिंता नाही, असं कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन खंदारे यांनी सांगितलं.

राजकुमार धूत हे शिवसेनचे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे या प्रकरणात काहीच पाऊलं उचलली जात नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. शिवसेनेला हा धूत बंधुंचा दरोडा मान्य आहे का असा सवालही त्यांनी केलाय. या ७२ दिवसांत जिल्ह्यातला, शहरातला एकही आमदार, खासदार लोकप्रतिनीधी इथं येऊन भेटून गेलं नाही असं साईनाथ ठेंगडे यांनी सांगतिलं.

मी माझं पूर्ण आयुष्य व्हिडीओकॉन कंपनीत काम करत काढलंय. पण गेल्या ५ वर्षांपासून माझा पगार थांबललाय. आता म्हातारपणात मी कुठं जाऊ, असा प्रश्न गफ्फार खान यांच्यापुढे आहे. ३४० कामगारांनी फुटाणे खाऊन उपोषणाच्या मंडपात दिवाळी साजरी केली असं सांगताना खान यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

कमावत्या पुरुषाचा पगार बंद झाल्याने घरातल्या महिलांनी धुणीभांडी करुन घर चालवावं लागतंय. या कामगारांपैकी कोणी मजुरी करतंय तर कोणी रिक्षा चालवतंय. अनेकांची शाळा-कॉलेजात शिकणारी मुलंही आता २००-३०० रुपये दिवसाप्रमाणे कामाला जात आहेत.

आम्ही गेल्या २०-२५ वर्षांपासून व्हिडीओकॉन कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतोय. युनियन लागल्यापासून कंपनीनं अनेक ड्रायव्हर लोकांना फोडण्यासाठी दुसऱ्या गाड्या चालवायला दिल्या. कामगार आयुक्तांनीही आमची बाजू ऐकून घेतली नाही. आमच्या हातात काही, आम्ही तुमच्यासाठी काही करु शकत नाही असं म्हणत टाळल्याचंही कामगारांनी सांगितलं.

मी २००८ पासून कंपनीत कामाला आहे. २०१६ ला युनियनमध्ये आल्याने कंपनीनं काढून टाकलं. तेव्हापासून सगळं बंद आहे. आता मोलमजुरी करुन कसंबसं घर चालवतोय. त्यात चार मुलांचं शिक्षण कसं करायचं असा प्रश्न माझ्यापुढे आहे. या अशा परिस्थितीमुळे माझी इच्छा असूनही मी त्यांनी शिकवू शकत नाही अशी खंत संजय रगडे यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात ‘मॅक्स महाराष्ट्र’ने ऑटोकार्स कंपनीचे संचालक अक्षय धूत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय औरंगाबाद कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचाही फोन बंद आला.

२०१५ साली फोर्ब्जच्या यादीत भारतातील ६१ वी श्रीमंत व्यक्ती म्हणून व्हिडिओकॉनचे संस्थापक चेअरमन वेणूगोपाल धूत यांचा गौरव करण्यात आला होता. मात्र, आता परिस्थिती फार बदलली आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन कंपनीला दिलेलं कर्ज वादात आहे. त्यासंदर्भात बँकेच्या संचालिका चंदा कोचर यांची ‘ईडी’कडून चौकशी करण्यात आली आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997