Home News Update राज्यात पाण्यानं आणलं डोळ्यात पाणी!

राज्यात पाण्यानं आणलं डोळ्यात पाणी!

130
0
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रसह अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती आहे. अनेक गावं, शहर आज पाण्यात आहेत. तर लाखोंच्या संख्येने नागरिकांना या पुराच्या पाण्यामुळं स्थलांतर करावं लागलंय. अनेक गावांचा संपर्क होत नाही. तर दुसरीकडे बीड जिल्हा आणि मराठवाड्यात जन्य परिस्थितीने शेतकरी आणि नागरिकांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच पिकाला पुरेसा पाऊस न झाल्यामुळं बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असणाऱ्या चिंचवड गाव येथील अनेक शेतकऱ्यांनी, आपल्या उभ्या पिकांवर नांगर फिरवलाय. तर अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ व्यवस्थित न झाल्याने, त्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.
विशेष म्हणजे हे चिंचवड गाव माजलगाव धरणाच्या अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. आज धरणाच्या कुशीत असणाऱ्या शेताची भयाण अशी अवस्था आहे. आजही जिल्ह्यात टँकरवरच अनेक गावांची अन शहराची तहान भागतेय. जिल्ह्यातील नद्या, तलाव, धरणं, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, विहिरी, आजही कोरडेठाक पडलेले आहेत. चाऱ्याचा प्रश्न देखील आज निर्माण झालेला आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत.
बीडच्या वडवणी तालुक्यात असणाऱ्या, चिंचवड गाव येथील शेतकरी, रंगनाथ एकनाथ घोलप यांची एकूण 8 एकर शेती आहे. याच शेतीवर रंगनाथ घोलप यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रंगनाथ घोलप यांनी 8 एकर शेतांपैकी 2 एकर शेतात मूग पेरला होता, तर 3 एकर शेतात सोयाबीन पेरली होती. मात्र पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले असतांना पिकाला पुरेसा असा पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली गेली. परिणामी काही भागात पिकं पिवळे पडून करपले आहे.
रंगनाथ घोलप यांची शेती माजलगाव धरणापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मात्र धरणालाच पाणी नसल्याने त्यांचे विहिर आणि बोअर कोरडेठाक पडले आहेत. विहिरीला आणि बोअरला पाणी नाही यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मग पिकाला पाणी कुठून आणणार. यामुळं रंगनाथ घोलप यांनी आपल्या शेतातील मुगावर नांगर फिरवलाय. तर सोयाबीनला देखील तीच पाळी येणार आहे. घोलप यांना मूग आणि सोयाबीन पेरणीसाठी 15 हजार रुपये खर्च आलाय. आता हा खर्च कसा निघणार?
घोलप यांच्याकडे वडवणीच्या इंडिया बँकेचे 1 लाख रुपये पीककर्ज आहे. त्यांनी हे कर्ज 2016 ला घेतले होते, कर्जमाफीसाठी त्यांनी फॉर्म देखील भरला होता. मात्र त्यांना कर्जमाफी झालीच नाही. अनेक वेळा बँकेत विचारणा केली, तर ते अधिकारी उडवा उडावीची उत्तरे देतात. असं घोलप यांनी सांगितलंय. यामुळं आता पाऊस नसल्याने पिकं देखील आले नाही त्यामुळं घोलप यांच्यासमोर अनेक संकट निर्माण झाली आहेत. त्यामुळं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केलीय.
रंगनाथ घोलप हे एकटेचं शेतकरी असे नाहीत की त्यांनी पिकांवर नांगर फिरवलाय. त्याच गावातील आसाराम घोलप यांच्यासमोर देखील हीच परस्थिती आहे. त्यांना देखील पिकांची वाढ न झाल्यामुळं नांगर फिरवण्याची वेळ आलीय. त्यांनी अडीच एकर सोयाबीन लावली होती तर 3 एकर कापूस लावला होता. यासाठी त्यांना जवळपास 30 हजार रुपये खर्च आला होता. आता हा खर्च कसा निघणार? बँकेचं कर्ज कसं फेडणार या विवंचनेत आसाराम घोलप आहेत. त्यांच्याकडे इंडिया बँक वडवणीचं 3 लाख कर्ज आहे. मात्र त्यांना देखील फॉर्म भरूनही कर्जमाफी झाली नाही. यामुळं त्यांच्यासमोर अनेक समस्या आज निर्माण झाल्या आहेत.

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997