Home News Update डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का स्विकारला बौद्ध धर्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का स्विकारला बौद्ध धर्म

794
0
Courtesy : Social Media

भारत देशात पहिली क्रांतिकारक घटना होती अर्थातच लोकशाही राज्यव्यवस्थेचा स्वीकार. माझ्या मते दुसरी क्रांतिकारक घटना म्हणजे लाखो अनुयायींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द् धर्मात केलेले धर्मांतर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर हे धार्मिक परिवेशात नाही तर सामाजिक परिवेशात पाहावं लागेल.

याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर हे कुठल्या पारलौकिक अभिलाषेपोटी केलेले धर्मांतर नव्हते. तर ते सामाजिक न्यायासाठी होते. त्यामुळे एकूणच येथील समाज व्यवस्थेला उलथवून टाकणारी नव्या समाजिक समतेच्या निर्मितीची ती एक सामाजिक क्रांती होती.

आपण अगदी बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याची सुरुवात जरी पाहिली तर ती हिंदू धर्म सुधारक म्हणून झाली आहे. त्यांनी मुंबईत ज्या संस्थेत काम सुरू केले त्या संस्थेचे नाव होते. “समाज समता संघ” ज्यात हिंदू धर्मातील वेगवेगळ्या जाती समूहातील प्रगतीशील विचारांचे लोक होते.

महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे मूळ येथून रचले गेले आणि त्यात ब्राह्मण, भांडारी, कायस्थ, मुस्लिम अशा विविध समाजातील प्रगतीशील विचारांच्या लोकांचा सहभाग होता. या सत्याग्रहात महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला होता. महात्मा गांधी की जय ही घोषणा होती.

मात्र, पुढे-पुढे बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेच्या क्रांतीच्या लढ्यात खोलवर गेले, तसे तसे त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की पाणवठे मुक्ति, मंदिर मुक्ति किंवा ब्रिटिश सरकार च्या मदतीने काही कायदे, काही सवलती घेऊन या समाज व्यवस्थेत झपाट्याने काही बदल होणार नाही. या व्यवस्थे मध्ये अमुलाग्रह बदल घड़वायचा असेल तर या व्यवस्थेला जोरदार धक्का देणं गरजेचे आहे.

याला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घटना देखील बरीच कारणीभूत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी हा अनुभव अतिशय दाहक होता. खिंडीत गाठुन बाबासाहेब आंबेडकर यांनाच ठार मारण्याचा कट यावेळी सनातनी समाजाने रचला होता. मात्र, बाबासाहेब त्यातून थोडक्यात बचावले. त्यानंतर मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वेगळ्या मार्गाचा विचार करू लागले होते.

बाबासाहेब एकाच वेळी राजकीय, सामाजिक, सां स्कृतिक आणि धार्मिक पातळीवर विचार करत असत. त्यामुळे ते अशा पर्यायाच्या शोधात होते की, ज्यामुळे येथील बहुजन वर्गातील समाजाने धर्मातर केले तरी त्यांची सांस्कृतिक व सामाजिक नाळ टिकून राहील, धर्मांतर सहज आणि विनासायास होऊन देशात रुजेल. असे जर झाले नाहीतर येथील दलित वर्ग तुटून भिन्न होऊन देशात अराजक माजेल, ते बाबासाहेबांना नको होते.

त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ज्या वेळी जळगाव येथील दलित वर्गातील काही लोकांना त्यांचा सनातनी वर्गाकडून छळ होतो आहे अशी तक्रार केली. तेव्हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना ‘इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला न देता त्यांना सबुरीने घ्या’ आपण सर्व समूहाने धर्मातर करू एक एकट्याने करू नका. असा सल्ला दिला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही तरुणांना विविध धर्माचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या धर्मपीठात पाठवले होते. आणि स्वत: देखील अभ्यास करत होते. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माबद्दल शालेय जीवनातच माहिती झाली होती, त्यांचे शिक्षक अर्जुन केळुस्कर यांनी त्यांना भगवान बुद्धाचे चरित्र भेट दिले होते. उच्च शिक्षण घेत असताना कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या शोधनिबंधाचा त्यांचा विषय होता ‘एशियंट इंडीयन कॉमर्स’ या शोध निबंधात भारताचा समृद्धीचा काळ अभ्यासताना त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. त्यातील अनेक दाखले आपल्या या शोध निबंधात बाबासाहेबांनी दिले आहेत.

30 मे 1935 ला जात पात तोडक मंडळास लिहिलेल्या भाषणात, अस्पृश्यांनी बुद्ध वचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असं भाषणात म्हटल्याचा आपल्याला वाचायला मिळते.

1933 साली गोलमेज परिषद मध्ये त्यांचे आणि अल्पसंख्याक समाजाचे जवळचे संबंध आले. त्यावेळी धर्मातर विषयी मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपण इस्लाम नाही. तर बौद्ध धर्म स्वीकारूअसे म्हटले होते.

1934 साली त्यांनी मुंबई हिंदू कॉलनी येथे घर बांधले. त्याला राजगृह असे नाव दिले, बौद्ध सम्राट बिंदूसार यांच्या राजधानी चे नाव राजगृह असे होते. 2 मे 1950 रोजी दिल्लीतील बौद्ध विहारात पत्रकारांच्या सोबत बोलताना आपण बौद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबानी 13 ऑक्टोबर 1935 साली येवला येथे धर्मातरांची घोषणा आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी प्रत्यक्ष धर्मातर केले. यामध्ये सुमारे 20 वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि भविष्याच्या विचार करून अतिशय गांभीर्याने धर्मांतर केले होते.

शिवाय 2500 वर्षा पूर्वी तथागत भगवान बुद्धाने केलेल्या धम्मचक्र प्रवर्तना नंतर बुद्ध धम्मात आणि संघात अनेक चुकीच्या चालीरीती, सण-उत्सव शिरल्याने भगवान बुद्धांची योग्य आणि कल्याणकारी शिकवण शोधणे अत्यंत कठीण काम होते. कारण महायान पंथ आणि त्याच्या विविध शाखांनी बौद्ध धर्माला पार दैववादी करून टाकले होते.

त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातर केलेल्या नवसमाजाला बौद्ध धर्माची प्राथमिक तोंड ओळख व्हावी म्हणून प्रथम 22 प्रतिज्ञा आणि त्यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक लिहिले. बाबासाहेब आपला बौद्ध धर्म ‘हिनायान आणि महायान’ यांच्या पेक्षा भिन्न असून हा नवायान असल्याचे म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्वक जाणले होते की, कुठलाही धर्म ऱ्हास होण्यामागे त्यांच्या शिकवणीतील दोष, कालानुरूप बदल करण्यास मनाई आणि धर्मगुरू असे हे तीन महत्त्वाचे घटक असतात.भगवान बुद्धांनी आपल्या धर्मालाच आपला उत्तराधिकारी नेमून धर्मगुरू या पदाला फाटा दिला होता. उपासक, भिक्खू, भदंत, स्थवीर, महस्थावीर, बोधिसत्व यासर्व बुद्ध होण्याकडे जाण्याच्या अवस्था आहेत.

बौद्ध धर्माची शिकवण हा सर्वांचा धर्मगुरू आणि मार्गदाता आहे. मात्र, बौद्ध भिख्खूनी चुकीच्या पद्धतीने धर्मगुरू पद आपल्याकडे घेतले आणि बौद्ध धर्मात अनेक वाईट रीतिरिवाज शिरले, त्यामुळे 2000 वर्ष बौद्ध धम्माच्या वर्चस्वाखाली असलेल्या भारतातून लयाला गेला किंवा विकृत झाला.

हे बाबासाहेबांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी भिख्खू संघाला फाटा देण्यासाठी उपासकाला धार्मिक सोपस्कार करण्याचे अधिकार दिले. त्यामुळे भन्ते चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा घेतल्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड समुदायाला दीक्षा दिली. इतकेच नव्हेतर तुम्ही गावोगावी जाऊन धम्म दीक्षेचे कार्यक्रम घेऊन एकमेकांना दीक्षा द्या असे देखील सांगितले.

बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा सामाजिक क्रांतीचा वसा जपणे गरजेचं आहे. आता पुन्हा भिख्खू संघाचे स्तोम माजवून फुकट आईतखाऊ वर्ग निर्माण करणे बंद केले पाहिजे. बुद्धधम्माची विहारे ही अभ्यास आणि विचार क्रांतीची केंद्र झाली पाहिजे, जिथे कला, विज्ञान, साहित्य आणि धर्म यांचा विकास आणि सृजन हे अखंड मानवाच्या कल्याणासाठी कसा करता येईल, याचे मंथन झाले पाहिजे. गंडे-दोरे, तावीज आणि बाह्यप्रचारात अडकून न रहाता कृतीत धम्म आणला पाहिजे.

बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी भाषण करताना म्हणाले…

‘तुमच्यावर आता फार मोठी जबाबदारी आहे, तुमचे इतर धर्मियांच्या सोबतचे वर्तन हे प्रेम आणि करुणेने भरलेले असले पाहिजे’, मात्र सध्या उलटेच दिसते, धर्म आचरण राहाते दूर, इतर धर्मातील रूढी-परंपरा, सण-उत्सव यांवर टीका आणि खिल्ली उडविण्यात बहुत सारी बुद्धी खर्च होताना दिसते.

वास्तविक कुणातही बदल घडवून आणायचा असेल तर तो मैत्री, बंधुता, करुणा आणि विवेकाच्या मार्गाने घडवून आणता येतो, टीका आणि खिल्ली उडविल्याने बदल होणे दूरच, उलट व्यक्ती पर्यायाने तो समाजच आपल्यापासून दुरावतो. आपल्या अश्या चुकीच्या वर्तनाचे दूरगामी परिणाम होतात आणि बौद्ध धर्माकडे पाहण्याचा इतर धर्मियांचा दृष्टिकोन पूर्वी चुकीचा असेल तर तो अधिक दूषित होतो. याचे काही गंभीर परिणाम समोर आले.

लग्नाच्या जाहिरातीत मुस्लिम आणि जयभीम(बुद्धिष्ट) नको अशा जाहिराती आणि सूचना येऊ लागल्या. अश्या सूचना या आपण बौद्ध धर्माच्या विपरीत आचरणात आहोत. याचेच संकेत आहेत, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

बोद्ध धर्म हा विचारात्मक किंवा पोथीनिष्ठ धर्म नसून तो आचारात्मक धर्म आहे. तुम्ही किती धम्म परिषद, किती पुस्तक, किती दान, किती व्याख्याने दिली, किती धम्म शिबिरे केली किंवा किती पूजा-आर्चा घरात किंवा बाहेर घडवून आणता याला शून्य महत्व आहे. जर, तुमचे आचरण प्रज्ञा, शील आणि करुणेच्या चौकटीत नसेल.

हा बुद्धीचा, विवेकाचा आणि प्रेमाचा सकारात्मक मार्ग आहे. ज्याला हे मर्म समजले. तो बौद्ध धर्माच्या भाषेत स्त्रोतापन्न झाला असे मानण्यात येते .
आपले देखील या बौद्ध विचाराने मंगल हो, हीच कामना या कल्याण होवो, मंगल होवो !

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997