Home मॅक्स रिपोर्ट …यामुळे आला पूर, SANDRP चा अहवाल

…यामुळे आला पूर, SANDRP चा अहवाल

– हिमांशू ठक्कर, परिणीता दांडेकर, SNDRP ([email protected])
(वरील आलेखात आडव्या अक्षावर तारखा, तर उभ्या अक्षावर राधानगरी, वारणा आणि कोयना धरणातल्या पाणीसाठ्याची टक्केवारी दिली आहें)
कृष्णेच्या खोऱ्यात महापुराने थैमान घातले आहे. २००५ सालच्या पुरापेक्षाही हा पूर भयानक आहे. राष्ट्रीय जल आयोगाने खोऱ्यातल्या वेगवेगळ्या उपनद्यांमध्येनोंद केलेल्या आधीच्या सर्वोच्च पूर पातळी रेषा आठ ठिकाणी कधीच ओलांडल्या आहेत. यातली चार ठिकाणं महाराष्ट्रात आहेत तर उरलेली चार कर्नाटकात आहेत.
(खाली दिलेल्या आलेखांमध्ये आडव्या अक्षावर तारखा तर उभ्या अक्षावर नदीची पातळी मीटरमध्ये दिली आहे. पिवळ्या रंगाची रेषा – इशारा पातळी, गडद पिवळ्या रंगाची रेषा – धोक्याची पातळी तर लाल रंगाची रेषा – सर्वोच्च पूर पातळी रेषा आहे. हे सर्व आलेख राष्ट्रीय जल आयोगाने प्रसिध्द केले आहेत.)
८ ऑगस्ट २०१९ , अर्जुनवाडी, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी
८ ऑगस्ट २०१९, तेरवाड, जिल्हा-कोल्हापूर, पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी
Support MaxMaharashtra

८ ऑगस्ट २०१९, समडोळी, जिल्हा-सांगली, वारणा नदीच्या पाण्याची पातळी
८ ऑगस्ट २०१९ , कुरुंदवाड, जिल्हा-कोल्हापूर , कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी

८ ऑगस्ट २०१९ , गोकाक धबधबा- कर्नाटक , घटप्रभा नदीच्या पाण्याची पातळी, इथे पाण्याची पातळी सर्वोच्च पूर पातळी रेषेच्या पाच मीटर आणि साडेपाच सेंटीमीटरने  वर आहे आणि ती अजून वाढत आहे.
८ ऑगस्ट २०१९ , सादलगा,जिल्हा- बेळगाव,कर्नाटक , दूधगंगा नदीच्या पाण्याची पातळी
८ ऑगस्ट २०१९ , शिमोगा,कर्नाटक , तुंग(तुंगा) नदीच्या पाण्याची पातळी
८ ऑगस्ट २०१९ , मुधोळ ,कर्नाटक , घटप्रभा नदीच्या पाण्याची पातळी( सध्या या ठिकाणी पूरमापनाचे काम केले जात नाही परंतू आलेख जल आयोगाचा आहे.)

गेल्या तीन दिवसांपासून (मूळ इंग्रजी लेख ८ ऑगस्टला प्रसिद्ध झाला आहे.) निसर्गाचा अनिर्बंध प्रकोप बरसतो आहे. एकतर असा तुफान पाऊस आणि इतक्या ठिकाणी पूर-रेषा ओलाडली जाणं असं सामान्यतः घडत नाही. दुसरं, पूर-रेषा ओलांडली गेली तरी पातळी गेल्यावेळेपेक्षा काही सेंटीमीटरच वर असते. पण या महापुरात सध्याची पाण्याची पातळी पूर-रेषेच्या पाच मीटर वर आहे. आणि तिसरं म्हणजे सामान्य परिस्थितीत पाण्याने पूर पातळी ओलांडली तरी काही तासातच पाणी ओसरतं. यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या पुरात मात्र पाण्याची पातळी काही ठिकाणी दोन-दोन दिवस वर राहिली आहे. यावरून पूर परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येतंय. अनेक ठिकाणी, अधिक काळ आणि मोठ्या प्रमाणात पूरस्थिती असली की नुकसानीचा आकडा वाढतो.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार कृष्णा खोऱ्याच्या वरच्या भागात म्हणजे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ८ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अनुक्रमे, २०६८.५ मी.मी. (७०% अधिक), ४८०.७ मी.मी (६०% अधिक) आणि १०२८.१ मी.मी (७८% अधिक) पावसची नोंद झाली. यामध्ये १ ते ८ ऑगस्ट या पहिल्या आठवड्यात ७१६.६ मी.मी, १७७.६मी.मी आणि ३६३.६ असा नेहमीपेक्षा ४००% जास्त पाऊस पडला.
ही आकडेवारी पाहता, पूर नियंत्रित करणं अशक्य होतं असं वाटलं तरी ते तसं नाही. एकतर हा सर्व पाऊस आठ दिवसांमध्ये विभागून पडला आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार याची पूर्वकल्पना हवामान खात्याने आधीच दिलेली होती. पण याच काळात या तिन्ही जिल्ह्यातल्या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला परिणामी ही पूरस्थिती ओढवली.
आता धरणाचे प्रशासन आणि कारभारी, धरणे भरल्यामुळे पाणी सोडणे क्रमप्राप्त होतं असं म्हणून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतील; पण खरं प्रश्न हा आहे की, पावसाळ्याच्या मध्यावर, आणि उरलेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा हवामान खात्याचा असूनही धरणं पूर्ण भरलेली का ठेवण्यात आली होती?
आता खालील आलेख पाहूया;
कोयना, राधानगरी आणि वारणा धरणातल्या पाण्याची टक्केवारी
                                             १५ जून ते ८ ऑगस्ट २०१९
(या आलेखात आडव्या अक्षावर तारखा, तर उभ्या अक्षावर राधानगरी, वारणा आणि कोयना धरणातल्या पाणीसाठ्याची टक्केवारी दिली आहें)

कोयना धरण हे कृष्णा खोऱ्यातले महाराष्ट्रातले सर्वात मोठे धरण, राष्ट्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार या धरणाची उंची ६५७.४३ मीटर आणिपाणी धारण करण्याची क्षमता २६५२एम.सी.एम. (९३.६१ टी.एम.सी.)आहे. महाराष्ट्राच्या जलसंसाधन खात्याच्या वेब साईट नुसार ६५९.४३ मीटर या एकूण उंचीपैकी ६५८.६५ मीटर पर्यत म्हणजे २७४२ एम.सी.एम. (९६.७९टी.एम.सी.) इतके म्हणजे धारण क्षमतेपेक्षा अधिक पाणी अगोदरच धरणात होते.
कृष्ण खोऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या इतर धरणांची स्थितीसुद्धा अशीच होती. ६ ऑगस्टला उजनी (८९.३%), खडकवासला (९५.७३%), धोम (८८.४३%), दूधगंगा (८९.३%) भरलेले होते. खाली दक्षिणेला कर्नाटकातही तीच कहाणी होती. घटप्रभा (९५%), मलप्रभा (९२%), अलमट्टी (७०%) भरलेले होते. सुदैवाने अलमट्टी धरणातले पाणी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत  ८५ टक्क्यांवरून ७० टक्क्यांवर आणले गेले होते. (१ ऑगस्टपर्यंत या धरणात ८५% साठा का करण्यात आला? हा प्रश्न अलाहिदा!)
याचा सरळसरळ अर्थ असा की जर अजून एक आठवडा भरपूर पाऊस पडला तर कृष्णा खोऱ्यात ऑगस्ट २००५ किंवा ऑक्टोबर २००९ मधल्या आंध्रप्रदेशसारखा भयानक पूर येणार हे निश्चित होते. यात भर म्हणून पूर नियंत्रित करण्यात बांधण्यात आलेल्या  मोठ्या  धरणांच्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर अधिक गंभीर होणार होता. यापूर्वीही अनेकदा असं घडलं आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केलेल्या विधानांवरूनही या धरणांनी पुराला लावलेला हातभार अधिक स्पष्ट होतो. कोयना धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे उत्तर कर्नाटकात पूर आला असे पत्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले. दुसरीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातला पूर आटोक्यात आणण्यासाठी अलमट्टी धरणातली पाण्याची पातळी कमी करण्याची विनंती फोनवरून केली.
खरंतर २००५ च्या पुरानंतर महाराष्ट्रात एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. पण त्या समितीचा अहवाल अजूनही राज्यशासनाने दडवला आहे. यातूनच पाण्याच्या नियोजनासंदर्भात शासनाचे धोरण किती पारदर्शक आहे हे स्पष्ट होतंय.
लक्षात घ्या, काही आठवड्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर दुष्काळाचं सावट होतं. काहींच्या मते हा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भयंकर होता, आणि आता राज्यासमोर शतकातल्या सर्वात मोठ्या महापुराचं संकट कसं काय उभं ठाकलं? आपण शिताफीने हा प्रश्न वातावरणात होणाऱ्या बदलांच्या खात्यावर टाकू शकतो, पण वातावरणात होणा-या बदलांचा मोठा परिणाम आपल्या पर्जन्यमानावर झाला आहे यात शंका नाही.
पाणलोट क्षेत्रात जागोजागी पाणी अडवण्याची, जिरवण्याची आणि साठवण्याची आपली क्षमता आकसत चालली आहे हे समजून घेतले पाहिजे आणि मान्यही केले पाहिजे. बेछुट आणि निर्बुद्ध विकास योजनांकडे याचं अपश्रेय जातं. पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी अडवण्याची, जिरवण्याची आणि साठवण्याची क्षमता वाढवून भूजल संवर्धन करण्याचे काम आता आपण केले पाहिजे. त्यासाठी मातीची आर्द्रता शोषून घेण्याची आणि साठवण्याची क्षमता वाढवावी लागेल. स्थानिक जलसंवर्धन रचनाप्रणाली, दलदली, जंगले आणि भूजल पुनर्भरण व्यवस्थांची जपणूक आणि संवर्धन केले पाहिजे. तरच वारंवार बसणारा दुष्काळाचा तडाखा आणि पाठोपाठ येणारे महापूर यांना लगाम घालणे शक्य होईल.
आजच्या घडीला, तातडीने येत्या काही आठवड्यात होऊ घातलेल्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून धरणात आजपर्यंत साठलेल्या पाण्याचा न्याय्य प्रमाणात विसर्ग करावा लागेल. धरणात पाणी साठवण्याचे नियम, धोरण आणि वेळापत्रक जनतेसाठी जाहीररित्या उपलब्ध असले पाहिजे. म्हणजे या व्यवस्थेत ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करणाऱ्यांवर ठपका ठेवता येईल.
भाषांतर – रविंद्र झेंडे, लेखक, अभ्यासक, पत्रकार.

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997