Home News Update बेरोजगारीने घेतला आदिवासी माय, लेकरांचा बळी

बेरोजगारीने घेतला आदिवासी माय, लेकरांचा बळी

557
0
Support MaxMaharashtra

पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या ज्योती वाघ आणि दिड वर्षाच्या लेकराचा विजेचा शॉक लागुन मृत्यू

अवकाळी पावसाने शेती ऊध्वस्त झाली त्यामुळे शेतीतला रोजगार नाही. तर ढिम्म प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार ऊपलब्ध न केल्याने आदिवासी कुटुबाला पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत व्हावे लागले आहे.

मात्र, याच बेरोजगारी आणि पापी पोटाने मोखाड्यातील पळसुंडा (विकासवाडी) येथील ज्योती वाघ आणि तीचा दिड वर्षाचा मुलगा राघो याचा  बळी घेतला आहे.

शेतीच्या कामासाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे गेलेल्या ज्योती आणि राघोचा शेतातील झोपडीत विजेचा शॉक लागुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आदिवासी भागात शेतीचे काम संपताच म्हणजे २ ऑक्टोबर गांधी जयंती पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आवश्यक आहे.

तसे शासनाचे धोरणही आहे मात्र, प्रशासनाने येथे कामच सुरू केलेली नाही. त्यातच यावर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे.

स्थानिक ठिकाणी शेतीचा रोजगारच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतमजुर बेरोजगार झाला आहे. तर भुमिहीन शेतकरी उपासमारीच्या खाईत ढकलला गेला आहे.  पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांनी स्थलांतर केले होते.

पळसुंडा विकासवाडीतील काळू, ज्योती आणि दिड वर्षाच्या राघो या भुमिहीन कुटूंबाने २००  रूपये रोजाच्या मजुरीसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे शेतातील कामासाठी स्थलांत केले.

येथे शेतातच झोपडी बांधून हे कुटूंब रहात होते. यावेळी ४ नोव्हेंबरला झोपडीत असलेल्या दिड वर्षाच्या राघोला विजेचा शॉक लागला. त्यावेळी त्याला सोडविण्यासाठी ज्योती धावली आणि दोघांनाही शॉक लागल्याने त्यातच या दोघा मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार ऊपलब्ध न केल्याने, या भुमिहीन कुटूंबाला पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागले आहे. या ठिकाणीच रोजगार उपलब्ध झाला असता तर अशी घटनाच घडली नसती.

या पिडीत कुटूंबाला शासनाने तातडीने मदत करावी आणि येथे रोजगार निर्मिती करावी अशी मागणी येथील रहिवासी रघुनाथ पाटील यांनी केली आहे. तसे न केल्यास महादेव कोळी समाज संघटनेच्यावतीने त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे

आजही कातकरी कुटूंब म्हटलं की ऊन्हा तान्हात मेहनत करणारे, अंगावर वितभर वस्त्र असलेले आणि रानावनात भटकणारे बांधव डोळ्यासमोर येतात. स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही कातकऱ्यांबाबत हे चित्र तसेच आहे.

देशातील मूलनिवासी आदिम जमात असणारा आणि इतर समाजांपेक्षा अगदी वेगळी जीवनशैली जगणारा हा कातकरी समाज कायमचा गावकुसा बाहेर राहिलाय.

त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही शिक्षणाचा गंध नाही या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक तोकडे प्रयत्न झाले. विविध योजना सुरु झाल्या खऱ्या मात्र, त्यांची अमलबजावणी झाली नाही शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे

मुंबईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील कातकरी समाज मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहे.

वर्षातील काही दिवस हातात काम असेल तेव्हा या वस्तीवर राहायचे अन्यथा संसार पाठीवर घेऊन घरापासून काही किलोमीटर लांब वीटभट्टी किंवा शेतावर मजुरीचे काम करायचे.

मिळेल ते खायचे अज्ञानाने गांजलेल्या या समाजात शिक्षणाची आबाळ असल्यामुळे आश्रम शाळा जवळ असलेल्या वस्त्यांवरचीच मुले कशीबशी पाचवीपर्यंत शिकू शकतात.

आर्थिक विवंचनेनं ग्रासलेल्या गावकोसापासुन दुर असलेल्या या पाड्यांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. मालकीची शेतजमीन नाही शिवाय उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी कोसोदूर भटकंती करावी लागते. याकडे शासन कधी लक्ष घालणार…

रोहयो योजनेची अंमलबजावणी कागदावरच

शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना २००५ वर्षापासून लागू केली. रोहयो मजुरांच्या मागणीनुसार वर्षभरात शासनाने रोहयो मजुरांना १०५ दिवस काम देणे बंधनकारक आहे. ‘मागेल त्याला पंधरा दिवसात रोजगार’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाचा उद्देश यशस्वी होताना दिसत नाही.

यामुळे या भागातील आदिवासी रोहयो मजुरांचे स्थलांतर होते. कायमस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने अनेक समस्या या आदिवासी ग्रामीण भागात निर्माण होऊन भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य, गरिबी या समस्या सतत भेडसावत असतात.

जॉबकार्ड धारक रोहयो मजुरांना ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती, बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाणलोट क्षेत्र, वनीकरण अशा यंत्रणा महात्मा गांधी रोजगार हमी योजतुन रोजगार देणाऱ्या यंत्रणा आहेत. मात्र एकाही मजुराला रोजगार हमीवर वर्षभरात १०५ दिवस काम मिळत नाही.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997