वारक-यांचे टाळ कधी पेटतील…?

वारक-यांचे टाळ कधी पेटतील…?

338
0

(तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भावकीच्या वादातून वेगवेगळा झाला, मानवी प्रवृत्तीतून असं घडण साहजिक होतं, संतांचे विचार अंगिकारायला आपणच कमी पडलो, मात्र पालखी सोहळे वेगळे झाले तरी दोन्ही सोहळ्यांची भव्यता वाढतेच आहे – प्रा. सदानंद मोरे)

प्रा. मोरे ह्यांनी सांगितलेल्या ह्या विषयावर मागचे शे-दोनशे वर्ष कुणी बोललं नाही. दोन्ही पालखी सोहळ्या सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांना तर ह्या वादाबाबत काहीच वाटत नाही, पण मी मात्र या पुढे हा सांप्रदाय “भेदाभेद भ्रम अ-मंगळ” ह्या तत्वाचं पालन करतो, असं म्हणणार नाही.मुळात आत्ता हा विषय काढायची गरजच काय, असं तुम्हाला वाटेल मात्र केवळ हाच विषय नाहीय, तर वारी प्रवासात होणाऱ्या अनेक आत्यंतिक कुचंबनेलाही वारकरी वर्षानुवर्षे पाठीशी घालतायत, त्याकडे दुर्लक्ष करतायत ते असं का वागतायत हे कळत नाही म्हणून मी व्यक्त होतोय.

मागील काही वर्षांपासून वारी सोहळ्याचं वार्तांकन करतांना खूप काही शिकायला मिळालं, जगाच्या पाठीवर असा सोहळा होणे नाही, मात्र आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारक-यांना नरकयातना देणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि वारीकडे केवळ आर्थिक लाभाचं साधन म्हणून बघणारे अनेकजण ह्या सोहळयाच पावित्र्य घालवतायत. मुळात वारी प्रवास ज्या ठिकाणाहून सुरवात होते त्या देहू -आळंदी मधून वाहणा-या इंद्रायणीत मानवी मलमूत्र सोडल्या जात असल्याने ती पुर्णतः प्रदूषित झाली आहे, त्याच पाण्याने स्नान-आचमन करून वारकरी वारी प्रवासाला निघतात हे अत्यंत किळसवाणा प्रकार आहे, मात्र केवळ प्रथा आहे म्हणून हे करावं लागतं आणि इंद्रायणीच गटार जरी झाली तरी आम्ही हे करणारच असं वारकरी सांगतात त्यामुळे इंद्रायणी प्रदूषणाकडे प्रशासन लक्ष देत नाही परिणामी वारक-यांचा वारी प्रवास त्रर्थ पिऊन नाही तर मलमूत्र पिऊन सुरू होतो. 

पुढे हे वारी सोहळे मार्गस्थ होतात तेव्हा विसावा, विश्रांती आणि मुक्कामाच्या प्रत्येक टप्प्यावर, वारकऱ्यांसाठी अन्नदान करणारे शेकडो लोकं उभे असतात हाही प्रक्रार चीड आणणाराच आहे, कारण वारकऱ्यांना दिल्या जाणारे खाद्य पदार्थ किंवा पुरविल्या जाणारे पाणी खाण्या पिण्या योग्य आहे का ह्याची कधीही तपासणी केली जात नाही, अन्न व औषध प्रशासन विभागाला तर ह्या वारी सोहळ्या बाबत काही माहीत आहे का नाही ह्याची शंकाच वाटते, मुक्कामस्थळी जेव्हा पालखी विसावते तेव्हा तिथेही जत्रेच स्वरूप असत, अशा वेळी तिथे विकले जाणारे खाद्यपदार्थ, मावा पेढा बर्फी हे सगळं भेसळ युक्त असतं, श्रद्धेपोटी किंवा प्रसाद म्हणून अनेक भाविक हे विष विकत घेतात..

खरतर दोन्ही पालखी सोहळ्यांची वाट ही निसर्गाच्या सानिध्यातून असल्याने पायी चालणा-ऱ्या प्रत्येकाला मोकळा श्वास घेता येत असेल असा आपला समज असतो, मात्र लाखो वारक-यां सोबत हजारो वाहनंही सोडली जातात त्या वाहनातून निघणारा धुरांमुळे वारक-यांचा श्वास अक्षरशः कोंडतो, 11 वर्षांपासून पायी वारी करणाऱ्या अभय मांढरे ह्यांनी ह्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले तेव्हा ही बाब लक्षात आली, मांढरे म्हणाले हे टाळता येऊ शकते त्यासाठी पालखी मुक्कामस्थळी आधी वाहनं पाठवली जायला हवीत आणि ठरवलं तर ते होऊ शकते मात्र प्रशासनाला ते करायचं नाही, किमान वाहनांचे वेगळे रस्ते आणि वारक-यांचे वेगळे रस्ते असं तरी करायला हवं पण त्याचही नियोजन करता येत नाही एव्हढं नतद्रष्ट प्रशासन आहे..

वारीचा दुरुपयोग करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणाऱ्या चोरांची संख्याही वाढतीय. एक वेळ टाळ हे विकण्याची वस्तू आहे हे मान्य करता येईल मात्र कपाळावर लावल्या जाणाऱ्या टिळाही विकला जावा या सारख दुर्दैव काय, मात्र गोपीचंदन टिळा लावून त्या बदल्यात 2-5 रुपये मागणारे पावलो पावली बघायला मिळतायत ह्या शिवाय पालखी सोहळ्याच दर्शन घेण्यासाठी येणारे इतर हजारो नागरिक ज्या खासगी वाहनाने येतात ते किंवा सोहळ्या ठिकाणी हॉटेल मध्ये मुक्काम करणाऱ्या अनेकांना तर दिवसा ढवळ्या लुटलं जातील, एव्हढे पैसे त्यांना भाडं म्हणून आकरलं जातं याकडेही प्रशासनाच् लक्ष नाही..

नाही म्हणायला यंदा सरकारने वारकऱ्यांना रेनकोट उपलब्ध करून दिले मात्र आता वारी अंतिम टप्यावर पोचलीय तरीही ते रेनकोट सर्व वारकऱ्या पर्यन्त पोचले नाहीत, ज्यांना मिळाले त्यांचे रेनकोट पहिल्याच पावसात फाटले, खराब झाले, शासना कडून दुसरी सुविधा पुरवली जाते ती शौचालयांची हे शौचालय जर मोजले तर कागदावर दुप्पट असतात आणि प्रत्यक्षात तिथं ती शौचालय दररोज बघायला मिळतात, धक्कादायक म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच शौचालय वापरल्या जात असल्याने ती भरून जातात आणि तो वासही वारकऱ्यांना सहन करावा लागतो ह्या शिवाय ज्या टँकर ने पिण्याचं पाणी पुरवलं जात त्यांची अवस्था बघितिली तर प्रशासन वारी सोहळ्याला किती दुय्यम स्थान देते हे लक्षात येईल, त्यात या प्रवासात जर पाऊस असेल तर कुठेही बसता येत नाही, सतत चालत राहाव लागतं आणि ज्या ठिकाणी मुक्काम असतो तिथे साचलेल्या चिखलातच झोपण्याशिवाय पर्याय नसतो, कल्पना करा काय अवस्था होत असेल सर्वांची, महिलांना प्रातविधीला जाताना आणि आंघोळ करतांना अनेकदा उघड्यावरच बसावं लागतं, इंद्रायणी, निरा, भीमास्नाना वेळी तर कपडे बद्दलण्यासाठीची सोय नसते, वारी सोबत चालणाऱ्या प्रत्येक दिंडीत एक हांडेकरी महिला आजही असते, ती सगळ्यांना पाणी पाजण्याच काम करते, तरीही सगळ्या माऊली गप्प का?

-वारी जेव्हा मुक्कामस्थळी पोचते तेव्हा तिथे समाज आरती होते, समाज आरती दरम्यान चोपदारांनी दंड उचलून “होकक्कक्क” असा आवाज दिला की सगळीकडे शांतता पसरते ,अगदी टाचपिन पडली तरी आवाज येईल एव्हडी शांतता लाख दोन लाख लोकं असले तरी कुणी काहीही बोलायचं नाही असा दंडक आहे, मात्र जर कुण्या दिंडीक-यांची तक्रार असेल तर त्या दिंडीतील टाळकरी टाळ वाजवत राहतात आणि ती शांतात भंग पावते.
वारी प्रवासात होणारी अडचण, असलेली तक्रार सर्व समाजा समोर सांगता यावी त्यासाठी म्हणून तशी व्यवस्था केल्या गेली मात्र वरील सर्व अडचणी असताना सुद्धा त्यासांगण्यासाठी कधीही वारकऱ्यांचे टाळ वाजले नाही, शासकीय यंत्रणांनाचे कान फुटे पर्यन्त ते वाजत राहायला हवेयत….

-गोविंद वाकडे