Home मॅक्स ब्लॉग्ज When They See Us : तुम्ही देखील ‘या’ गुन्ह्यात सहभागी आहात का?

When They See Us : तुम्ही देखील ‘या’ गुन्ह्यात सहभागी आहात का?

392
0
When They See Us
Courtesy : Netflix
गेल्यावर्षीच फेसबुक इंडियाने एक कारनामा केला होता. ऑनलाईन हरासमेंट कशी रोखावी ह्या विषयावर एक शॉट व्हीडीओ कम जाहिरात पब्लिश केली होती. त्यात जाणीवपुर्वक प्रोफाईलचं नाव ‘कांबळे’ दाखण्यात आलं. अर्थात त्यावर आपण सगळ्यांनी मिळून फेसबुकशी संपर्क साधून ती जाहिरात मागे घ्यायला लावली. तो भाग वेगळा. पण भारतीय परीक्षेपात काही विशिष्ट जातसमूहांना क्रिमीनलायज करणं काय नवीन नाही. गावात चोरी झाली तर पोलीस थेट काही वस्त्यां मधली लोक उचलून त्यांच्यावर खटले दाखल करणं. हे पण चालत आपल्याकडं, किंवा नुसत्या संशयावरून दलित, मुस्लीम आदिवासी तरुण इथल्या जेलमध्ये सडतात. हे वास्तव आहे इथलं. सिस्टम पासून ते स्वयंघोषित स्त्रीवाद्यापर्यंत ‘त्यांची पोर असतातचं तशी’ हा नॅरेटीव्ह खोलवर रुजलाय आपल्या देशात.
आजूबाजूला पाहून वाटतं ‘साला लोक किती प्रिव्हिलेज मध्ये जगतात नाही?’ आपलं घर, आपलं आडनाव, आपण राहतो तो विशिष्ट एरिया किंवा एकूणच आपली सामाजीक आयडेंटीटी किती काही सोप्पं करून ठेवते? आपल्यातील बऱ्याच जणांना याची जाणीव नसते.
भीमा कोरेगावच्या नंतरचं कोम्बिंग ऑपरेशन फार जवळून मी पाहिलं आहे. त्या आधी पण वस्तीवरील हल्ले, दंगली, जातीय द्वेषातून केलेली मारहाण किंवा तुम्ही पेपर मध्ये सुस्पष्ट वाचता ते ‘दोन गटात दगडफेक’ हे पण अनुभवलं.
हे सगळ मांडायचं कारण म्हणजे मागेच नेटफ्लिक्सवर एक सिरीज पहिली. ‘व्हेन दे सी असं’ नावाची. सत्य घटनेवर आधारीत ह्या मिनी सिरीजने अमेरिकेत व्हिवरशीपचा उच्चांक गाठलेला होता. ही सिरीज बनवलीय ती एव्हा डुव्हर्ने ह्या ब्लॅक महिला फिल्ममेकरने.
आजच्या काळात, जेंव्हा अमेरिकेत व्हाईट सुप्रमसीला उघडपणे पाठीशी घालणारं ट्रम्प सरकार असताना ही सिरीज येणं. हे एक फार मोठं स्टेटमेंट होतं. घटना आहे न्यूयॉर्क च्या सेन्ट्रल पार्क मधली. एका ‘व्हाईट मुलीवर’ बलात्कार होतो. इथं तिची रेस महत्त्वाची आहे. त्याच सुमारास पार्कच्या दुसऱ्याबाजूला शेजारच्या ब्लॅक वस्तीतली काही टीनएज पोर दंगामस्ती करत खेळत असतात. एन.वाय.पी.डी ह्यातल्या चारपाच पोरांना अटक करून त्यांच्यावर सरळ सरळ खटले भरते.
ही सगळी पोरं अवघी चौदा-पंधरा वयोगटातली असतात. ह्यातले चौघे ब्लॅक तर एक जण ब्राउन म्हणजे मेक्सिकन वंशाचा असतो. पोलीस, वकील ह्या पोरांना कुत्र्यासारखं मारून ह्यांच्या कडून कबुलीजवाब लिहून घेतात. सगळ्यांना माहिती असतं की ह्या चिमुकल्या मुलांनी काही केलं नाहीय, पण नेणिवेतला सुप्त वर्णद्वेष ‘औकात दाखवायची’ ह्यावर येऊन पोहोचतो. ह्या पोरांचे आईवडील रोजमजुरी करणारी. तरीही ब्लॅक कम्युनिटीतले वकील मदतीला येऊन केस लढवायला मदत करतात.
डॉनाल्ड ट्रम्प तेंव्हाही आपल्या वर्णद्वेषा साठी प्रसिद्ध होते. त्यांनी काही मिलियन डॉलर्स खर्चून पेपर ला जाहीरात दिली की, ‘एका व्हाईट मुलीवर बलात्कार करणाऱ्या ह्या चौघांना तात्काळ फाशी व्हावी’. ह्या घटनेनं अमेरिकेतलं समाज जीवन ढवळून निघालं होतं. ही पोरं फक्त एका विशिष्ट वर्णाची असल्या कारणाने त्यांना काय काय भोगावं लागतं हे पाहून जीव तुटतो.
ह्यात डॉनाल्ड ट्रम्पचं फुटेज दाखवून एव्हाने तिथल्या समाजावर चपराक मारलीय. की, अमेरीकन लोकांनो तुम्ही त्यावेळी जेंव्हा ह्या पाच पोरांवर वर्णद्वेषातून अन्याय होत होता. तेंव्हा जर तुम्ही स्टँड घेतला असता तर आज डॉनाल्ड ट्रम्प आज व्हाईट हाऊस मध्ये बसले नसते.
रोजच्या जगण्यात तुम्ही वर्णद्वेष नॉर्मलाईज केलाय. त्यामुळंच आज डॉनाल्ड ट्र्म्प सारखे व्यक्ती राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. अर्थात पुढं काय? झालं वैगरे साठी ही सिरीज आवर्जून पाहा.
सिरीज संपवून, मी विचारात पडलो. साला हे तर सेम आहे म्हणलं. अशा शेकडो घटना आपल्या माहिती आहेत. आपण राहतो. त्या वस्तीतच सिस्टमच्या ऑपरेशनची कित्येक उदाहरणं, जातीयवाद आपण डोळ्यानी पहिलायं. नामांतर, रमाबाईनगर, खैरलांजी, जवखेडा, खर्डा या सारख्या शेकडो ठिकाणी सामाजिक न्यायाची नग्न धिंड पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलीयं. दोन्ही ठिकाणी काही वेगळं नव्हतं.
पण इथं एक मेख आहे. बेगडी पुरोगामीत्वाची. बाकीचं सामान्य जनमानसं सोडा हो, इथं फेसबुकवर स्वतःचं पुरोगामीत्वं सिद्ध करणारे अनेक लोकं जेंव्हा आरक्षण आणि अट्रोसिटी ऍक्टचा विषय येतो. तेंव्हा ‘पण, किंतु, परंतु’ चा जाप करत कमालीचे प्रतिगामी बनतात. न कळतपणे स्व:जातीचा अहंम बाळगत तुच्छतावादी बनत जातात. मोठं मोठ्या पुरोगामी विचारवंतांच्या, सेलिब्रिटींच्या जुन्या पोस्ट्स, कमेंट्स पाहून वाईट वाटतं. ह्यांचा राग येतो, त्या कंटेंटला लाईक करणारे पण माझ्यासाठी विरोधक आहेत.
या शोषणकारी व्यवस्थेचे वाहक आहेतं. आश्चर्य म्हणजे हीच लोकं जेंव्हा ‘व्हेन दे सी अस’ असो किंवा ‘12 इयर्स अ स्लेव्ह’, ‘ग्रीनबुक’ वैगरे पाहून परत अस्वस्थ होतात. कमाल करते हो साहब. म्हणजे तुमच्या प्रोग्रेसिव्ह, लिबरल संवदेना टेस्ट करण्यासाठी इथला शोषित घटक हा थर्मामीटर म्हणूनच राहणार का? कधीतरी आपलं प्रिव्हलेज मान्य करून, ह्यावर संवाद सुरू करा यार.
मोदी काय? एकदम प्रकट नाही झाले शाखेतून. त्यांना ह्याच नॉर्मलाईज झालेल्या द्वेषानं पोसलंय इथंवर. तुम्ही जर दलित विरोधी, आरक्षण विरोधी, ऍट्रोसिटी विरोधी, मुस्लिम विरोधी नॅरेटिव्ह ऐकून शांत बसले नसते. तर आज फॅसिझम इतका भक्कमपणे सत्तेवर आलाच नसता. यात भक्तांच्या उन्मादी झुंडीचा जितका वाटा आहे. तितका वाटा या तटस्थ पुरोगाम्यांचा पण आहे.
तुमच्या प्रिव्हीलेज्ड वर्तुळात जेंव्हा ‘मग आज जयभीम कलर काय?’ पासून ‘आले पाहा सरकारचे जावई’ ‘ह्याना सगळं फुकट पाहिजे’, ‘अट्रोसिटीचा गैरवापर’, ‘आरक्षण हटाव’ वैगरे वैगरे नॅरेटिव्ह ऐकून लाईटली घेतल्या गेलं तेंव्हाचं इथल्या द्वेषाला खतपाणी मिळत गेलंय. आजचं पाशवी बहुमतातलं सरकार हे ह्याच द्वेषाचं प्रॉडक्ट आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997