कशासाठी चालतो जीडीपी मध्ये फेरफार ?

कशासाठी चालतो जीडीपी मध्ये फेरफार ?

काय आहे भारताचा खरा जीडीपी…
भारताच्या माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी जीडीपी च्या म्हणजेच दरडोई उत्पन्नाच्या आकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचं सांगून मोठी खळबळ उडवून दिली आहे. अरविंद सुब्रमण्यम यांच्या म्हणण्यानुसार 2011-12 तसंच 16-17 मध्ये भारताने आपल्या जीडीपीचे आकडे वाढवून सांगीतले आहेत.
सरकारी आकड्यांप्रमाणे जीडीपी चा दर 7 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी हा दर वास्तविकता 4.5 टक्क्यांच्या आसपासच असल्याचं सांगीतलंय. हार्वर्ड विद्यापिठाद्वारे प्रकाशित एका प्रबंधात सुब्रमण्यम यांनी हा दावा केला आहे.
सुब्रमण्यम यांच्या माहितीनुसार 2011 च्या आधी ज्याप्रमाणे उत्पादन क्षेत्राच्या योगदानाचं मूल्य जोडलं जायचं त्याचे सर्व निकष बदलले गेले. त्यांनी भारतातल्या 17 विविध क्षेत्रांचा आधार घेत दरडजोई उत्पन्नाच्या आकडेवारीतली हेराफेरी पकडलीय. सध्या भारतात ज्या नव्या प्रणालीच्या आधारे जीडीपी मोजला जातो त्यात 21 क्षेत्रांचा आधार घेतला जातो. या नव्या प्रणालीवर सध्या आक्षेप घेतला जातोय.
वीजेचा वापर, दुचाकी वाहनांची विक्री, हवाई प्रवासाच्या तिकिटांचा दर, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीचा दर, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, नित्योपयोगी वस्तूंचा निर्देशांक, पेट्रोलियम पदार्थ, सीमेंट, स्टील आणि इतर सेवा आणि वस्तूंचा आयात-निर्यात याच्या आधारावर दरडोई उत्पन्न मोजलं जातं. या सर्व क्षेत्रांमध्ये 2002 ते 2017 मध्ये झालेल्या बदलांच्या आधारावर सुब्रमण्यम यांनी आपला अभ्यास केला आहे. ज्या आधारावर जगभर जीडीपी मोजला जातो त्या आधारावर संबंधित क्षेत्राचे आकडे सर्वांसाठी खुले केले गेले पाहिजेत असं मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलं आहे.