आमचं ठरलंय, आम्ही विधानसभा लढवणार – लक्ष्मण माने

आमचं ठरलंय, आम्ही विधानसभा लढवणार – लक्ष्मण माने

वंचित बहुजन आघाडीमध्ये आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय हे एकट्या प्रकाश आंबेडकर यांनीच घेतलेले आहेत. लोकसभेचे उमेदवार त्यांनीच ठरवले, प्रचाराची सूत्रंही त्यांच्याच हातात होती, आघाडीचे अध्यक्ष म्हणून आम्ही सर्वाधिकार हे त्यांनाच दिले होते. त्यामुळं त्यांच्या निर्णयांना मी कधीच विरोध केला नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अजूनही २८८ जागा लढवण्याच्या निर्णयावरच ठाम आहेत, त्यामुळं त्यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याचं वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी घेतल्याचं मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय.
वंचित बहुजन आघाडीला लोकांना भरूभरून प्रेम दिलं. त्यामुळं राज्यातल्या राजकारणात एक मोठी लाट तयार झाली होती, मात्र लोकसभा निवडणुकीत ती लाट गेली कुठं, त्या लाटेचं रूपांतर मतांमध्येही दिसलं नाही, असं मत माने यांनी व्यक्त केलंय. वंचितनं लोकसभेच्या ४८ जागा लढवूनही हातात नारळच आला तर विधानसभेच्या २८८ जागा लढवूनही नारळच येणार असेल तर इथंच थांबलेलं बरं, असं माने यांनी सांगितलं.
हा पक्ष नको, तो पक्ष नको म्हणून आम्ही स्वतःचं नुकसान करून घेत आहोत. जर राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी पक्ष असेल तर या देशात कोण जातीयवादी नाही, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केलाय. प्रतिगामी पक्षांना मदत होऊ नये म्हणून पुरोगामी पक्षांसोबत आघाडी करण्याचे स्पष्ट संकेतही माने यांनी दिले आहेत. माझ्या पक्षाच्या नोंदणीचं काम सुरू असून ते पूर्ण झालं की पुढील राजकीय भुमिका स्पष्ट करू, असं माने यांनी सांगितलं. मतभेद दूर झाले आणि प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा बोलावलं तर वंचितमध्ये जाईल, असंही ते म्हणाले.
लक्ष्मण मानेंना शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर…
राज्यात युतीचं सरकार असतांना विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. त्यावेळी सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मला आणि ना.धो.महानोर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची खुली ऑफर सभागृहातच दिली होती, असं माने यांनी सांगितलं. मात्र, लालदिव्यापेक्षा मला माझा विचार मोठा वाटल्याचं त्याचवेळी मुख्यमंत्री जोशी यांना सांगितल्याची आठवणही माने यांनी यावेळी सांगितली. माझी हाड वर जातील ती शाहू-फुले-आंबेडकरांचा जयघोष करतच जातील, असं मुख्यमंत्री जोशींना त्यावेळीच सांगितल्याचं माने म्हणाले.
रामदास आठवलेंना काही विचार आहे का – लक्ष्मण माने
रामदास आठवले भाजप शिवसेना युतीसोबत गेलेत, ते किती आंबेडकरवादी आहेत, असा प्रश्न मानेंनी उपस्थित केलाय. काम आणि विचारांवरून आंबेडकरवादी आहे का नाही हे ठरतं, त्यामुळं रामदास आठवलेंना काही विचार आहे का, असा प्रतिप्रश्नच मानेंनी यावेळी केला.

https://youtu.be/v3m-aDEjKvM