सीमेवरील जवानांच्या पूरग्रस्त घरांना सावरणार कोण?

सीमेवरील जवानांच्या पूरग्रस्त घरांना सावरणार कोण?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त आपल्या घराची अवस्था पाहून बिथरले आहेत. ही कुटुंब मिळेल त्या मदतीनीशी पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या दुःखाच्या क्षणी संपूर्ण भारत देशाच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या महाराष्ट्रातील भारतीय जवानांच्या घरांना सावरायला मदत कोण करणार?
सांगली जिल्ह्यातील आमनापूर गावामध्ये जयश्री जग्गनाथ शेजाळे यांचे पती जम्मू-काश्मीर मधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी घरातील कर्त्या पुरुषाच्या आधाराची गरज असताना जगन्नाथ शेजाळे यांना घराची काय स्थिती आहे याचीदेखील माहिती नसावी. दहा दिवसांपूर्वी त्यांचे आपल्या पत्नीसोबत बोलणे झाले होते. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही.
जग्गनाथ शेजाळे यांच्या सारखे कित्येक जवान आपल्या घरावरील पुराच्या संकटापासून अनभिज्ञ असतील किंवा ज्यांना याची माहिती मिळाली त्यांची कुटुंबाच्या काळजीने जीवाची घालमेल होत असेल. उद्या संपूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. भाजपासाठी तर यंदाचा ‘स्वातंत्र्य दिन’ खूपच औत्सुक्याचा ठरणार आहे कारण यावर्षी भारताचे गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्यानंतर ध्वजारोहणासाठी श्रीनगरमधील लाल चौक येथे जाणार असल्यामुळे जम्मू-काश्मीर मधील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.