Home मॅक्स ब्लॉग्ज त्यांना नाही झेपणार ‘हा’ माणूस !

त्यांना नाही झेपणार ‘हा’ माणूस !

483

पवार आणि फडणवीसांची शाब्दिक खडाखडी सुरू आहे. कोण पैलवान, कोण नाच्या, कोण नटरंग वगैरे वगैरे. काहींना जे काही सुरू आहे त्याचं वाईट वाटतंय. काही आनंद घेतायत वगैरे वगैरे. पण यामुळे एक घटना आठवली. साधारण २००९ किंवा १० ची.

हरिश्चंद्र बिराजदार नावाचे एक मोठे गाजलेले मल्ल होते. हिंदकेसरी. ही घटना घडली तेव्हा त्यांचं बरंच वय झालं होतं. मी तेव्हा आयबीएन लोकमतला मुंबईचा प्रतिनिधी होतो. पुण्याला आमची सहकारी होती प्राची प्रतिभा शिरीष. बिराजदार यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. आणि त्यांना तेव्हा बरं वाटत नव्हतं. महाराष्ट्राचं नाव जगात मोठं केलेला हा महान कुस्तीपटू तेव्हा आजारी होता आणि उपचारांना जो खर्च येत होता तोही करण्याइतके पैसे बिराजदार यांच्याकडे नव्हते. प्राचीला जेव्हा हे समजलं तेव्हा तिने याची बातमी केली. हेतू हाच होता की बिराजदार साहेबांना मदत मिळावी आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत.

ज्यादिवशी ही बातमी दाखवली गेली त्यादिवशी माझी सुट्टी होती. संध्याकाळी प्राचीचा फोन आला. मला म्हणाली त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची आहे, मदत मिळाली पाहीजे रे. मनात म्हटलं आपण करून करून ती कितीशी मदत करणार ना? प्राची ला म्हटलं थांब मी काही लोकांना मेसेज टाकतो.

तोपर्यंत आठवलं होतं की शरद पवार कुस्ती संघटनेचे पदाधिकारी पण आहेत. म्हणून इतर अनेकांना टाकला तसा बिराजदार यांना मदत करावी असा एक मेसेज पवारांना पण टाकला. ही साधारण संध्याकाळी सात सव्वा सातची वेळ असेल.

पंधरा मिनिटांनी पवारांचा फोन आला. “तुम्हांला कसं ठाऊक बिराजदार यांना बरं नाहीये ते?” पहिला प्रश्न. मी म्हटलं आम्ही बातमी दाखवतोय. माझी पुण्याची सहकारी आहे तिने ही बातमी केलीय. लगेच दुसरा प्रश्न. “तुम्ही त्यांच्या घरातल्या कुणाला ओळखता का?” मी म्हटलं नाही. प्राची ओळखते. तुमचं तिचं बोलणं करून देतो. तर म्हणाले “नको, तुम्ही त्यांना (प्राचीला) सांगा की बिराजदार यांच्या घरातल्या कुणाचं तरी माझ्याशी बोलणं करून देता आलं तर बघा.” मी म्हटलं ओके. परत लगेच, “आणि त्यांना सांगा की रुबी हॉस्पिटलला – पुण्यात एक रुबी नावाचं हॉस्पिटल आहे (ही माहिती माझ्यासाठी) – मी म्हटलं हो मला ठाऊक आहे – हा मग त्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना लगेच घेऊन जा. तिथे मी बोललो आहे. उपचारांचा खर्च काय होईल त्याची चिंता करू नका. ते मी बघेन.” म्हटलं ओके. लगेच सांगतो.

प्राची ला निरोप दिला. मला वाटतं प्राची बिराजदार यांच्या कुटुंबियांशी बोलली असणार. थोड्या वेळाने परत पवारांचा फोन, “माझं बोलणं झालंय (बहुदा कुटूंबियांशी किंवा बिराजदार यांच्या स्नेह्यांशी) त्यांच्यावर चांगले उपचार होतील. तुम्ही काळजी करू नका. आणि ही माहिती सांगितली म्हणून तुमचे आभार.” आता माझे आभार कशाला? पण असो. मी म्हटलं साहेब ही बातमी आम्ही दाखवतोय. तेव्हा तुम्ही मदत केली हे पण जाहीर करू का? तर वर प्रश्न “कशाला उगाच?” .मी म्हटलं नाही बातमी करायला पाहिजे त्यामुळे त्यांच्या हितचिंतकांना जी चिंता लागलेली असते ती कमी होईल. त्यावर म्हणाले, “तुम्हांला योग्य वाटेल ते करा.” संपलं बोलणं. फोन कट.

इतकी वर्षं झाली. मध्ये आम्ही किती वेळा भेटलो असू याची गणती नाही. कधी एका अक्षराने आपण अशी मदत केलेली, तुमचा फोन आलेला वगैरे पवार बोलले नाहीत. त्यांना आठवत तरी असेल का हा प्रश्नच आहे. मी अनेक लोकं बघितली आहेत. ह्या अश्या गोष्टींसाठीही केलेली मदत बोलून दाखवतात. पण पवारांनी आजवर अवाक्षर काढलं नाही.

आज हे लिहिण्यापूर्वी प्राचीला फोन केला. तिला विचारलं पवार कधी याबद्दल तुझ्याकडे बोलले का ग? तर तिही म्हणे नाही. कधीच नाही.

पवारांना नावं ठेवणं आणि आयुष्याच्या या टप्प्यावर असा संघर्ष करावा लागत असताना त्यांच्या पाच टक्के पण ज्यांचं कर्तृत्व नाही त्यांनी त्यांच्याबद्दल पोरकट विधानं करणं ठीक आहे. असाही एक काळ म्हणत दुर्लक्ष करावं अश्यांकडे. पण, केवळ एका मेसेजवर स्वतःहून आत्मीयतेने अशी हालचाल करणारा आणि ह्या कानाचं त्या कानाला कळणार नाही अश्या रीतीने मदत करणारा हक्काचा माणूस पण शरद पवार आहे हे या राज्याला ठाऊक आहे.

ज्यांना उभ्या आयुष्यात जाहिरातबाजीपलीकडे कधीही काहीही जमलं नाही त्यांना नाही झेपणार हा माणूस !

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997