Home मॅक्स ब्लॉग्ज परदेशातही घेऊन गेले ‘जात’

परदेशातही घेऊन गेले ‘जात’

2419
0
आता “वसुधैव कुंटुम्बकम्” ऐवजी,”वसूधैव जातीमम” म्हणावं लागेल! 
नांदेडचा SC विद्यार्थी सुरज येंगडे परदेशातही जातीग्रस्तेने  होरपळतोय. देशातल्या उच्चवर्गीय विद्यार्थ्यांनी हे जातीचे  जळकुंड परदेशातही पेटवलेत!  एका गरीब दलित कुटुंबात शिकणारा पण प्रचंड हुशार असणारा  हा विद्यार्थी परदेशात LLM व अन्य विषयांत पदव्या घेऊन पुढील शिक्षण घेत असताना, तिथे सुरज सोबत शिकणाऱ्या भारतातील अन्य उच्चवर्गीय विद्यार्थ्यांकडून  त्याला जातीयेतीची वागणूक मिळाली. सुरूवातीचे दोन महिने सुरज सोबत हे विद्यार्थी चांगले वागत. एकत्र जेवत. एकत्र चर्चा करत म्हणजे एकमेकांशी  सर्व व्यवहार सुरळीत चालू होता. जेव्हा सुरजचा सामाजिक घटक अर्थात उच्चवर्णीय विद्यार्थ्यांच्या पूर्वजांनी जन्मास घातलेली जात कळली तेव्हा पासून सुरजबरोबर या विद्यार्थ्यांचा  जातीयवाद सुरू झाला.
एकदा तर सुरजवर प्राणघातक हल्लाही झाला. परदेशातील जातीय परिस्थितीच्या खोलात जेव्हा सुरज गेला तर त्यास आणखीनच भयानक परिस्थिती असल्याचं लक्षात आलं. भारतातून शिक्षण घेण्यास गेलेले उच्चवर्गीय विद्यार्थी हे तिथे शिक्षणास आलेल्या अन्य SC/ST घटकातील विद्यार्थ्यांबरोबर जातीयवादी भावनेने केवळ पाहात नाहीत तर जातीयेतेचे दाहक चटके अनुभवायास लावतात. हे परदेशातलं वास्तव सुरजने सोशल मिडीयावर सांगितलंय. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून शैक्षणिक प्रेरणा घेऊन, परदेशात अनेक पदव्या घेऊ पाहणारा सुरज, जातीयवादी मानसिकतेमुळे  १०३ वर्षा नंतरही घेरला गेलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१६ साली पहिल्यांदा जागतिक पटलावर  “Caste in India”  मांडून, भारतातील जातियतेची सडकी, रानटी व्यवस्था परदेशी भूमीत चव्हाटयावर आणली. एका शतकाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही, जातीय मानसिकता बदललेली नाही. उलट परदेशी भूमीवरच उच्चवर्गीय विद्यार्थ्यांकडून जातींचं प्रदर्शन केलं जातंय. उच्च वर्णीयांच्या या कृतीला “exhibition of Indian caste” असं म्हणावं लागेल. ज्ञानाचं प्रदर्शन करण्याऐवजी विकृत मेंदूंचं प्रदर्शन करून हे विद्यार्थी काय हाशील करतील ?  अभ्यासा ऐवजी गावगाडयातील जातीचं राहटगाडगं यांचा पिच्छा सोडीत नाही. यांच्या मानगुटीवर बसलेला जातीचा राक्षस, उमलत्या मेंदूवर अधिराज्य गाजविणार असेल तर हे शैक्षणिक उच्चांक कधीच गाठणार नाहीत. देशाला निरनिराळ्या क्षेत्रातील संशोधनाची गरज असताना हे जातीभेदाचं भजन- किर्तन करत बसलेत.
आपला देश वैज्ञानिक वा इतरही क्षेत्रातील जास्ती जास्त म्हणजे अमेरिका,चीन, रशिया या विकसित देशांच्या तुलनेत कमी संशोधक का निर्माण करतो याचं जातीभेदांचं ग्रहण हे प्रमुख कारण आहे. नुकतंच अलिकडे डॉ. पायल तडवींचं वेदनादायी प्रकरण नायर हॉस्पिटलमध्ये घडलं. त्याच प्रकारची परिस्थिती परदेशातही आहे. कोणत्याही क्षेत्रात  बहुसंख्य भारतीय उच्च वर्गीयांमध्ये एखाद/ दुसरा दलित घटक असतो. असाच प्रकार परदेशातही आहे असंख्य उच्चवर्गीय आणि त्यांच्यात अपवादाने दलित किंवा आदीवासी आसतो. डॉ पायल तडवीला उच्च वर्णाताल्या तीन डॉ. महिलांनी छळलं.या प्रकारचे अनुभव परदेशी शिक्षण घेण्यास गेलेल्या SC/ST घटकातील विद्यार्थ्यांना सतत येतात.  येथे ऍट्रोसिटी विरोधात बोंब मारणारे, त्यांच्या वंशजांना  परदेशात जातीभेद करण्याचा परवाना देतात की काय ? भारतीय म्हणून येथून उड्डाण घेणारे तिथे गेल्यावर हिंदुस्थानी होतात.
“Broad mind “ न बाळगता वर्गवार जातीची घरटी मजबूत करणारी संकुचित मानसिकता वाढीस घालतात. अमेरिकेच्या “whitehouse” ( व्हाईट हाऊस ) मध्ये जाण्यास सोडा, बोटाने दाखविण्यासंही तिथल्या निग्रोंना कधी काळी बंदी होती. आज पूर्वीची परिस्थिती तिथं राहिलेली  नाही. प्रचंड प्रमाणात गोऱ्यांच्या मानसिकतेत बदल झालाय. युरोप खंडातही हिच सामाजिक परिस्थिती आहे. एवढंच कशाला,“NO RACISM” ची जगभर घोषणा देणारे ते हेच फुटबॉल प्रेमी लोक! बरं केवळ घोषणा नाही तर  जीवनात आचरण करणारे. कालच इंग्रजांनी क्रिकेट विश्वकप जिंकला.
६७ वर्षानंतर क्रिकेटच्या जन्मदात्यास विश्वकपाचं फळ चाखायला मिळालं. क्रिकेटच्या माध्यमातून वंशवाद, आपल्या कडचा जातीभेद मानत नसल्याचं गोऱ्यांच्या संघाने काल दाखवून दिलं. अटीतटीचा, तणावग्रस्त वातावारणात कालचा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला. कधी न्युजीलंड तर कधी इंग्लंड असा अंतिम सामन्याचा कल होत होता.  इंग्लंडच्या सर्व  देशवासियांचा तणाव बिंदू वाढलेला. अशावेळी संघात गोऱ्यांचा भरणा असतानाही इंग्लीश कर्णधाराने, काळया जोफ्रा आर्चरच्या हातात चेंडू दिला. पुढची जबाबदारी जोफ्राने पार पाडली. पण हा विश्वास तिथे दाखविला गेला. भले हे आरक्षण नसेलही पण समान संधी देण्याची सहज मानसिकता इग्लंड मध्ये दिसली.
आपल्या देशात कधी अशी फक्त आरक्षणावर बोंबा मारत बसण्याऐवजी सहज समान संधी देणारी मानसिकता कधी   रूजणार ? नाही तर  अमेरिकच्या ” व्हाईट हाऊसला” एखादया निग्रोने, स्पर्श केला अथवा त्या पांढऱ्या महलावर काळी सावली पडली तर तिथे वास्तव्यास आसणारे   भारतातले उच्चवर्गीय, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला  ” पांढऱ्या महलाला” गोमूत्राने अभिषेक घालायला सांगतील. 
ब्रिटिश काळातला भारतीय गणितीतज्ञ रामानुजम, ब्रिटिशांच्या नोकरीवर होता. इतका प्रतिभा संपन्न माणूस, साधी कारकुनाची  नोकरी करतो हे ब्रिटीशांच्या लक्षात येताच ते रामानुजाला त्यांच्या देशात घेऊन गेले. मात्र तो कर्मठ असल्याने तिथल्या वातावरणाशी त्याने जूळवुन घेतले नाही. युरोपमधल्या रक्त गोठविणाऱ्या थंडीतही हा पठ्ठया भारतातल्या सवयी प्रमाणे रोज स्नान करीत असे. शेवटी त्यास न्यूमोनिया होऊन प्राणास मुकावे लागले. भारतातून परदेशी गेलेल्या उच्चवर्गीयांनी सवयींचे गुलाम होऊ नये. गणितातलं मोठं संशोधन रामानुजाकडून होणार होतं. पण त्यांचा  करूण अंत झाल्याने संशोधन जन्मले नाही.. परदेशी शिकावयास गेलेल्या विद्यार्थ्यांनी, अमानवी अंगभूत सवयींना नष्ट करावं. तसेच आपल्यातील संशोधनाचा अंत होणार नाही याची काळजी घ्यावी. त्या करीता डोक्यातली जातीची किल्मीष नष्ट करून, प्रत्येक भारतीयाकडे बंधूत्वाच्या नात्यानेच बघावे लागेल. बालवयात “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हि प्रतिज्ञा छातीवर हात ठेवून म्हणणारे आपण,” सामाजिक जीवनात  सारे भारतीय माझे बांधव नाहीत हेच जातीय  कृतीतून दाखवत असतो… 
परदेशात  शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी  देशासाठी संशोधन करायला हवं ! जातीग्रस्त मानसिकता बाळगून आयुष्यभर मानसिक गुलाम का राहयाचं. देशाला नवनवीन संशोधन करणाऱ्या उदार मानसिकतेची गरज आहे. पुरातन, जीर्ण, बुरसटलेल्या जातीय मानसिकतेची नाही. कदाचित, अमानवी कृत्याने मानसिक समाधान तुंम्हाला मिळेलंही पण जीवनातलं उच्च शिखर गाठता येणार नाही. खुरटया मेंदूला आधूनिकतेची जोड दयावीच लागेल! तरच परदेशातील शिक्षणाचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल अन्यथा ” वसुधैव कुटुंम्बकम” ऐवजी “वसुधैव जातीमम म्हणावं लागेल.” विश्व हेची माझे घर हा संदेश देणाऱ्या आपल्या देशातील संतांचा हा घोर अपमान असेल. 
विशाल हिवाळे. 
( अध्यक्ष – संविधानवादी रिपब्लिकन पक्ष) 
9022488113

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997