Home News Update फडणवीसांनी समर्थन केलेला मुन्ना यादव आहे तरी कोण?

फडणवीसांनी समर्थन केलेला मुन्ना यादव आहे तरी कोण?

Courtesy: Social Media
Support MaxMaharashtra

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करीम लाला व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीचा गौप्सस्फोट केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते वक्तव्य मागे घेतले. मात्र राजकारणी व गुंडाच्या संबंधांवर चर्चेला ऊत आला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोप केला की फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी अनेक गुंडांना वर्षावर पोसले होते. त्याला फडणवीस यांनी लगेच उत्तर देत मुन्ना यादव (Munna Yadav) हा तीन वेळ नगरसेवक म्हणून निवडून आलाय, असं उत्तर देत या भेटीचं समर्थनही केलंय. पण यामागचं वास्तव नेमकं काय आहे ते पाहूया….

संबंधित बातम्या…

देवेंद्र फडणवीस यांचे नाव जेव्हा जेव्हा एखाद्या गुंडाशी जोडले जाईल तेव्हा तेव्हा नागपूरचा गुंड मुन्ना यादव याचे नाव आघाडीवर असेल. मुन्ना यादव हा गुंड नाही हे फडणवीस गृहमंत्री म्हणून विधिमंडळाच्या सभागृहात ठासून सांगत असले तर मुन्ना यादव किती मोठा गुंड आहे हे आख्या नागपूरकरांना माहित आहे. दहशत निर्माण करण्यासाठी धमकावणे, जमीन बळकावणे, खंडणी मागणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, पोलीस ठाण्यात राडा घालणे, अपहरण करणे, असे मुन्ना यादवचे अनेक कारनामे नागपूरकरांना माहित आहेत.

२१ ऑक्टोबर २०१७ रोजी भाऊबीजच्या दिवशी मंजू यादव या मंगल यादव याच्याकडे आलेल्या होत्या. त्यावेळी मुन्ना यादवची मुले करण व अर्जुन हे परिसरात फटाके उडवत होते. त्यावेळी वाद झाला आणि करण व अर्जुन यांनी मंजू यादव यांना हाणामारी केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील भांडण विकोपाला गेले व मुन्ना यादव, बाला यादव यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने हल्ला केला. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजकीय दबावातून मंगल यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धही पोलिसांनी मारहाणीचा गुन्ह्याला खुनाच्या प्रयत्नाचा रंग दिल्याचा आरोप आहे.

मुन्ना यादव याच्यावर असणाऱ्या गंभीर गुन्ह्यांवर नजर टाकूया. २००९ मध्ये यादव यांच्यावर दंगल, शिवीगाळ व मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. २०१३ मध्ये शिवीगाळ करणे, धमकावणे व मारहाण करण्याचे, याशिवाय ऑक्टोबर २०१४ मध्ये मुन्ना यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी जुन्या वैमनस्यातून केलेल्या हल्‍ल्यात सुनील यादव, संजू मडावी, राजन सोनवणे व वेणूबाई देवगीकर जखमी झाले होते. धंतोली पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. २०१७ मध्ये राहुल बुधबावरे या युवकाचे अपहरण व मारहाण प्रकरणातही यादव यांचे नाव पुढे आले होते. या प्रकरणात धंतोली ठाण्यातच यादव यांची पत्नी, मुलगा व भाऊ व अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मुन्ना यादव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात तब्बल दहा प्रकरणे दाखल असल्याचेही नागपूर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यात मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात भादंविच्या कलम ४५२, ३२६, ३२३, ३२४, ३२५, १४१, १४३, १४७, १४८, १४९ आणि शस्त्रप्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती देण्यात आलीये. तरीही देवेंद्र फडणवीस सभागृहात व सभागृहाच्या बाहेर मुन्ना यादवचा कसा बचाव करायचे हे अख्या महाराष्ट्राने बघितले आहे, म्हणून कदाचित बाळासाहेब थोरातांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला असेल.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997